BLOG : गॅंगस्टर अतीक अहमहदचा (atiq ahmed) गेल्या शनिवारी (15 एप्रिल)  हत्या करण्यात आली. अतीकची हत्या(murder) ही संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना होती. पत्रकारांशी संवाद साधताना ऑन कॅमेरा अतीकला गोळ्या घालून मारण्यात आले. अतीकच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते आणि त्याने त्याचे निम्मे आयुष्य देशातील विविध तुरूंगात काढले. अतीक मुंबईच्या आर्थर रोड(arthur road jail) येथील तुरूंगात देखील होता. पण त्याचा आर्थरच्या तुरूंगाती प्रवास जरा वेगळा होता. 


म्हणून आर्थरमध्ये गेला अतीक...


समाजवादी पक्षाने 2006 ला मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन केले होते. अतीक तेव्हा उत्तर प्रदेशात पक्षाचा आमदार होता. मुंबई पोलिसांनी मात्र या आंदोलकांवर कारवाई करत पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी, अतीक अहमद आणि इतर आदोलकांना आर्थर रोड तुरूंगात पाठवले. 


आर्थर रोड तुरूंगाबद्दल....


आर्थर रोड जेल हे ब्रिटिशांनी 1926 साली बांधले. आर्थर रोड तुरुंग हे शहरातील सर्वात जास्त गजबजलेल्या परिसरात आहे. या तुरूंगाची क्षमता 800 कैद्यांची आहे परंतु सध्या या तुरुगांत मर्यादेपेक्षा अधिक म्हणजे चार पट  कैदी आहेत. सध्या तुरुंगात 3000 कैदी आहेत. देशासाठी लढणारे अनेक क्रांतीकारक  या तुरूंगात कैद होते आणि याचा उल्लेख जॉर्जी रॉबर्ट यांनी लिहीलेल्या 'शांताराम' या पुस्तकातदेखील आढळून येतो. 


अतीकचा आर्थर तुरूंगामधील प्रवास...


अतीक आर्थरमधील तुरूंगात असताना स्वाती साठे या तुरूंगाच्या अधीक्षक होत्या. साठे या अत्यंत शिस्तबध्द आणि कठोर अशा अधीक्षक होत्या. त्यांच्यासाठी तिथे आलेला प्रत्येक गुन्हेगार हा कैदी होता. साठे यांनी अतीक आणि अबू आझमी यांना जिथे सर्व राजकीय नेत्यांना ठेवले जाते अशा सर्कल नं 1 येथे आणि इतर आंदोलकांना वेगळ्या ठिकाणी ठेवले. पण अतीक तेव्हा आमदार असल्यामुळे तुरुंगात खास गोष्टींची मागणी करत होता. त्याला त्याच्यासोबत एक स्वयंपाकी ठेवायचा होता ज्याला साठे यांनी विरोध केला. "मी इतरही तरुंगात होतो मात्र कधी कोणीची माझ्याबरोबर अशी वागणूक करण्याची हिंमत झाली नाही" असे रागात म्हणाला.  "तुला काय वाटलं इथेही तुला मुजरा केला जाईल? जर बेशिस्त वागण्याचा प्रयत्न केला तर मी तुला 'अंडा सेल'मध्ये पाठवेन" असे साठे यांनी ठणकावून सांगितले.अबू आझमींना साठेंविषयी माहिती होती आणि त्यांनी अतीकला त्यांच्याशी न भांडण्याचा सल्ला देखील दिला होता.  सलग दोन दिवसांच्या वादानंतर अतीकला शेवटी तुरूंगात जमिनीवर झोपायला लागले आणि तेच अन्न खावे लागले जे इतर कैदी खात होते. त्याला तुरूंगातील सगळ्या शिस्तीचे पालन करावे लागत होते. 1993 साली मुंबईवर बॉम्बस्फोट हल्ला केलेले आरोपीदेखील आर्थर रोड तुरूंगात होते आणि अतीकने त्यांना भेटण्याची परवानगी मागितली. साठेंनी ती परवानगी नाकारली. 
अतीकने तेव्हा साठे यांच्या कामाचे निराक्षण केले. साठे यांनी अगदी व्यवस्थितपणे तुरूंगाती शिस्त पाळली. कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा आणि भ्रष्टाचारास तुरूंगात प्रोत्साहन देण्यात आले नाही. तेव्हा अतीकला साठेंच्या कामाचे खूप कौतुक वाटले. 


अतीक जामीनावर सुटला. त्यावेळी त्याने साठे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामाचे कौतुक केले. 'तुरूंग असा असावा, आम्ही सगळे इथे वात्रट लोकं आहोत ज्यांची पैसा ही ताकद आहे. पण तुमच्या सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची उत्तर प्रदेशातील तुरूंगात गरज आहे." अतीकने आर्थर रोडमधील तुरूंगात कैदी तयार करत असलेल्या वस्तू या उत्तर प्रदेशातील तुरुंगात विकण्याचा प्रस्ताव देखील मांडला. साठे यांनी अतिशय शांतपणे उत्तर देत हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सरकारला आहे असे म्हटले होते.