पै. गणेश मानुगडे

महाराष्ट्रात उन्हाळी कुस्ती मोसमास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तालमीत सराव करणाऱ्या मल्लांची मनगटे शिवशीवू लागली आहेत. महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रेत मर्दुमकी व पुरुषार्थ यांचे यथार्थ दर्शन घडवणारा 'कुस्ती' या खेळाची भव्य मैदाने प्रतिवर्षी आयोजित होतात. या मैदानात कुस्ती खेळून मिळणाऱ्या बक्षिसावर वर्षभर मल्लांच्या खुरकाचा व इतर खर्च मिळतो. लोकाश्रयावर चालणारी ही कुस्ती हळूहळू बदलाच्या मार्गावर येत जरी असली तरी आर्थिक तरतूद मिळवण्याचे प्रभावी व हक्काचे साधन म्हणून आजही यात्रा जत्रेच्या कुस्त्या हेच होय.फार कशाला या शतकाचा जरी अभ्यास केला तर ब्रिटिश राजवट अस्तित्वात असताना भारतवर्षातील अनेक संस्थानांनी कुस्तीला राजाश्रय देऊन टिकवून ठेवले. संस्थानिक राजांनी राज्याच्या खजिन्यातून आखाडे बांधले व मल्लांच्या खुरकाची तजवीज केली.

पूर्वीच्या काळी ज्या राजांनी संस्थानाकरवी मल्लविद्या जतन केली त्याच प्रदेशात कुस्ती आज बहुतांशी खेळली जाते. याचे उदाहरण म्हणजे पुणे व कोल्हापूर. पुण्यात शिवरामजीवाले व चांदुभाईवाले या दोन गटात इर्षेने खेळली जाणारी कुस्ती तर कोल्हापूरात खासबागेत प्रत्येक शुक्रवारी शाहू महाराजांच्या धीपत्याखाली खेळली जाणारी मैदाने हीच पुढे आली व टिकून राहिली. याला बऱ्याच विभागातील मल्लविद्येचा अपवाद सोडला तर इथेच कुस्तीची बीजे रुजली. स्वातंत्रोत्तर काळात हीच राज्याश्रयावर असणारी कुस्ती व्यावसायिक झाली. थिएटर व सर्कस मध्ये लाखो रु.तिकीट काढून लोक कुस्त्या पाहत असे. यानंतर मात्र मनोरंजनाची इतर साधने झपाट्याने वाढल्याने कुस्तीकडे लोकांनी पाठ फिरवली व लाखात जाणारा हा आकडा कमी होत आज केवळ नाममात्र उरला. पण,कुस्ती ही आमच्या केवळ मनोरंजनाचा भाग नव्हता तर संस्कृतीचे प्रतीक होते म्हणून आमच्या रक्तात असणारी कुस्ती आजही काळाची अनंत वाट चालून जिवंत राहिली. गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा हे पैलवान मंडळींच्या आर्थिक उत्पनाचे सध्याचे तरी एकमेव साधन आहे.

सध्या 'कोरोना' विषाणू साथीने सारे जग हादरून गेलेले आहे.अशा साथीच्या रोगांची मालिका आपल्याला नवीन जरी नसली तरी आज प्रगत असणारी माहिती प्रसारणाची माध्यमे या रोगाविषयी वेगाने जनजागृती करत आहे. पूर्वी प्लेग, पटकी सारख्या रोगात अनेक लोकांचा बळी गेला तसा बळी आत्ता जाऊ नये म्हणून शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे व या रोगाचा फैलाव होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील बहुतांशी यात्रा जत्रा न करण्याचे आदेश व सरळसरळ कुस्ती मैदाने न भरवण्याच्या सूचना प्रत्येक ग्रामपंचायत व महानगरपालिका यांच्याकडे देण्यात आल्या असल्याने या कुस्ती मोसमातील किमान 80% मैदाने रद्द होण्याच्या मार्गावर अथवा स्थगित होण्याच्या मार्गावर आहेत.

आत्तापर्यंत रद्द झालेली मैदाने व स्पर्धा

  • पुणे महापौर केसरी - या स्पर्धेत 1 हजारपसून 15 लाख इतकी प्रचंड बक्षिसे असतात.

  • सांगली महापौर केसरी - 500 रु.पासून 10 लाखा पर्यंत बक्षिसे

  • कोल्हापूर महापौर केसरी - 500 रु.पासून 10 लाख पर्यंत बक्षिसे


मैदाने

  • खराडी कुस्ती मैदान पुणे - 1 हजार ते 20 लाख पर्यंत बक्षिसे.

  • फुरसुंगी पुणे - 1 हजार ते 20 लाख पर्यंत बक्षिसे.




