परवा दादरहून बोरीवलीकडे धावणाऱ्या लोकलच्या लेडीज डब्यातून मी प्रवास करत होते. संध्याकाळची वेळ होती. लेडीज डबा नेहमीप्रमाणे खचाखच भरला होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून कामावरुन परतणाऱ्या बायांचा कलकलाट सोबतीला होताच. रोजच्या ढकलाढकलीला, गर्दीला वैतागलेली एक अल्पशिक्षित वाटावी अशी  बाई मला अगदी खेटून उभी होती. पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या चौतिस-पस्तिशीच्या बाईच्या चेहऱ्यावर प्रचंड वैताग होता. कुठल्यातरी गोष्टीमुळे खूपच कावलेली दिसली. एवढ्या गर्दीत, एवढ्या गोंधळातही तिने पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि नंबर डायल करून मोबाईल कानाला लावला.


"ये रेश्मा अंधेरीला चढल्यावर, ए ऐक ना आधी, आपल्या नेहमीच्या डब्यात आहे मी. मी लांब जरी असली तरी तुझा स्टोल माझ्याकडं टाक. कशाला होय.?  काय सांगू आता तुला. या बायांना ना काडीच्या अकला नाहीत. तुला माहितीच हाय की आयाबहिणी नसल्यासारख्या कशापण ढकलतात. सकाळी मी गोरेगाव स्टेशनवरून चढली ना तर दादरला उतरताना असं ढकललं ना मला की माझी ओढणीच हरवली कुठं. तशीच ऑफिसला गेली मी. ऑफिसमध्ये कोण कशाला लक्ष देईल आपल्याकडं. पण म्हणलं परत जाताना बिन ओढणीची  घरी कशी जाऊ? नवरा गेल्यागेल्या आरती करल माझी. आणि पिऊन आलेला असंल तर झिंज्या उपटायला कमी करायचा नाही. आता स्टेशनला उतरल्यावर नवीच घ्यावी लागंल. हकनाक शंभर दिडशेला बांबू लागणार त्यापेक्षा तुझा स्टोल दे. तुला उद्या परत देते." तिचा फोनवरच संवाद ऐकून मी अवाकच झाले. त्या बाईबद्दल मला जेवढी सहानुभूती वाटली तेवढाच एकूण प्रकरणाबद्दल कमालीचा वैतागही आला.

लोकलच्या गर्दीत कधी काय होईल सांगता येत नाही हे दोन तीन वेळा जरी गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास केला तरी कुणाच्याही लक्षात येईल. लोकलचा लेडीज डबा तर एकमेकींना धक्काबुक्की करण्याचं हक्काचं ठिकाणंच आहे जणू. माझा संताप वगैरे व्हायला लोकलच्या गर्दीत तिची ओढणी गायब झाली ही काही न भूतो न भविष्यती अशी घटना नव्हतीच खरं तर पण अंगावर ओढणी नसलेल्या अवतारात ही बाई घरात गेली तर तिचा नवरा चिडेल, तिच्यावर शिव्यांची लाखोली वाहील आणि जास्तच भडकला तर हातही चालवेल या कल्पनेने माझ्यासारख्या स्त्रीमुक्तीच्या बाजूने विचार करणारीच्या डोक्यात तिडीक न जाईल तर नवलच. पण डोक्यात गेलेली तिडीक मी दुसऱ्या क्षणाला बाहेर काढली आणि शांताबाईचा अवतार धारण केला.

" अहो ताई त्यात काय एवढं. साधी ओढणी तर हरवलीय ना? तुम्ही थोडीच हरवलायत. सांगायचं नवऱ्याला काय झालं ते. खातो की काय." मी तिला न मागता फुकटचा सल्ला दिला.
" नुसता खाणार नाही, फाडून खाईल." तिचे अनुभवाचे बोल तिच्या तोंडातून लागलीच बाहेर पडले.
मी ही थोडीच गप्प बसणार होते. तोच चेंडू तिच्या कोर्टात टोलवला.
" तुम्हाला दात नाहीत काय? तुम्ही ही खा की मग. खून का बदला खून वो. तुम्ही गांधी थोडीच आहात."
बराच वेळ गमतीत चाललेला विषय गांभीर्याकडे वळलाच.
" तू काय बाई बिनलग्नाची दिसतेस. लग्न झाल्यावर कळेल तुला. नवरा काय असतो ते." माझ्या रिकाम्या गळ्याकडं बघून ती पुटपुटली.
" तुम्हाला आहे नं नवरा तुम्ही सांगा की मग काय असतो ते." मी तिला अजूनच डिवचलं.
माझं लग्न झालेलं आहे तरी मी मंगळसूत्र घालत नाही असे स्त्रीमुक्तीवादी शस्त्र इथं परजण्यात काहीएक हाशील नाही हे कळून मी तिला विचारलं तेंव्हा ती उद्वेगानं म्हणाली,
" उशीखालचा साप असतो बाई नवरा कधी डसल सांगता नाही यायचं."
तिच्या या धाडकन अंगावर आलेल्या वाक्यावर काय रिऍक्ट व्हावं हे न कळून मी गप्प बसले तोवर 'पुढील स्टेशन जोगेश्वरी' अशी अनौन्समेंट झाली आणि मी गर्दीतून वाट काढत माझ्या स्टेशनवर उरण्यासाठी लोकलच्या दारात येऊन थांबले.

