स्त्री विषयक विविध बातम्यांनी हा महिना गाजत आहे. बलात्कार, बलात्कारातून राहिलेलं गरोदरपण, अकाली गर्भपात करण्यासाठी न्यायालयाच्या घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या, सरोगसी असे काही विषय बातम्यांमधून गेले काही महिने अधूनमधून सातत्याने येतच आहेत; त्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या, मात्र आता जगासमोर आलेल्या कठुआ बलात्काराने वादळ उठवलं. सगळा सोशल मिडिया ढवळून निघाला. देशातच नव्हे, तर देशाबाहेर देखील या प्रकरणाची चर्चा झाली. ही चर्चा निर्भया प्रकरणासारखीच दीर्घकाळ टिकेल, असं दिसतंय; किंबहुना अधिकही... कारण त्यात धर्म आणि राजकारण हे दोन मुद्दे प्रामुख्याने समाविष्ट झाले आहेत. दुसरे म्हणजे थंड डोक्याने, योजना आखून, समूहाने हे घृणास्पद कृत्य केले असून त्यात पुजारी आणि पोलीस हे धर्म व न्याय क्षेत्रातले दोन महत्त्वाचे घटक सहभागी आहेत.


या चर्चेत काही ‘लहानसहान’ घटना दुर्लक्षित राहून गेल्या आहेत. पैकी एक घटना मुंबईतली आहे : दोन वेश्यांच्या मृत्यू! याबाबत वृत्तपत्रांमधून बातम्या आल्या. कुणी त्यांना केवळ ‘महिला’ म्हणण्याची सभ्यता दाखवली, तर कुणी वेश्या या शब्दाऐवजी वारांगना हा शब्द वापरुन नसते उदात्तीकरण करण्याचा उद्योगदेखील केला; नवल म्हणजे शीर्षकात वारांगना हा शब्द वापरलेला असला, तरी बातमीत मात्र वेश्याच म्हटलेलं आहे.

आपल्या निवासी भागातील कुंटणखाने बंद केले जावेत, म्हणून नागरिकांनी मोर्चा काढला आणि त्यानंतर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली. काही कुंटणखाने बंदही केले. त्यानंतर या भागात पळून गेलेल्या/ पळवून लावलेल्या/ पकडून नेऊन पुन्हा सोडून दिलेल्या वेश्या पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परत आल्या आहेत का, हे पाहण्यासाठी पोलीस अधूनमधून फेरी मारत राहिले.

असाच पुन्हा एक छापा पडलेला असताना अंजिरा आणि सलमा या ४५ व २५ वर्षांच्या दोन स्त्रिया पळून जाण्यासाठी इमारतीच्या मागे असलेल्या मोडक्या शिडीचा व दोरखंडाचा वापर करत तिसऱ्या मजल्यावरून उतरण्याचा प्रयत्न करत असताना खाली कोसळल्या. अंजिरा जागीच मरण पावली, तर सलमानं रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांचे मृतदेह स्वीकारण्यासाठी मुंबईत येण्यास नातलगांनी नकार दिला. त्यांचे शेजारीपाजारी म्हणाले की, “आता त्या व्यवसाय करत नव्हत्या, तर पळाल्या कशासाठी?”  ही वाक्यं वाचल्यावर अनेकानेक हकीकती माझ्या आठवणीत जाग्या झाल्या.

कठुआ बलात्कारात पोलीस सहभागी असल्याची बातमी तर मनात ताजी आहेच. मी ‘भिन्न’ लिहित होते, त्या काळात महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व प्रस्थापित वेश्यावस्त्यांमध्ये जाऊन अनेक स्त्रियांना भेटले-बोलले होते. लॉजवर चालणारा वेश्याव्यवसाय आणि त्यातल्या स्त्रियांची दुखणीही जाणून घेतली होती. सगळ्यांत वाईट दर्जा हा हायवेवर उभं राहून धंदा करणाऱ्या वेश्यांचा. ट्रक ड्रायव्हर ही त्यांची प्रामुख्यानं गिऱ्हाईकं. कमाई एकाकडून निव्वळ २५-३० रुपये. भिकारी बनण्याच्या वा सडून मरण्याच्या आधीचा हा टप्पा. या स्त्रियांना भेटायचं, त्यांचं आयुष्य समजून घ्यायचं, तर अपरात्री हायवेवर जाणं अपरिहार्य होतं. त्यात अर्थातच मोठी जोखीम होती.

एका अड्ड्यावर पोहोचले, तेव्हा मला दुरून बघूनच सगळ्या रस्त्यालगतच्या शेतांमधून, काटेरी कुंपणांची पर्वा न करता धूम पळाल्या. साध्या वेशातले पोलीस आले असावेत असा त्यांचा समज झाला होता. त्यांना पुन्हा एकत्र गोळा करायला दोन तास लागले. बहुतेकजणी खंगलेल्या, आजारी, उपाशी. त्यात कुणी बेवड्या. कुणाला एड्स झालेल्या. कुणी काखेत लेकरु घेऊन आलेल्या. ‘त्या पळाल्या का?’ हा प्रश्न तेव्हा मलाही पडलेला होताच. त्यांची अवस्था मुळातच इतकी वाईट होती की, आता यांचं अजून काय वाईट होणार? यांना पोलिसांची भीती नेमकी का वाटावी? असे प्रश्न मनात होते.

