रश्मी उद्धव ठाकरे.. डोंबिवलीच्या पाटणकरांच्या घरातली तरुण मुलगी ठाकरेंच्या घरात सून म्हणून आल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला परिचीत झाल्या. आता पाटणकरांची मुलगी ठाकरेंची सून कशी बनली याचाही एक किस्सा आहे. उद्धव आणि रश्मी यांचं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले ते राज ठाकरेंच्या सख्ख्या मोठ्या भगिनी जयजयवंती यांनी. जयवंती आणि रश्मी ठाकरे मैत्रिणी. हे लग्न काहीसं असं ठरलं.


उद्धव यांच्यासाठी स्थळं पाहणं सुरु झालं होतं. आपल्या लाडक्या दादूसाठी बायको आणि आपल्यासाठी वहिनी शोधण्यात पुढाकार जयवंती यांनीच घेतला. जयवंती आणि उद्धव या भावा-बहिणीचं खास बॉन्डिंग होतं. उद्धव मोठे भाऊ. त्यामुळे काही सांगायचंय, कुठे जायचंय तर जयवंती यांच्यासाठी उद्धव घरातला हक्काचा माणूस.

डोंबिवलीच्या फडके रोडवर राहणाऱ्या मध्यमवर्गीय घरातल्या रश्मी आपल्या मोठ्या भावासाठी जयवंती यांना अगदी परफेक्ट मॅच वाटल्या. त्यांनी रश्मी यांच्याविषयी थेट उद्धव ठाकरेंना सांगितलं. एकदा तरी रश्मी यांना भेटावं असा स्वाभाविक आग्रहही केला. पण उद्धव यांनी हा प्रस्ताव तसा फारसा सिरीअसली घेतला नाही. मग एखादी बहिण जे करेल तेच जयवंती यांनी केलं. रश्मी यांच्या स्थळाची माहिती त्यांनी मीनाताई ठाकरेंना दिली. मीनाताईंनी आमची हरकत नाही पण उद्धवची पसंती हवी असं म्हणतं आईची भूमिका निभावली. मैत्रिणच वहिनी व्हावी ही जयुताईंची इच्छा असल्याने उद्धव आणि रश्मी यांची ओळख होण्यासाठी आणि रश्मी ठाकरे कुटुंबाशी परिचीत व्हाव्यात यासाठी त्यांना घरगुती कार्यक्रमांचं निमंत्रण मिळू लागलं. रश्मी यांचं ठाकरेंच्या घरात येणं-जाणं वाढलं. उद्धव आणि रश्मी यांची ओळख वाढली, पसंती झाली आणि मग रश्मी पाटणकर रश्मी उद्धव ठाकरे म्हणून ठाकरे घराण्याच्या सूनबाई झाल्या. त्यांनी मातोश्रीवर गृहप्रवेश केला.



उद्धव ठाकरेंच्या पत्नी, बाळासाहेब ठाकरेंच्या सूनबाई, आदित्य आणि तेजसची आई आता मिसेस मुख्यमंत्री झाल्या आहेत. ठाकरेंचं घर आणि त्यातल्या व्यक्ती कायमच चर्चेत असतात. कुतूहलाचं एक वलय त्यांच्याभोवती असतं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर असतो. रश्मी ठाकरेही याला अपवाद नाहीत पण त्या मीडियापासून दूर राहतात, कॅमेरापासून सुरक्षित अंतर राखतात. सार्वजनिक व्यासपीठावर सहजी रश्मी ठाकरे दिसत नसल्या तरी पडद्यामागचा त्यांचा राजकीय सहभाग खूप स्ट्राँग आहे. ज्यांनी शिवसेनेचं राजकारण जवळून पाहिलंय, जे ठाकरे कुटुंबियांच्या जवळचे आहेत ते रश्मी ठाकरेंच्या राजकीय निर्णयक्षमतेबद्दल, कुशलतेबद्दल वेल अवेअर आहेत.

