महागाईचा दर (Inflation Rate)सतत चढता राहणाऱ्या भारतासारख्या देशात अर्थव्यवस्थेला त्याचा फटका सहन करावा लागतोच, परंतु तुमच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनावरही या महागाईचा विपरीत परिणाम होतो. वैयक्तिक आर्थिक नियोजनाचा विचार करत असताना रिटायरमेंट प्लॅनिंगला अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतोच, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा थेट संबंध हा देशातील दीर्घकालीन महागाईच्या दराशी असतो.निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. वृद्धत्व जास्त सुखकर आणि समाधानकारक जावं यासाठीची तजवीज आपण त्या माध्यमातून करत असतो. परंतु आपल्याला परफेक्ट वाटणारा रिटायरमेंट प्लॅन यशस्वी होण्यात असंख्य गोष्टींचे अडथळे असतात. त्यापैकी एक म्हणजे महागाई! वस्तू आणि सेवांच्या किंमती वाढत जाण्याला आपण ढोबळमानाने महागाई असं म्हणतो. इंग्रजीत त्यालाच 'इंफ्लेशन' असा शब्द आहे. भारताचाच विचार करायला गेलात तर महागाईच्या दरात होणाऱ्या अवघ्या एक टक्क्यांच्या वाढीमुळेही तुमचा रिटायरमेंट प्लॅन कोलमडू शकतो हे दिसून येतं. महागाईत झालेली छोटीशी वाढ तुमच्या बचतीवर आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनावर कोणता परिणाम परिणाम करते हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
महागाई टाळणं कुणालाच शक्य नाही!
महागाई हा घटक विचारात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आर्थिक नियोजन करणं केवळ अशक्य आहे. बचत, गुंतवणूक करत असताना महागाईचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. चलनवाढ ही अर्थव्यवस्थेत समतोल साधणारी गोष्ट आहे. ती नसेल तर कोणतीही अर्थव्यवस्था वाढू शकणार नाही. भारत हा एक विकसनशील देश आहे, आणि आपली अर्थव्यवस्था सरासरीपेक्षा जास्त दरानेच वाढत राहिली पाहिजे. म्हणूनच सतत विकसित होत असणारे देश महागाई टाळू शकत नाहीत. त्यामुळे आर्थिक नियोजन करत असताना महागाई ही अटळ गोष्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही चलनवाढ विशेषतः आपल्या रिटायरमेंट सेव्हिंगवर जास्त परिणाम करत असते. त्यातही भूतकाळातला महागाईचा दर विचारात घेऊन नियोजन करता येत नाही. अशा वेळी महागाईचा दर पाच ते सहा टक्के इतका गृहीत धरून नियोजन करावं लागतं.
महागाई समजून घेताना
महागाईच्या परिणामांकडे जाण्याच्या आधी हे प्रकरण नक्की आहे तरी काय, हे जाणून घेऊया. असं समजा की तुमच्या रिटायरमेंटचं आर्थिक नियोजन करत आहात. त्यात रिटायरमेंटनंतर चांगलं जीवन जगण्यासाठी लागणारी ठरावीक रक्कम तुम्ही निश्चित केली. ही रक्कम सामान्यतः आजच्या वस्तू आणि सेवांच्या आणि घर, अन्न, आरोग्य सुविधांच्या इत्यादींच्या आजच्या दरानुसार निश्चित केलेली आहे. परंतु काळ जसजसा पुढे जाईल तशा या गोष्टींच्या किमती सतत वाढत राहणार आहेत. याचाच अर्थ या वस्तू आणि सेवा वापरण्यासाठी तुम्हाला आज जी किंमत मोजावी लागते त्यापेक्षा जास्त किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे. यालाच म्हणतात महागाई!
