>> मदन कुऱ्हे


कधी म्हणता टाळ्या वाजवा, कधी म्हणता थाळ्या वाजवा आणि आता तर असेही सांगितले की नऊ मिनिटे सर्व लाईट्स बंद करून सर्वांनी दिवे लावा. बरं आम्ही ह्या देशातील सुजान, सजग नागरिक दिवे लाऊ हो, पण कमीत कमी आत्ता वेळ कोणती आहे देशासमोर, आत्ता कोणकोणती संकट गोरगरीब जनतेसमोर, स्थलांतरित नागरिकांसमोर आ वासून उभी आहेत, याचा विचार तुम्ही केव्हा करणार? आणि त्यांच्या आयुष्यात मदतीचा दिवा कसा लावता येईल, याचे आवाहन तुम्ही करणार का? होय, आता ही वेळ कुठलाही दीपोत्सव करण्याची नव्हे तर गोरगरीब जनतेच्या, हातावर पोट असलेल्या मायबाप लोकांच्या घरात मदतीच्या आशेचा दिवा लावण्याची आहे, हे तुम्हाला नाही परंतु या देशातील कर्तव्यनिष्ठ जागरूक नागरिकांना समजले आहे.


कोरोना विषाणूरुपी संकटाने या जगातील प्रमुख विकसित देशांत मृत्यूचे थैमान घातले आहे. सामाजिक जीवनाचा लवलेशही राहणार नाहीस, अशी 'न भूतो' परिस्थिती या देशांची झाली. अर्थव्यवस्थेचा प्रश्न तर सोडाच, काही क्षुल्लक चुकांमुळे किंवा दुर्लक्ष केल्याने आज ते देश जे परिणाम भोगत आहेत ते भारताच्या नशिबी येऊ नये, म्हणून वारंवार त्या त्या देशांतील तज्ज्ञ हे वेगवेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला सावध करत आहेत. आपल्याकडून ह्या चूका होणार नाही असे बजावत आहे. परंतु आम्हाला इकडे काय तर थाळ्या वाजवण्यास सांगत आहेत आणि आता दिवे लावण्यास सांगत आहेत. आज आपल्या वैद्यकीय विभागात अनेक कमतरता आहे. पुरेशा प्रमाणात मेडितल इक्विपमेंट्स नाहीत. व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासतोय, अनेक वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट्सपासून वंचित आहेत. डॉक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. रक्ताचा तुटवडा आहे अशा अनेक गोष्टींमध्ये 'दिवा' लावण्यास सांगाल अशी अपेक्षा या जनमानसांत होती.

मुळात अशाप्रसंगी आपत्ती आणि उत्सव यातील फरक न समजणे आणि काहीही कृती करण्यास सांगणे हे अपेक्षित नाहीच. नेहमी प्रश्न येतो तो एकीचा, तर आपला देश आणि देशातील नागरिक ह्या तिरंग्याप्रती नक्कीच एक आहे. त्यांना अशा कुठल्याही इतर कृतीतून ते वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही. ह्या कृतींमधून अल्पप्रमाणात का होईना काही लोक एकत्र येतात आणि 'सामजिक विलगीकरण' जे आचाच्या घडीला अमृततुल्य सूत्र आहे, त्याचं उल्लंघन करतात. हे एका प्रसंगातून समजले असताना देखील पुन्हा तशीच एखादी कृती करावयास सांगणे हे चुकीचेच आहे. आता जर पुन्हा काही लोक यातून एकत्र आले तर त्याची जीवितहानीची किंमत किती मोजावी लागेल याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. आज हा देश कोरोना विषाणूच्या निर्णायक टप्प्यावर आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच आकडी संख्या गाठण्याच्या तयारीत आहे आणि असे असतांना ही चांगलेचांगले प्रतिबंधात्मक उपाय सांगण्याखेरीज ह्या अश्या कृती करायला सांगणे हे अनपेक्षित आहे. या क्षणाला वैद्यकीय सेवा किती अद्ययावत आहे, त्यात कमतरता काय आहेत हेच बोलणे आणि त्यासंबंधी कृती करण्यास सांगणे हेच अपेक्षित आहे.


आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषाणूबाबत काय संशोधन चालू आहे. आपल्या देशात यासंबंधी काय काय करता येऊ शकते यावर बोलायलाच पाहिजे. यापलीकडे बहुतांशी लोकं मानसिक धक्क्यातून सावरत आहेत त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षित माणसं हवी आहेत. त्यावरही बोलण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे रेशन नाही, खाण्यास काहीही शिल्लक नाही, पैसे नाही अशी कित्येक कुटुंब उघड्यावर पडली आहेच, त्यांच्याबद्दल बोलायला पाहिजे आणि खरं त्यांच्या आयुष्यात दिवा लावायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला अनेक वीज विभागातील तज्ज्ञ सांगत आहेत, की एकाच वेळी वीज बंद केल्याने वीजेचे डिमांड-सप्प्लायचे गणित बिघडेल आणि त्याचा फटका हा थेट अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ठिकाणी बसू शकतो. पॉवर स्टेशनमध्ये बिघाड झाला तर ते पूर्ववत करण्यास साधारणतः 15 ते 16 तासांचा कालावधी लागतो, अशा ज्या वैज्ञानिक गोष्टी आहेत त्यावर हा निर्णय घेण्याआधी विचार करायला पाहिजे होता. पंतप्रधानांनी या भयानक महामारीमुळे पीडित असलेल्या लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर केवळ नऊ मिनिटांसाठी दिवे बंद न करता, कृपया वास्तववादी व्हा आणि देशात वास्तविक प्रकाश पसरवावा, हीच अपेक्षा आहे. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' यातून काहीतरी बोध घ्यावा आणि जास्तीत जास्त गुणात्मक तसेच परिणामात्मक उपाययोजना करण्यास सांगाव्यात हीच अपेक्षा.


>>  या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.