स्थानिक राजकारणापासून ते शिवसेनेच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत, त्या निर्णयात त्यांचा "से" कायमच महत्त्वाचा ठरतो असं मत वेळोवेळी व्यक्त होतं. लोकसभेत आमची युती होत नव्हती पण रश्मी ताईंच्या हातची साबुदाणा खिचडी आणि बटाटेवड्यांनी दिलजमाई केली हे जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर व्यासपीठावरुन सांगतात तेव्हा ही वाक्य फक्त टाळ्यांसाठीची नसतात तर जाणकारांना यामधून रश्मी ठाकरेंच्या राजकीय चातुर्य आणि वजनाचाही अंदाज येतो.

1990 च्या काळात मातोश्री निवासस्थान खूप मोठ्या राजकीय घडामोडींचं केंद्र होतं. रश्मी ठाकरेंच्या लग्नानंतर सहा वर्षात राज्यात शिवसेनेचं सरकार आलं. मातोश्री सत्ताकेंद्र बनलं. या काळात रश्मी, ठाकरेंच्या घरात, मातोश्रीवर रुळत होत्या. आदित्य आणि तेजस लहान होते. त्यांच्या संगोपनात रश्मी ठाकरेंचा अधिकाधिक वेळ जायचा. याकाळात एका हाऊसवाईफप्रमाणेच त्यांचं रुटीन होतं. पण मातोश्रीवर राहणं आणि घडणाऱ्या घडामोडींची साक्षीदार बनणं ही रश्मी यांच्यासाठी एक राजकीय शिकवणीचं ठरली असावी. असं म्हटलं जातं की, त्याकाळात ठाकरेंच्या दुसऱ्या सुनबाई आणि रश्मी यांच्या जाऊबाई स्मिता यांचा राजकीय वर्तुळात दबदबा होता. मातोश्रीवर "आवाज" त्यांचाच असायचा. यादरम्यान रश्मी शांत होत्या. त्या पडद्यामागे होत्या. घरातली दैनंदिन व्यवस्था, नवरा आणि मुलं हे त्याचं प्राधान्य होतं. पण बाळासाहेबांची सून असल्याने आणि सत्तेचा रिमोट आपल्याकडे ठेवणाऱ्या मातोश्रीवर राहणं यामुळे राजकीय चर्चा, घडामोडी, डावपेच यापासून त्या अपरिचीत राहिल्या नाहीत.



रश्मी ठाकरेंचा आजचा राजकारणातला वावर पाहता, हा सगळा काळ त्यांनी एका चांगल्या निरीक्षकाप्रमाणे घालवला असंच म्हणावं लागेल. कारण 2012 साली महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेनेने जिंकल्यावर त्यांची मुलाखत घेण्याची दुर्मिळ संधी मला मिळालेली. तेव्हा तुम्ही प्रचारात फराशा दिसत नाही असं विचारल्यावर त्याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग होतं, त्या म्हणाल्या, मी सभांना जाते, पण मला स्टेजवर बसायला आवडत नाही. मी प्रेक्षकांमध्येच बसते आणि ऑब्जर्व्ह करते की कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाची काय रिअॅक्शन आहे. कारण यातून लोकांच्या खऱ्या भावना समजतात, ग्राऊंड रिअॅलिटी लक्षात येते.

जशी उद्धव यांना फोटोग्राफीची आवड आहे तशी रश्मी यांना शास्त्रीय संगीताची. किशोरीताई आमोणकर आणि गुलाम अली त्यांचे आवडते गायक. गझल रश्मी ठाकरेंचा वीकपॉईंट आहे. त्या स्वतःही त्यांच्या अंदाजात गझल गुणगुणत असं त्यांचे स्नेही सांगतात. गुलाम अली यांच्या कॉन्सर्टला जाण्याची रश्मी ठाकरेंची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