कॉस्ट ऑफ लिव्हिंग
तुम्हाला ज्या वस्तू आणि सेवांची नियमित गरज भासते, त्यांच्या किंमती महागाईमुळे वरचेवर वाढत राहतात. याचाच अर्थ तुम्ही जो पैसा रिटायरमेंटसाठी बचत करून ठेवला आहे, तो पुरेसा ठरणार नाहीय. भविष्यात तेवढ्याच पैशातून तुम्ही आजच्यापेक्षा खूप कमी वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकाल, आणि यामुळेच तुमचं 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अर्थात रोजच्या जगण्यासाठी लागणारा खर्च वाढणार आहे. महिन्याचा किराणा, दवाखाना, औषधं आणि इतर खर्च भागवण्यासाठी तुम्ही आज केलेली तजवीज पुरेशी ठरणार नाहीय, आणि त्यातून तुमचं तेंव्हाचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
वाढत जाणारा खर्च
प्रत्येक वस्तू आणि सेवेवर महागाईचा होणारा परिणाम वेगवेगळा असतो. उदा. इतर वस्तूंपेक्षा दवाखाना, औषधे यांच्या किमती जास्त दराने वाढतात. त्यावर खर्च करायची वेळ आल्यास तुम्ही बचत केलेला पैसा लवकर संपण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः वृद्धत्वात वैद्यकीय खर्च हा बऱ्याचदा आपल्यासाठी अटळ होऊन बसतो. वाढत्या महागाईमुळे हा खर्चही वाढतच जातो.
बचतीवर होणारा परिणाम
सतत वाढत राहणारी महागाई तुमच्या बचतीची क्रयशक्ती, अर्थात परचेसिंग पॉवर कमी करते. म्हणजे असं समजा की तुम्ही काही ठरावीक रक्कम निवृत्तीसाठी राखून ठेवली आहे. दुसऱ्या बाजूला वाढत्या महागाईमुळे तुम्हाला रोजच्या जगण्यासाठी लागणारा खर्च वाढत जाणार आहे. अशा वेळी या वाढत्या महागाईला तोंड देताना तुमची बचत अपुरी पडणार आहे. म्हणजे तुम्ही आज निवृत्तीसाठी बचत करत असलेली रक्कम निवृत्तीच्या संपूर्ण काळात तुम्हाला पुरेशी ठरणार नाही.
गुंतवणुकीवर होणारा परिणाम
महागाईचा तुमच्या बचतीवर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम गुंतवणुकीवरही होतच असतो. फिक्स्ड डिपॉझिट, बॉण्ड यांसारखे गुंतवणुकीचे काही पर्याय इतका कमी परतावा देणारे असतात की त्यांच्यातून मिळणारा परतावा महागाईसमोर टिकू शकणार नसतो. परिणामी तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित असलेला फायदा भविष्यात मिळणं अशक्य होऊन बसतं. यातूनच तुमचं निवृत्तीतलं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता असते.
वाढतं आयुर्मान
वैद्यकीय क्षेत्राने गेल्या काही काळात झपाट्याने प्रगती केली आणि अजूनही सातत्याने त्यात प्रयोग चालू आहेत. या प्रगतीमुळे माणसाचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे. ही एक सकारात्मक बाब असली तरी याची दुसरी बाजू म्हणजे तुमचे निवृत्तीतले दिवसही आता वाढले आहेत, आणि तेवढ्या काळासाठी तुम्हाला बचत केलेली रक्कम पुरेशी ठरणार नाहीय. तुमची गुंतवणूक किंवा बचत जर महागाई विचारात घेऊन केलेली नसेल तर ती लवकर संपू शकते. एक टक्का या दराने महागाई वाढत असेल तर तुम्हाला नक्की किती रक्कम अधिकची बचत करावी लागेल हे खालील तक्त्यातून समजून घेता येईल.
