>> गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड प्रतिनिधी


आतापर्यंत तिचे अकरा वाढदिवस साजरे झाले होते. पण या वाढदिवसाची बात काही और होती.. तिकडे पोलीस बँड पथक या मुलीला मानवंदना देत होतं.. हॉस्पिटलचे कर्मचारी केक घेऊन वाढदिवसाच्या तयारीला लागले होते.. डिस्चार्जची बातमी कव्हर करायला आलेले पत्रकार मोठ्या कुतूहलतेने हे सगळं बघत होते.. मी पण पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या डिस्चार्जची बातमी करायला गेलो होतो..


बीड शहरातील कोविड 19 हॉस्पिटलमधून तिचे अलगत पावलं बाहेर पडत होते. तसा पोलीस बँडने ठेका धरला.. उपस्थित सगळ्यांचेच हात जोडले गेले आणि हलक्या पावलांनी तिने दहा दिवसांत पहिल्यांदाच दवाखान्याच्या बाहेर पाऊल टाकलं होतं.. उपस्थित सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.. येऊन एका केक ठेवलेल्या स्टूल समोर येऊन ती उभी राहिली आणि मी रिपोर्टिंग करायला सुरुवात केली.. मी थोडावेळ थबकलो.. कॅमेरामन त्याच चिमुकली वरती कॅमेरा लावून उभा होता.. मला बोलायला सुरुवात करायची होती, तरी कॅमेरा काही केल्या माझ्याकडे वळत नव्हता.. कारण त्यांनंही पहिल्यांदाच इतक्या जवळून कोरोना रुग्णांची शूटिंग करायला सुरुवात केली होती..


माझ्या समोर दहा दिवसापूर्वी कोरोना झालेली एक बारा वर्षांची चिमुकली हातामध्ये चाकू घेऊन केक कापण्यासाठी उभी होती.. मी बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस एरवी तणावानं भरलेल्या प्रांगणामध्ये बँडचे सूर घुमू लागले होते.. एक महिला डॉक्टर समोर आल्या आणि त्यांनी केक कापून त्या चिमुकलीला भरवायला सुरू केली.. कोरोणा रुग्णाच्या संपर्कात जाऊ नये म्हणून काय काय न करणारे आपण.. या चिमुकलीने मात्र कोरोनावर मात करून इतके लोक एकत्र आणले होते..


दहा दिवसांपूर्वी ज्या वेळी बारा वर्षाची मुलगी या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आली, त्यावेळी ती एकटीच होती.. दोन दिवसांनी तिची आईसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह म्हणून या रुग्णालयांमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर मात्र तिला आधार मिळाला होता.. आज आपल्या लेकीचा वाढदिवस आहे हे त्या माऊलीला माहित होतं.. मात्र संशयानं भरलेलं वातावरण आणि प्रत्येक पावलागणिक जाणवणारी अनामिक भीती यात ती आपल्या या काळजाच्या तुकड्याला छातीला तरी लावू शकली असेल का?


आज ज्यावेळी आपली मुलगी कोरोनाला हरवून हॉस्पिटलमधून बाहेर पडत होती.. त्यावेळी तिच्या स्वागताला पोलीस बँड पथक होतं आणि समोर ठेवलेला केक तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ठेवला होता. हे बघून नक्कीच त्या माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असतील.. तिच्या जन्मापासून अकरा वेळा वाढदिवस साजरा झाला असेल पण हा वाढदिवस तिच्या आयुष्यात विसरू शकेल असं तिच्या डोळ्यावरून तर वाटत नव्हतं..


एरव्ही कोरोनाची पुसटशी कल्पना आली तरी पोटात गोळा उठायचा. मात्र आज कोरोनाला हारावणाऱ्या त्या मुलीचे बाय करणारे हात मला आताही आठवतायेत..माझ्यासहित तिला चीअरअप करणारे प्रत्येकजण आता पुढे सरसावले होते.. कोरोनाचे संकट मोठे असले तरी आता त्याला घाबरून चालणार नाही.. हाच तर संदेश त्या मुलीने दिला होता.. जर बारा वर्षांची ही चिमुरडी कोरोनाला हरवून सहीसलामत बाहेर पडत असेल तर मग तर कोरोनाशी मुकाबला करणे शक्य आहे..


मागच्या दहा बारा दिवसांपासून या हॉस्पिटल परिसराच्या बाजूला मी फक्त भीतीचं वातावरण बघितलं होत.. जिथं आलेला प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाकडे संशयाने बघत होता तिथं आज मात्र लोक हसत हसत एकत्र आले होते.. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हर एक प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी या चिमुकलीसारखा हौसला असणे सुद्धा तितकेच महत्वाच आहे..