2003 सालापासून त्यांचा राजकारणातला सहभाग बऱ्यापैकी वाढला. हा काळ होता शिवसेना विरोधात असण्याचा. पुढच्या तीन वर्षात सेनेला मोठे धक्के बसले. राज ठाकरे, नारायण राणेंनी शिवसेना सोडली. पक्षासोबत कुटुंबालाही मोठे धक्के बसले. याकाळात त्या ठामपणे उद्धव यांच्या पाठीशी होत्या. 2010 सालच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्या सक्रीय सहभागी झाल्या. प्रचाराची जबाबदारी घेतली. मधल्या काळात राज ठाकरेंची मनसे खूप वेगाने पुढे जात असताना उद्धव यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते, शिवसेनेच्या भविष्याविषयी अनेक जाणकार चिंता व्यक्त करत होते. या खडतर काळात उद्धव यांना मिळालेला मोठा आधार रश्मी ठाकरेंचा होता. 2012 सालीच उद्धव यांना हृदयविकाराचा त्रास झाला. अँजिओप्लास्टिमुळे काही बंधंन आली. त्याकाळात बाळासाहेबांची तब्येतही नाजूक होती. रश्मी यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली. नोव्हेंबर 2012 साली बाळसाहेबांचं निधन झालं, अशात मातोश्रीचा खंबीर आधार बनल्या रश्मी ठाकरे.

बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताईं ठाकरे यांच्या अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात. मातोश्रीवर आलेल्या कोणत्याही पाहुण्याला त्या रिकाम्या हातानं परत पाठवत नसत माँसाहेबांसारखे वहिनीसाहेबांचेही अनेक किस्से त्यांचे परिचीत सांगतात. शिवसेनेच्या महिला ब्रिगेडशी त्यांचा असलेला थेट संपर्क सर्वश्रुत आहे. पण यासोबत त्याचं सेनेतलं राजकीय वजन अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे. तिकीट वाटपाच्या वेळी रश्मी ठाकरेंचा शब्द, उमेदवांरांची निवड, गेल्या काही वर्षात युती होण्यात किंवा न होण्यात त्यांचा रोल, सेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठीचा आग्रह, सेनेचं आगामी काळातलं धोरण या सगळ्यामागच्या त्यांच्या भूमिका आणि सहभागाची कुजबूज कायम रंगते.



राजकीय जगासोबत रश्मी ठाकरेंनी पेज थ्री कल्चरही ग्रेसफुली आपलसं केलं आहे. बिझनेस आणि बॉलिवूडच्या बड्या कुटुंबांच्या सेलिब्रेशनच्या त्या महत्त्वाच्या सदस्या असतात. आपल्या दोन्ही लेकांचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि कौतुकही. कुटुंबासोबत वेळ घालवणं त्यांना आवडतं. मल्टीटास्किंगवर त्यांचा विश्वास आहे. सध्या कोणत्याही महिलेला मल्टीटास्किंग मस्ट असल्याचं त्या म्हणतात. म्हणून घर सांभाळून, राजकीय कार्यक्रमांना जाणं, शिवसैनिकांना भेटणं, आपल्या आवडी जपणं या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी काम करणं त्यांना अवघड वाटत नाही.

पण आता जबाबदारी अधिक वाढली आहे. फक्त शिवसैनिकांच्याच नाही तर त्या महाराष्ट्राच्या वहिनी बनल्या आहेत. रश्मी आजवर मिसेस ठाकरे म्हणून वावरल्या आहेत. एक खास वलय, एक स्पेशल चौकट त्यांनी आपल्याभोवती कायमच जपली आहे.  पण आता त्या मिसेस मुख्यमंत्री झाल्या आहेत. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. आजवर त्यांनी उद्धव ठाकरेंना जशी साथ दिलीय त्याच भूमिकेत अधिक प्रभावीपणे त्यांना वावरावं लागेल. प्रसन्न चेहऱ्यावर करारी भाव ठेवणाऱ्या रश्मी ठाकरे ही भूमिका कशी निभावतात यांची उत्सुकता महाराष्ट्राला असेल.

ठाकरेंच्या या धाकट्या सुनबाईंकडे आता थोरलेपण आलं आहे. मिसेस मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छाही.