तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी साधारणपणे संपूर्ण जगामध्ये 70 लाख तर भारतामध्ये 10 लाख लोक मृत्युमुखी पडतात. तंबाखूमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक घटक असतात. तंबाखूच्या ( सिगारेट, विडी, मशेरी, गुटखा, खरा ) सेवनामुळे हृदयरोग, अर्धांगवायू, कर्करोग यासारखे आजार होण्याचा धोका असतो. तंबाखूच्या सेवनामुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटिन मुळे ही सवय सोडणे फार अवघड बनते. व व्यक्ती व्यसनाच्या जास्तच आधीन होतो.


तंबाखूची सवय सोडण्यासाठी भारत सरकार व टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांच्या वतीने 1800 11 2356 ही टोल फ्री सेवा सुरू करण्यात आली आहे. तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीने 1800 11 2356 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तेथे उपस्थित असणाऱ्या समुपदेशकाद्वारे योग्य ते मार्गदर्शन मिळवून तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीने फोन केल्यानंतर समुपदेशकाद्वारे त्यांची प्राथमिक माहिती नोंद करण्यात येते व तंबाखू सोडण्यासाठी विशिष्ट कालावधी ठरविण्यात येतो. त्यांनतर साधारण सात ते आठ फोन करून त्यांना तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.आपणास तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास त्यासाठी आपली मानसिक तयारी असणे गरजेचे आहे, की मला तंबाखू सोडायचीच आहे.


तंबाखू सोडण्यासाठी या हेल्पलाईनद्वारे समुपदेशक खाली नमूद केलेल्या गोष्टी करण्यास सांगतात.




  1.  सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यावे.

  2. आपणास तंबाखू खाण्याची इच्छा होत असल्यास आवळा काडी, विलायची किंवा बडीशेप यापैकी जे उपलब्ध असेल त्याचे सेवन करावे. तसेच कुटुंबातील व्यक्तींबरोबर वेळ घालवावा

  3. दिवसातून दोन वेळेस दात घासणे

  4. आपल्या हाताना च कपड्यांना तंबाखूचा वास येणार नाही याची काळजी घ्यावी

  5. रोज सकाळी फिरायला जावे तसेच शक्य असल्यास प्राणायम करावा

  6. फळांचे सेवन करावे, उदा. संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब, अननस

  7. तंबाखू खाण्याची ईच्छा टाळण्यासाठी आपल्या आवडीचे गाणे ऐकावे, किंवा मित्र - नातेवाईक यांच्याशी गप्पा माराव्यात

  8. शक्य असल्यास हास्यक्लबमध्ये जावे

  9. कुटुंबातील व्यक्तींनी तंबाखू/ सिगारेट/ विडी/ मशेरी/ गुटखा लपवून ठेवावे किंवा फेकून द्यावे.

  10. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीने कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्यावी त्यामुळे तंबाखू खाणाऱ्यांना कर्करोगाचा धोका अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात येईल.


आमच्या इथे हेल्पलाईन सेंटरला आलेल्या फोनच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की, व्यसनाची सवय मित्र, तणावपूर्ण जीवनशैली, रात्रपाळीचे काम किंवा शौचा व्यवस्थित न होणे यासारख्या कारणांमुळे लागलेली असते.


भारत सरकारच्या नियमानुसार 1800 11 2356 हा टोल फ्री क्रमांक प्रत्येक सिगारेट, विडी, तंबाखू, मशेरी, गुटखा, खरा, यांच्या पाकिटांवर छापणे बंधनकारक आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलद्वारे ही सेवा मागील वर्षी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत हेल्पलाईन सेंटरला 35743 लोकांनी फोन केले त्यापैकी 14927 लोकांनी व्यसन सोडण्याची तयारी दाखवली आहे. व 5355 लोक व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे ते खूप आनंदी आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढला असून जीवनशैलीमध्ये बदल घडून आला आहे.


आज 31 मे जागतिक तंबाखू विरोध दिन असल्याने सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी 1800 11 2356 या टोल फ्री क्रमांकाबद्दल इतरांना माहिती सांगावी. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे व फोन करणाऱ्यांची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येते. महाराष्ट्र शासनाद्वारेही ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. चला आपले गाव/शहर तंबाखू मुक्त करूया.