गिरगाव...चाळसंस्कृती ते टॉवरसंस्कृती असा प्रवास फाईव्ह जीच्या वेगाने झपाट्याने करणारं सणसंस्कृतीचं माहेरघर. या गिरगावातल्या गणेशोत्सवाचा उत्साह, शान काही औरच असते. यंदाचाही गणेशोत्सव असाच चैतन्यात, उत्साहात पार पडला. हिंदी सिनेसृष्टीतील बुजुर्ग 82 years young अभिनेते जितेंद्र याच गिरगावातले. गिरगावातल्या श्याम सदन या आमच्या चाळीत (पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग) त्यांनी वयाच्या १८-२० वर्षांपर्यंत वास्तव्य केलं. आजच्या घडीला सुमारे ६४ वर्षे ही बिल्डिंग सोडून जाऊनही त्यांचं या ठिकाणच्या गणेशोत्सवाबद्दलचं, या चाळीबद्दलचं प्रेम तितकंच घट्ट आहे, ओलावा तितकाच आहे. जितेंद्र यांच्या याच गिरगाव भेटीचा, आमच्या बाप्पांच्या दर्शनासाठी ते आले होते, तेव्हाचा एक व्हिडीओ खूप वायरल झालाय. अनेक ग्रुप्सवर आणि वैयक्तिकही मला अनेक मंडळींनी तो पाठवलाय. लोक व्हिडीओवर भरभरुन व्यक्त होतायत. सेलिब्रिटीपदाची झूल बाजूला ठेवून आमच्यासह वावरणारे जितेंद्र सगळ्यांनाच भावले. मीही त्यांना इतकी वर्षे पाहतोय, त्यांच्यातल्या साधेपणाचं, आपलेपणाचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढतंच राहिलंय.
कोरोना काळ वगळता इतकी वर्षे सातत्याने ते बाप्पांच्या दर्शनाला आवर्जून येतायत. आज आमच्या या इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प सुरु आहे. त्यामुळे इमारतीच्या जागेऐवजी बाप्पा जवळच्याच शाळेच्या हॉलमध्ये यंदा विराजमान झालेले. यावर्षीही बाप्पांच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणेच जितेंद्र पोहोचले. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, तुम्ही सातत्याने दरवर्षी येताय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यावर जितेंद्र बाप्पांना हात जोडत म्हणाले, मी नाही आलो, तो मला घेऊन आलाय. मग, बाप्पांची आरती करुन रवाना होताना म्हणाले, मला आपल्या मूळ वास्तूत जायचंय. त्यांची आलिशान कार आमच्या इमारतीचं जे मूळ लोकेशन आहे, त्या ठिकाणी थांबली. आम्हाला वाटलं, काच खाली करुन एक नजर टाकून ते रवाना होतील. तर, ते दरवाजा उघडून खाली उतरले. केवळ नुसते तिथेच थांबले नाही तर, तिथे जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली. ती वास्तू जणू डोळ्यात भरभरून साठवली, न्याहाळली. कदाचित इतक्या वर्षांच्या विखुरलेल्या आठवणी ते वेचत होते. डोळ्यांनी आणि मनानेही. दाटलेल्या कंठाने म्हणाले, माझ्या आठवणी गेल्या सगळ्या, याचं मला खूप दु:ख झालंय. पण तुम्हाला मोठं घर मिळणार याचा मला खूप आनंद आहे. एकाच वेळी चाळीसोबत असलेली नात्याची वीण आणि इथल्या माणसांशी असलेला आपुलकीचा धागा त्यांनी जपल्याचं दर्शन घडलं.