ओढणी हरवलेल्या बाईसोबतच्या दहा पंधरा मिनिटांच्या प्रवासात आमचा जो काही संवाद झाला तो जसाच्या तसा माझ्या मेंदूत कोरला गेला. मला मुंबईत आल्यापासून वाटायचं इथल्या बाया स्वतःला हवं तसं जगतात, वागतात. हवी ती कपडे घालतात. पण हे संपूर्ण सत्य नाही. गावखेड्यातून जगायला म्हणून आलेली लाखों कुटुंब इथे आहेत. त्या कुटुंबातील स्त्रिया मिळेल तिथे काम करून पोरबाळं जगवतात, शिकवतात. वेळप्रसंगी नवऱ्याच्याही पोटपाण्याचं बघतात. त्यांचा पोशाखातील बदल साडीमधून पंजाबी ड्रेसपर्यंत येऊन पोहोचलेला आहे पण त्या पंजाबी ड्रेसवर घ्याव्या लागणाऱ्या ओढणीच्या सक्तीत बदल मात्र झाला नाही. "साडी नको तर तू ड्रेस घाल पण ओढणी शिवाय दिसली तर बघ मग." असा धाक तिला तिच्या नवऱ्याचाच असतो. म्हणून अशा स्त्रिया चुकून ओढणी विसरली तरी सैरभैर होतात कारण त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्या पुरुषी मानसिकतेला त्या ओळखून आहेत. त्या दिवशी लोकलमध्ये आलेला अनुभव हे त्याचंच द्योतक आहे. वरवर फारच किरकोळ आणि क्षुल्लक वाटणारी गोष्ट खूप मोठ्या प्रश्नापर्यंत आणून सोडते.

बाई स्वतंत्र आहे म्हणणाऱ्या किती लोकांना माहित आहे की अजूनही कित्येक बायकांना पोशाखाचेही नीटसे स्वातंत्र्य नाही. आजही कित्येक घरात बाईने कोणते कपडे घालायचे हे बाई नाही तर ती ज्याच्या घरात राहते, सामाजिकदृष्ट्या तिच्यावर ज्याचा हक्क आहे तो पुरुष ठरवतो. मग तो कधी बाप असतो, भाऊ असतो, नवरा असतो तर कधी तिचा स्वतःचा मुलगाही असतो. तिने साडी घातली तर त्या साडीवरच्या ब्लाऊजच्या बाह्यांची लांबी, गळ्याची खोली पुरुष ठरवणार. आणि तिची इच्छा नसतानाही तिला डोक्यावर पदर घ्यायलाही हे नसलेल्या डोक्याचे पुरुषच सांगणार. बाईला आपलं शरीर कसं सांभाळायचं हे चांगलाच कळतं ही गोष्ट अजूनही पुरुषांच्या ध्यानी आलेली नाही.

'रहनसहन'च्या बाबतीतलं स्वातंत्र्य आपसूक बहाल करणाऱ्या मुंबईसारख्या मुक्त शहरातही पोशाखाच्या अनुषंगाने बाईवर, तिच्या शरीरावर हक्क गाजवणारी पुरुषी मानसिकता पूर्णपणे लयाला गेली नाही." हे सत्य आहे. घरातील बाईची अंगावरून ओढणी सरकून जराजरी इकडेतिकडे झाली तरी ही पुरुष मंडळी अगदी आभाळ कोसळल्यासारखे करतात. आपल्या घरातल्या बाईने, मुलीने चापून चोपुनच घराबाहेर पडलं पाहिजे, तिने शरीराला चिकटतील असे कपडे वापरायचे नाहीत कारण जागोजागी पुरुष वखवखलेल्या नजरेने तिचा बलात्कार करायला टपूनच बसलेले आहेत." असा संकुचित विचार डोक्यात घेऊन फिरणारी जमात फक्त गावखेड्यात किंवा छोट्या शहरातच नाही तर एकमेकांकडे बघायला वेळ नसणाऱ्या मुंबईसारख्या शहरातही आहे. नाहीतर त्या ओढणी हरवलेल्या बाईला स्टोलसाठी मैत्रिणीला फोन करून विनवणी करायची काय गरज होती? नाही का!

आपण ज्या नजरेनं स्त्रियांना बघतो, भोगतो अगदी तसंच सगळे पुरुष बघत, भोगत असतील असा मोठ्ठा समज या संकुचित विचारांच्या पुरुषांचा आहे म्हणून ते होताहोईल तेवढं आपल्या घरातील स्त्रियांच्या, मुलींच्या पोषाखावर नियंत्रण आणू पाहतात. आणि त्या जुमानत नसतील, ह्यांच्या पुरुषी मानसिकतेला दाद देत नसतील तर शारीरिक बळाचा वापर करायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. जोवर असे पुरुष स्वतः दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या वासनांध नजरेनं भोगनं सोडणार नाहीत तोवर ओढणी हरवल्या नंतर सैरभैर होणाऱ्या स्त्रिया आपल्याला जागोजागी भेटतच राहतील.

- कविता ननवरे