एकेका बाईला कौशल्याने हळूहळू बोलतं केलं. तेव्हा पोलिसांकडून त्यांच्यावर कसकसे अत्याचार होतात हे समजलं आणि त्यातच त्यांचं ‘पळून जाण्याचं कारण’ उघडं पडलं. सार्वजनिक संडासांमध्ये त्यांना रात्रभर उभं राहण्याची शिक्षा पोलीस सुनावत होते; त्यांना नागडं करून रांगेत उभं राहायला लावून ‘झडती’ घेतली जात होती; शिवीगाळ-अश्लील बोलणं यात तर काही वावगं वाटण्याचं कारणच नव्हतं, कारण मुळात त्या वेश्याच होत्या... त्यांना कसला आलाय आत्मसन्मान? त्यांची कुठली प्रतिष्ठा? त्यातली एखादी नवखी, देखणी तरुणी असेल तर तिला भोगायला पोलिसांची रांग लागते, असंही एकीने सांगितलं.

वेश्येवरील बलात्कार हा बलात्कार मानायचा की नाही, याविषयी तर आपल्याकडे सुशिक्षित लोकही हिरीरीने चर्चा करतात. वेश्या, देवदासी, नर्तकी, अभिनेत्री, कलावंत स्त्रिया या ‘स्वतंत्र’, ‘मुक्त अभिव्यक्ती करणाऱ्या’, ‘बोल्ड’ वगैरे असतात; म्हणजेच त्या कुणालाही ‘सहज उपलब्ध’ असतात; हा विचार आपल्याकडे अनेक शतकांपासून प्रस्थापित झालेला आहे. बहुतांश स्त्रिया त्यांना ‘त्या/तसल्या बायका’ म्हणून वेगळं पाडतात; त्याच्याकडे तुच्छतेने, घृणेने पाहतात; त्यांची सावलीही आपल्या ‘पवित्र, संस्कारी, घरगुती’ जीवनावर पडू नये अशी प्रार्थना करतात.

भटक्या-विमुक्त जमातीतल्या काही लेखकांची पुस्तकं मध्यंतरी मी संपादित केली. त्यातली बाळबोधपणे लिहिलेली पोलिसी अत्याचारांची वर्णनं वाचून पोटातलं अन्न उमळून पडलं होतं. कोठडीतले बलात्कार त्यात नोंदवले होते आणि तिथून सुटून परत आल्यानंतर जातपंचायतीने ‘बाटलेली, व्यभिचारी स्त्री’ ठरवून तिला पुन्हा शिक्षा ठोठावल्या, तेही नोंदवलं होतं.

कुमारवयीन मुली, विवाहिता, अगदी चार लेकरांची आई असलेली बाई... या घरातून का पळून जातात? वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया कुंटणखान्यातून का पळून जातात? सुधारगृहात दाखल केलेल्या मुली, स्त्रिया तिथूनही का पळून जातात? पळून त्या कुठे जाणार असतात? अशी कोणतीच जागा या जगात आपल्यासाठी नाही, हे त्यांना माहीत असतं. आभाळाखाली कुठेही आपण सुरक्षित नाही आहोत, हेही माहीत असतं. कदाचित आगीतून फुफाट्यातच पडू, याचीही जाणीव असते. तरीही का त्या अशा पळून जात राहतात? त्यांच्या मनात काही आशा असते का? की त्यांना फक्त चालू वर्तमानातल्या संकटापासून तात्पुरती का होईना पण सुटका हवी असते फक्त? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत आहेत आणि आपलं दुबळेपण, आपली कृतीहीनता देखील माहीत आहे.

आपण सोशल मिडिया ढवळून काढला, निवेदनं दिली, डिजिटल स्वाक्षऱ्या केल्या. आपण मोर्चात सामील झालो, आपण घोषणा दिल्या. काल ४९ माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि त्यांना थेट दोषी ठरवून ‘पीडितांच्या कुटुंबियांची माफी मागा’ असंही म्हटलं. या दरम्यान अजून काही बलात्कार झाले, अजून काही कौटुंबिक हिंसेच्या घटना घडल्या. एका केसबाबत पोलीस साधा एफआरआय नोंदवून घेत नाहीत म्हणून कवी सौमित्र व त्यांची पत्नी पार मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले; मग तिनेक दिवसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. किती बायका असं मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकणार आहेत? किती निवेदनं अशी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकणार आहेत? सनदी अधिकाऱ्यांनी आपली सिस्टीम सुधारण्यासाठी काही योजना मांडल्या आहेत का या निवेदनाखेरीज आणि ‘आपल्या’तल्या नोकरदारांची वृत्ती बदलावी म्हणून ते काही प्रयत्न करणार आहेत का?

सीआयडीच्या ‘क्राईम इन महाराष्ट्र’ अहवालानुसार बलात्काराचे ८३.६२ टक्के आरोपी निर्दोष सुटतात! - हे आपल्याला माहीत आहे का? पोलीस, वकील, न्यायाधीश यांच्या सदोष नजरा याला कारणीभूत आहेत की नाही? उत्तरं मिळूनही काही करता येत नसेल, तर निदान या पळून जाणाऱ्या बायकांवर बोटं रोखून त्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचं लाजिरवाणं कृत्य तरी करू नका. आपण एका स्त्रीच्या रक्तामांसावर नऊ महिने पोसले जाऊन या जगातला प्रकाश बघायला गर्भाशयाच्या काळोखातूनच सक्षम बनून आलोत, याची किमान कृतज्ञता बाळगा... मग तुम्ही स्त्री असा वा पुरुष!