जेव्हा तू येतोस तेव्हा मुंबईवर एक वेगळाच रंग चढतो, हा रंग असतो उत्साहाचा, भक्तीचा तुझ्या सेवेचा.. तुझ्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे हे दहा दिवस मुंबई आणि मुंबईकर एका वेगळ्याच रंगात दंग होतात. सगळे तल्लीन होतात तुझ्या भक्तीत, तू विराजमान झालेल्या मंडपात, घराघरात. इथे भेदभाव नसतो, इथे कुणी गरीब श्रीमंत नसतो, इथे कुणी लहानमोठा नसतो, इथे कुणी परका नसतो. इथलं कनेक्शन थेट आणि स्ट्रेट असतं, तू आणि तुझे भक्त यात कोणत्याही डिस्टन्सिंगचा सवालच नसतो


मी लहानपणापासून या उत्सवाचे विविध रंग-ढंग अनुभवलेत, पण खर सांगते बाप्पा यावर्षीसारखी शांतता कधीच पाहिली नाही. कितीही पाऊस पडो, कितीही संकट येवो, कितीही हाय अलर्ट असो, तू आलास की सगळी सूत्रं आपल्या हाती घेतोस, सगळयांना तुझ्यात एकरुप करतोस. तुझा हरएक भक्त वर्षभरासाठीची त्याच्या मागण्यांची भलीमोठ्ठी लिस्टच घेऊन तयार असतो. कुणी तुझ्या कानात कुजबुजतं, कुणी पायावर डोकं टेकवून इच्छा सांगतं, कुणी आय टू आय कॉन्टॅक्ट करतं तर कुणाचे पाणावलेले डोळेच तुझ्याशी मूक संवाद साधतात. पण यावर्षी त्या कोरोनाने हे सगळंच हिरावलं.



कोकणातील गणेशोत्सव (संग्रहित)

बाप्पा यंदा हे सगळं मीसिंग आहे. अनंत चतुर्दशीला मुंबईच्या रस्त्यांवर तो ठेका नसेल, तुला निरोप देतानाची पुष्पवृष्टी नसेल, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..." हा हजारो मुखांतून एकाच वेळी बाहेर पडलेला निनाद नसेल, वाद्यांच्या तालावर बेफाम होऊन नाचणारे भक्त नसतील, मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यातून वाट काढणाऱ्या तुझ्या मिरवणुका नसतील, "चौपाट्यांवर एकीकडे 'जलसागर' आणि दुसरीकडे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला 'जनसागर'..." ही टिपिकल वाक्यं न्यूज अँकरच्या तोंडी नसतील.


तसा तर तुझा जल्लोष घराघरात आणि दारादारात असतो पण यंदा त्या कोरोनामुळे तुझं तात्पुरतं निवासस्थान म्हणजे मंडप टाकण्यावरही बंधनं आली. आरती आणि दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्याही मर्यादित ठेवावी लागली, सुरक्षेखातर सर्वांनी हे नियम पाळले, पण एक सांगू? तुझ्या स्तुतीपर शेकडो भक्तांच्या साथीने कोरसमध्ये आरत्या म्हणण्यात जे सुख आहे ना ते या जगात कशातही नाही. फक्त 10 दिवसच मिळणारं पण वर्षभराचं समाधान देणाऱ्या या सुखापासून यंदा तुझे हजारो भक्त मुकलेत. मंडळात होणारे विविध कार्यक्रम, तुझ्या साथीने जागवलेल्या रात्री, प्रसादासाठी लावलेली भलीमोठी रांग हे सगळं यावर्षी मीसिंग होतं रे.



कोकणातील गौरी-गणपती विसर्जन (संग्रहित)

दरवर्षी तुझ्या दर्शनासाठी, स्वागतासाठी कोकणात धावणाऱ्या मला आणि माझ्यासारख्या अनेकांना तुझं व्हॉटस्अॅप कॉलवरुन दर्शन घेण्याची वेळ आली. गावी असताना तू घरी आल्यावरचा आनंद, दिवसभर उदबत्तीचा दरवळणारा सुवास, पाऊस बरसून गेल्यावर अंगणातला लाल मातीचा ताजा गंध, पोटातली भूक चाळवणारा दर दिवशीच्या नैवेद्याचा खमंग वास, केळीच्या हिरव्यागर्द पानावर सजवलेले तुझे लाडके उकडीचे मोदक, तुझी आरती ओवाळताना मनाला मिळणारं समाधान, डोळ्यावरची पेंग आवरत ऐकलेली भजनं आणि तुझ्या निरोपाच्या दिवशी लागणारी हूरहूर हे सगळं थेट नाही रे अनुभवता आलं यंदा.



कोकणातील गणपती विसर्जन (संग्रहित)

बाप्पा तू विघ्नहर्ता आहेस, सुखकर्ता आहेस, प्लीज या कोरोनाच्या विघ्नाचं तुझ्यासोबत विसर्जन कर. सर्वांना मास्क लावण्याची, सुरक्षित अंतर राखण्याची, नियम पाळण्याची सुबुद्धी दे...एकजुटीने या संकटावर मात करण्याची ताकद दे. पुन्हा एकदा, निर्धास्त आयुष्यं जगण्याचं बळ जे, मोकळा श्वास घेण्यासारखं वातावरण दे, निरामय आयुष्य दे आणि या सगळ्यात आज निरोप घेताना पुढच्या वर्षी तू लवकर यायला विसरु नको, यावर्षीचा तुझ्या उत्सवाचा बराच बॅकलॉग शिल्लक आहे, तो पुढच्या वर्षी दुपटीने भरुन काढू. हॅप्पी अॅण्ड सेफ जर्नी टू यू...