1 % महागाईचा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगवर होणारा परिणाम
सध्याचा प्रतिमहिना खर्च निवृत्तीला उरलेली वर्षे निवृत्तीच्या वेळचा खर्च (लाखात) 5% महागाईसाठी आवश्यक ठेवी (कोटीत) 6% महागाईनुसार अतिरिक्त बचत (लाखात)
1 % महागाईचा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगवर होणारा परिणाम |
||||
सध्याचा प्रतिमहिना खर्च |
निवृत्तीला उरलेली वर्षे |
निवृत्तीच्या वेळचा खर्च (लाखात) |
5% महागाईसाठी आवश्यक ठेवी (कोटीत) |
6% महागाईनुसार अतिरिक्त बचत (लाखात) |
20000 |
35 |
1.32 |
2.86 |
80.44 |
30000 |
30 |
1.56 |
3.36 |
83.72 |
40000 |
25 |
1.62 |
3.51 |
76.41 |
50000 |
20 |
1.59 |
3.44 |
64.26 |
75000 |
15 |
1.87 |
4.04 |
63.40 |
100000 |
10 |
1.95 |
4.22 |
53.46 |
महागाईचं आव्हान पेलण्यासाठी असं करा नियोजन...
महागाई ही आपल्याया अर्थव्यवस्थेत अटळ गोष्ट आहे. या महागाईचे आव्हान समर्थपणे पेलता येईल असे काही मार्ग आहेत, ज्यामुळे निवृत्तीनंतर तुम्ही निश्चित राहू शकता.
वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा
स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, कमोडिटी, सोनं, रिट्स असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. तुमची गुंतवणूक यापैकी काही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये विभाजित करा. दीर्घकालीन चलनवाढीला टक्कर देण्याची क्षमता अशा प्रकारच्या गुंतवणुकीत असते.
इक्विटीमध्ये गुंतवणूक करा
इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक चलनवाढीच्या दराला मागे टाकते हे प्रत्यक्ष अनुभवातून आणि आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. असं असलं तरी इक्विटीत केलेल्या गुंतवणुकीत जोखीमही जास्त असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही करत असलेली गुंतवणूक तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त तर नाही ना, याची काळजी घ्या.
रिटायरमेंट प्लॅन सतत तपासून पाहा
तुमचा रिटायरमेंट प्लॅन हा भविष्यातल्या महागाईशी सुसंगत आहे की नाही हे सतत पडताळून पहा. तो तसा नसल्यास त्यात बदल करा. महागाई वाढली तरी फारसा आर्थिक ताण न येता तुम्ही जगू शकाल अशी तजवीज करा.
इमर्जन्सी फंड तयार करा
अचानकपणे समोर येणाऱ्या खर्चाचे प्रसंग सक्षमपणे हाताळायचे असतील तर इमर्जन्सी फंड उभारणे हे सर्वात सोपा मार्ग आहे. असा फंड तुम्ही उभारला असेल तर भविष्यात निवृत्तीसाठी केलेल्या गुंतवणुकीला हात लावण्याची वेळ तुमच्यावर येत नाही.
चलनवाढीला पूरक ठरेल अशी गुंतवणूक करा
महागाईला पूरक ठरेल असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. इंफ्लेशन इंडेक्स्ड बॉण्ड किंवा म्युच्युअल फंड हे त्यातलंच एक उदाहरण. अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करा.सध्या वाढत असलेली महागाई कदाचित तुमच्या आर्थिक क्षमतेमुळे फार मोठी समस्या तुम्हाला वाटणार नाही. पण दीर्घकालीन विचार केल्यास भारतासारख्या देशात महागाई तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा बोजवारा उडवू शकते. बचतीची आणि गुंतवणुकीची पर्चेसिंग पॉवर महागाईमुळे कमी होत असते. हा धोका लक्षात घेऊन त्यासाठी पावलं उचलणं, काळाच्या कसोटीवर टिकू शकेल अशी गुंतवणूक करणं हाच महागाईला तोंड देण्याचा मार्ग आहे. याबद्दल सजग राहिल्यास, सजगपणे निर्णय घेतल्यास तुमचा निवृत्तीचा काळ अधिक सुखाचा आणि समृद्धीचा जाईल यात शंका नाही!