मग आम्हीही मूळ चाळीतल्या उत्सवाच्या आठवणींमध्ये दंगून गेलो. जितेंद्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी यायचे तो दिवस आठवू लागलो. त्यांची कार आमच्या गेटमधून एन्ट्री घ्यायची. मग चाळीचे जिने चढून जितेंद्र त्यांचे मित्र राव, कुडतरकर यांच्या घरी जायचे. त्यांचे आणखी एक स्नेही विजू पाटकर यांच्याशीही त्यांचा संवाद होत असे. जो आजही कायम आहे. एका वर्षानंतरच बहुदा ते या सर्व मित्रांना भेटत असावेत. तरीही वावरण्यातली, बोलण्यातली सहजता अशी की, शेजारच्याच घरातून भेटायला आलेत. मैत्रीचं नातं असंच असतं काळाच्या भिंती ओलांडून एकमेकांना बिलगणारं. त्यावेळी जितेंद्र आपल्या मित्रपरिवाराला भेटून पुन्हा आमच्या इमारतीच्या उत्सव मंडपात येत. मग जितेंद्र यांच्या हस्ते पहिली आरती होई आणि ते रवाना होत. हा सारा आठवणींचा पट आमच्याही मनात उलगडला. त्यावेळच्या आरतीवेळी लावलेल्या कापराचा गंध आणि उदबत्तीचा सुगंध आजही मनात दरवळून गेला.
माझी खात्री आहे, जितेंद्र यांच्याही मनात इथल्या वास्तव्यातल्या आठवणींनी अशीच गर्दी केली असणार आणि ती गर्दी त्यांना आजही भेटायला येत असलेल्या फॅन्सच्या संख्येलाही टक्कर देणारी असणार. काही मिनिटं त्यांनी ही वास्तू अत्यंत बारकाईने निरखून पाहिली. मग परत आपल्या गाडीकडे निघाले, आम्हाला नव्या वास्तुसाठी शुभेच्छा देऊन. तेव्हा त्यांच्या आवाजातला गहिवर गॉगल लावलेल्या डोळ्यातून व्यक्त झाला असणार हे आम्ही समजून गेलो. जाताना ते इथल्या फ्लॅशबॅकची रीळं सोबत घेऊन गेले. याआधी जेव्हा ते इथे येत असत. तेव्हा त्यांनी अनेकदा गणेशोत्सवातील आठवणींबद्दल सांगितलंय. उत्सवातील नाटकांसाठीच्या तालमी, तेव्हाचे सीनीयर्स कसे आम्हाला तालमीच्या रुमच्या बाहेर ठेवायचे, आम्ही कसे मग दरवाजावरच्या झडपेतून डोकावायचो. सारं सारं ते सांगत असत. आज जेव्हा त्यांनी ही वास्तुची जागा निरखून पाहिली तेव्हाही त्यांच्या मनाच्या झडपेतून या क्षणांचं दर्शन त्यांना झालं असणार. बाप्पांसाठीच्या उत्सवाच्या स्टेजवर घालवलेले क्षण पाहून त्यांना नक्कीच भरुन आलं असणार.
बाप्पांच्या उत्सवाची जादू म्हणा, महती म्हणा, प्रेम म्हणा, असंच आहे. जे साऱ्यांना भक्तीच्या धाग्यात, स्नेहाच्या बंधात विणून ठेवतं. पाचव्या दिवशी आमच्या या बाप्पांचं विसर्जन झालं. तेव्हा ऑफिसची ड्युटी असल्याने त्या क्षणांना मी मुकलो. तरीही मित्रपरिवाराने ऑनलाईन कॉल केल्याने मला दर्शन मला झालंच. शेवटची आरती, मग आमच्या बिल्डिंगसमोरून गेलेली विसर्जन मिरवणूक, तिथे पुन्हा झालेली छोटी आरती. हे क्षण सोनं, हिरे, माणिक, मोती साऱ्यांहून मोलाचे आहेत. या क्षणांची मूल्यगणना करण्यासाठी कोणतीही करन्सी अस्तित्त्वात नाही, येणारही नाही. बाप्पांच्या या भक्तीने जितेंद्र यांच्यासह आम्हालाही एकमेकांशी जोडून ठेवलंय. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धीचा झगमगाट असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतला बुजुर्ग अभिनेता चाळीतल्या गणेशोत्सवात, इथल्या साधेपणात, इथल्या सर्वसामान्य माणसांच्या सहवासातील क्षणांमध्ये समाधानाच्या मोहरा टिपतो, सोबत नेतो आणि आम्हाला त्यांच्या पॉझिटिव्हिटीची ऊर्जा देऊन जातो. आम्हाला बाप्पांसारखीच त्यांच्याही भेटीची पुढच्या वर्षीची ओढ लावून जातो. बाप्पांना आणि जितेंद्र यांच्या भक्तिमय प्रेमाला त्रिवार वंदन.