>> डॉ.शिवरत्न शेटे, एम.डी.(आयुर्वेद), शिवव्याख्याता, दुर्गभ्रमंतीकार


माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचा 5 ऑगस्टला कोरोनामुळे वयाच्या 70 व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला. अगोदरच अनियंत्रित मधुमेह होताच. राजस्थानमधून नगरला येऊन स्थायिक झालेला अनिल भैय्या पावभाजी विकायचा. कडवट हिंदुत्ववादी... स्वाभाविकच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जुळला आणि शिवसेना शहरप्रमुख ते सातत्याने सलग 25 वर्षे (1990 ते 2014) आमदार म्हणून निवडून येणं, युतीच्या काळात महसूल राज्यमंत्री चित्रपटात शोभावी अशीच सत्यकथा! नगर सारख्या साखर सम्राटांच्या जिल्ह्यात ते सुद्धा स्वतःच्या हातात एकही संस्था नसताना!
लोकांच्या ह्रदयावर राज्य करणं म्हणजे काय? याचं उत्तर भैय्या या शब्दात होतं.


भैय्या मला गॅस सिलेंडर देत नाहीत. एखाद्या अनोळखी बहिणीचा फोन. Online पद्धत नव्हती तेव्हा काळाबाजार होत होता. मोठ्या रांगा, अशा काळात गोदाम, दुकानं फोडून गोरगरिबांना नियमांने गॅस वितरण करायला लावणारा भैय्याच होता.


भैय्या लव्ह जिहाद फूस लावून पोरीला पळवून नेलं वाचवा. एखादा असहाय्य पिता धाय मोकलून रडत शिवसेना कार्यालयात कैफियत मांडायचा. अन क्षणार्धात, तळ पायाची आग मस्तकात जात, जणू हिंदू भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी. भैय्या नावाच्या एकट्या भावानेच घेतलीय. ताबडतोब मारुती ओमनी गाडीत, प्रसंगी शस्त्र संपन्न बसून, हा तडक वाघासारखा निघायचा आणि त्या धर्मांध मुसलमानांच्या तावडीतून हिमतीने, त्या बहिणीला सोडवून आणत. तिच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करायचा.


वाघाच्या काळजाचा भैय्या
गुलमोहर रोडवरील कलानगर चौकाजवळील कैक एकराच्या वादग्रस्त जमिनीवर, रात्रीतून बांधकाम करणे सुरू आहे आणि बरेच धर्मांध लोकांचा जमाव तिथे आहे. भैय्या तातडीने या हा फोन एक जागरूक नागरिकाने केल्यावर सकाळी 6 वाजता भैय्या आला. 500 धर्मांधांचा जमाव होता, त्यात एकटा भैय्या घुसला. बांधकाम ओलं होतं. त्या दरवाज्यावर लाथ मारली, त्यासरशी दरवाजा पडला, जमाव चिडला, अवघ्या 15 मिनिटात 2000 जणांचा जमाव चालून आला. दरम्यान भैय्यांनी कलेक्टर, पोलीस अधीक्षक सहित धर्मादाय आयुक्तांना फोन लावून बोलवून घेतलं. चौकशी लावली आणि होऊ घातलेले धर्मादायाच्या गोंडस नावाखाली होऊ घातलेले अतिक्रमण टाळले.


हजारों धर्मांधांच्या जमावात एकट्याने निःशस्त्र घुसून बांधकामावर लाथा घालणं, हे ऐऱ्यागैऱ्याचं कामच नाही. त्यासाठी वाघाचं काळीज लागतं. जगात सर्व काही पैशाने विकत मिळू शकते पण धैर्य आणि हिम्मत रक्तात असावी लागते. भैय्यांच्या कार्यपद्धतीवर कोणाचे मतभेद असू शकतात, परंतु भैय्या कायम जाहीर म्हणायचा. "एखादा रस्ता किंवा धरण 2 वर्षात होईल किंवा 5 वर्षात होईल हरकत नाही. विकास ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. परंतु सामान्यांचं संरक्षण आणि नगरची सुरक्षा आणि भयमुक्त नगर हाच माझा श्वास आहे.


भैय्यांच्या मृत्यूनंतर कोरोना पॅनडेमिक अॅक्ट लागू असल्याने 20 लोकांचीच अंत्यसंस्काराला मर्यादा असताना अशा अवस्थेतही 5000 ची गर्दी जमली. (अन्यथा किमान एक लाख लोकं आली असती) पोलीस आवाहन आणि जबरदस्ती करीत असतानाही. शे पाचशेचा समुदाय,ओक्साबोक्शी रडत म्हणत होता, आम्हाला कोरोना झाला तरीही चालेल. आमच्या आयुष्याचा शेवट झाला असता अशा वाईट प्रसंगात भैय्या आमच्या पाठीशी उभा होता. आज त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगात सामील व्हायला आम्हाला अडवू नका. भैय्यांचा शिवसैनिक शिष्य आणि पारनेरचा विद्यमान राष्ट्रवादीचा तरुण आमदार निलेश लंके श्रद्धांजली वाहताना ढसाढसा रडत होता.


जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना तालुका प्रमुख संदेश कार्ले तर रडत रडत कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला. जिवंत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने यशस्वी करताना ज्या गगनभेदी घोषणा दिल्या त्याच भैय्यांच्या पार्थिव असलेल्या गाडीसमोर त्याच घोषणा देत असताना त्या संदेशदादाच्या मनात आणि ह्रदयात काय कालवाकालव होत असेल याची कल्पना न केलेली बरी. जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर, दुःखाश्रु गिळत थोरल्याप्रमाणे सर्वांना सावरून घेत होते. प्रथम महापौर निष्ठावान शिवसैनिक भगवान फुलसौंदर कमालीचे अस्वस्थ होते. माजी आमदार विजय औटी, संभाजी कदम, घनश्यामअण्णा शेलार, रावसाहेब खेवरे पासून दिलीप सातपुते, एवढंच काय जे शिवसेनेला सोडून गेले होते ते ते अंबादास पंधाडे, श्रीराम एंडे, बाबूशेठ टायरवाले पासून सर्वजण काल मात्र हळवे झाले होते.


रस्त्यावरचे हमाल, हातगाडीवाले, फुलवाले छोटे मोठे विक्रेते, काल धाय मोकलून रडत होते. एक गवंडी त्या अंत्ययात्रेत रडत होता. त्याला विचारले तेव्हा तो भैय्यांचा फोन नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये दाखवून, गहिवरून सांगत होता. साधी गाडी पोलिसांनी अडविली तरीही मी डायरेक्ट फोन करायचो आणि भैय्या त्या पोलिसांना सांगायचे की, जाऊ दे रे बाबा सोडून दे त्याला. विसरला असेल लायसन्स घरी, माझा माणूस आहे. अशा ज्याचं कोणीच वाली नव्हतं अशा सर्वांना घरचा थोरला गेल्याचं पोरकं करणारं दुःख होत होतं. अडला नडला, अनोळखी सुद्धा त्यांच्याकडे समस्या घेऊन गेला तरीही अशा लोकांच्या कामाखातर बहुतांश वेळा अनिलभैय्या आमदार असताना देखील त्यांच्या दुचाकी गाडीवर मागे बसून, सोबत जाऊन त्यांना जागीच न्याय द्यायचा हीच त्यांची कामाची पद्धत होती. त्याने कायम गोरगरिबांचा आशिर्वादच घेतला. कोणाची जमीन जागा बळकावली नाही. सत्तेचा गैरवापर करून कोणाचं शोषण नाही की कोणावर जबरदस्ती केली नाही की कोणाचा तळतळाट घेतला नाही की 25 वर्षे आमदारकी आणि एकवेळ मंत्रिपद असतानाही, पुढच्या पीढीसाठी कोणत्याही संस्था, कारखाने, रग्गड कमाईचे स्रोत निर्माण केले नाहीत.
असा हा सामान्यांचा सामान्य म्हणून जगलेल्या भैय्याला नगर जिल्हा आणि त्यांच्या सानिध्यात आलेला कोणताही माणूस विसरू शकत नाही.


राजकीय पक्ष तिकीट वाटप करताना जातीची मते किती हा निकष लावत असताना केवळ 110 मतं राजपूत समाजाची असताना बाळासाहेबांनी गुणवत्तेला प्राधान्य दिल्याने सलग 25 वर्षे एक राजस्थानी पावभाजीवाला सत्ताधीश बनला, तो केवळ शिवसेना जात पात बघत नाही या सिद्धांतामुळेच. साधारणपणे 20 दिवसांपूर्वी अनिल भैय्यांचा फोन आला होता. म्हणाले
"डॉक्टर सहज आठवण आली म्हणून कॉल केला. जुन्या काही आठवणीत आम्ही रमलो आणि मी शब्द दिला म्हटलं, आमच्या सोलापुरात कोरोना सध्या तीव्र आहे. जिल्हासीमा प्रवासबंदी आहे, लवकरच भेटायला नगरला येईल." क्षणभर सुद्धा वाटलं नव्हतं, की ज्या कोरोनाबद्दल बोलत होतो, तोच यमदूत म्हणून भैय्यांना घेऊन जाईल. राहुरी फॅक्टरी येथे आयुर्वेद कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना जाता येता ते यायचे तर मी नगरला गेल्यावर त्यांना आवर्जून भेटायचो, पहिल्यांदा 16 व 17 मार्च 2006 ला लालटाकीजवळ मेघनंद लॉन्सवर, छत्रपती शिवरायांवर माझे दोन दिवस व्याख्यान त्यांनी आयोजित केले होते. त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांनी माझ्या प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले होते.