एकीकडे कोरोनाच्या साथीने जगभर थैमान घातले असून यावर प्रतिबंध घालणे जसे गरजेचे आहे. तसेच गावोगावी भरणारी मैदाने जर रद्द झाली तर महाराष्ट्राच्या मल्लांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हे मात्र नक्की. मी स्वतः एक एक पैलवान अशी पाहिली आहेत की त्यांनी तर मैदानी कुस्त्या बंद केल्या तर स्वतः तर जगू शकणार नाहीतच शिवाय त्यांच्या घरावर सुद्धा उपासमार होणार आहे. कुस्ती हा गरिबांचा खेळ आहे. गरीबाघरची मुलंच कुस्तीकडे येतात. मैदानी कुस्तीतून मिळणारी बक्षिसे ही त्यांच्यासाठी खुराक व घरगाडा चालवण्यासाठी उपयोगी पडतात. मोठ्या जोडीतील मल्लांचे एकवेळ ठीक मात्र जे नुकतेच उभारी घेणारे पैलवान आहेत त्यांचे या कोरोनामुळे अतिशय नुकसान होण्याच्या मार्गावर आहे.

तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!

भारत शासनाने नुकतेच कोरोना साथीला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. या दरम्यान अनेक आचारसंहिता जारी करण्यात आल्या. यातून ज्यांचे नुकसान होईल त्यांना लाखो रुपयांची भरपाई म्हणून जारी करण्यात येतील मात्र ज्या कुस्तीवर लोकसंख्येचा मोठा भाग अवलंबून आहे. ज्यांच्या नुकसान भरपाई बाबत कोणतीही तरतूद नाही याची खंत वाटते. केवळ कोरोना नव्हे तर गतवर्षी महापूर आल्याने मैदाने रद्द होत होती तर कशी सरासरी पर्जन्य कमी पडल्याने दुष्काळ असल्याने मैदाने रद्द होत असायची. मैदाने रद्द होण्याने सरळसरळ कुस्ती व पैलवान या पेशावरवरच कुऱ्हाड पडते. जरी मैदाने रद्द होत असली तरी चालतील मात्र ही कोरोना साथ आटोक्यात यावी हे मात्र खरे.उपाशी झोपल्याने कदाचित मृत्यू लवकर येणार नाही मात्र या विषाणूमुळे मृत्यू तर येईलच मात्र तमाम मानवजात संकटात येईल. आजही काही गावात खेड्यात कुस्त्या होत आहेत. पैलवान मंडळींनी सुद्धा आता स्वतःच्या सुरक्षीततेची काळजी घ्यायला हवी.



गावोगावी कुस्त्यासाठी प्रवास करणाऱ्या मल्लांच्यासाठी काही सुरक्षिततेविषयी सल्ले

पाणी : पिण्याचे पाणी स्वतःचे स्वतःसोबत असावे.
मास्क : स्वतःच्या वाहनाव्यतिरिक्त प्रवास असेल तर विशिष्ट दर्जाचे मास्क वापरणे गरजेचे.
सॅनिटायजर सोल्युशन जवळ असावे. प्रत्येक वेळी त्याने हात स्वच्छ करावेत.
स्वतः जर सर्दी पडसे सारखे आजार असतील तर कुस्ती टाळावी. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
आपला खुराक स्वतःजवळ असावा. ऐनवेळी विकत घेणे टाळावे.
शक्यतो गाडीतून उतरू नये.कुस्तीच्या वेळीच उतरावे. सार्वजनिक वाहनाने येणाऱ्यांनी मात्र योग्य जागा निवडून तिथेच थांबावे.
स्वतः स्वच्छता पाळावी व इतरांना पाळायला लावावी.
BLOG | तांबडी माती : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी?

यासह ज्या यात्रा कमिटी व कुस्ती कमिटी असतील त्यानी सुद्धा खालील नियम पाळावे.

मैदानाची माती निर्जंतुक आहे का पहावे. नसेल तर ती जरूर निर्जंतुक करून घ्यावी.
मैदानात मारले जाणारे पाणी स्वच्छ असावे. क्लोरीनयुक्त असावे.
प्रत्यक्षात कुस्ती मैदानावेळी येणारे कुस्ती शौकीन यांच्यात योग्य अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मैदान व प्रेक्षक यात 10 ते 15 फूट अंतर राखावे.
मैदानात रुग्णवाहिका असावी.एखाद्या संस्थेकडून मास्क व सॅनिटरी सोल्युशन कुस्ती शौकिनाना देता येते का पहावे.
सर्दी, खोकला, शिंक असणाऱ्या व्यक्तींनी मैदानात बसू नये अशा सूचना व्हाव्ह्यात.तश्या सूचना माईकवरून द्याव्यात.

कुस्ती शौकिनांसाठी सूचना.

सर्दी पडसे खोकला असल्यास मैदानच नव्हे तर कोणत्याच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
स्वतः स्वचतेचे पालन करून इतरांना प्रोत्साहित करावे.

पैलवान मंडळी,हा काळ आपल्यासाठी वाईट आहे. मात्र,इतिहास साक्षी आहे की आपल्याकडे संकटे दीर्घकाळ टिकत नाहीत. हा काळ सुद्धा निघून जाईल.तोवर आपली कुस्ती मेहनत, दैनंदिन दिनचर्या सुरक्षित पार पाडावी व येणाऱ्या काळाची वाट पहावी.