माझे त्यांच्याशी असलेले नाते घट्ट होत गेले. कल्याणराव शहाणे यांनी सुरतला भैय्यांच्या प्रमुख उपस्थितीत 2007 ला शिवजयंती निमित्ताने (सोनार) माझे व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा अनिलभैय्या मी, पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके (आज राष्ट्रवादीचा आमदार), संदेशदादा कार्ले सर्वजण बोलेरो ने सुरतला गेलो होतो. 3 दिवसांत खूप वैचारिक देवाण घेवाण झाल्याने नात्याची वीण घट्टच झाली. आता पाणावलेल्या डोळ्यासमोर सर्व तरळून जाते. आता उरल्या फक्त आठवणी!


भैय्या तुम्हाला डायबेटीस आहे काळजी घेत जा, असं मी तर वारंवार सांगायचो. शेवटची प्रत्यक्ष भेट मात्र फेब्रुवारीत, हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख अमित धाडगे यांच्यासोबतच झाली.
कोरोनासारख्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरील अनाथ, गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून भैय्याने शिवसेनेतर्फे अन्नदान मात्र कायम ठेवलं. कोरोना संकटात इतर नेते घाबरून असताना हा लोकांचा नेता मात्र कायम लोकांमध्येच राहिला. नगरच्या साईदीप हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी अॅडमिट असलेल्या अनिलभैय्या बद्दल त्यांची शुश्रुषा करणारा, तेथील वैद्यकीय अधिकारी ,
माझा शिष्य डॉ. पार्थ मरकड मला बोलला, "25 वर्षे आमदार असलेले भैय्या उपचारादरम्यान कधीच VIP सारखं वागले नाहीत. आज्ञाधारक सामान्य व्यक्तीप्रमाणे डॉक्टरसहित सर्व स्टाफशी आज्ञाधारक माणुसकीने वागत होते. दुर्दैव त्यांचं की कोरोना कॉम्प्लिकेशनमध्ये रक्ताची गुठळी (embolism) होऊन, अचानक हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीजला ब्लॉक करून, एकाएकी ह्रदयविकाराचा धक्का (Massive Heart Attack) बसून रुग्ण दगावतो म्हणजेच चालता फिरता असणाऱ्या रुग्णावर सुद्धा काही मिनिटात प्राण गमावण्याचा दुर्दैवी प्रसंग येऊ शकतो, भैय्या यात दगावले."


एक मात्र मनाला वाटून गेलं ते म्हणजे त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून कमान नगरकरांनी चढतीच ठेवायला पाहिजे होती. अस्तनीतल्या निखाऱ्यानी घात केलाच परंतु काही मतदारांनी प्रलोभनाला बळी पडत लोकशाही पाळली नाही. माझ्या एका मताने काय फरक पडणार? या बहुतांश मानसिकतेमुळे काही जवळचे मतदार मतदानासाठी बाहेर पडलेच नाहीत आणि उत्तरार्धात सलग दोन वेळा अल्पशा मतांनी पराभूत केलं. तरीही लोकांची रीघ शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या दरबारात असायची आणि आमदार नसतानाही त्यांच्या एका फोनवर सामान्यांची कामं व्हायची आणि
भैय्याला सांगू का? एवढ्या एक वाक्याने सरकारी अधिकाऱ्यांपासून ते कोणीही, गोरगरिबांची अडवणूक न करता, कामं करायचा. हा लोकहितकारी धाक मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कायमच होता.


शिवजयंतीची मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच थाटात भव्यदिव्यच निघाली पाहिजे असं ते नेहमी म्हणायचे ती परंपरा सुद्धा त्यांनी पाळली. आणि मिरवणुकीत शिवसैनिकांच्या समवेत गुलालात न्हाऊन निघालेला भैय्या जेव्हा बेधुंद होऊन नेताजी सुभाष चौकात नाचायचा तेव्हा सत्तरीकडे वाटचाल असलेला तो कधीच वाटला नाही तर तो कायम चिरतरूणच वागला, काल याच अनिलभैय्याची अंत्ययात्रा, पोलिसांच्या विरोधानंतरही आग्रहाने नेताजी चौकात न्यायला भाग पाडली. कारण शिवसैनिकांना याची पुरेपूर जाण होती की, भैय्यांची जिथे जडणघडण झाली, तो त्यांचा बालेकिल्ला नेताजी सुभाष चौक येथे त्यांचं पार्थिव आणल्या शिवाय कावळा शिवणार नाही. एवढा जीव गुंतलेलं ते ठिकाण. ढाण्या वाघाची कायम गर्जना ऐकायची सवय जडलेला चौक आणि डोलाने फडफडणारा भगवा मात्र त्याच अनिलभैय्याचं प्रेत बघून मूक झाला. निःशब्द होऊन आसवं ढाळत श्रद्धांजली वाहत होता.


अनिलभैय्या कायमच लोकांचा आमदार राहिला, सर्वांच्या हक्काच्या भैय्याला भावपूर्ण श्रद्धांजली !!