एखादी गोष्टी बिघडणे याचा अर्थ बऱ्याचदा वाया जाणे असाच घेतला जातो. पण आज बिघडणे म्हणजे चांगल्या अर्थी कसं असू शकतं हे सांगण्याचा प्रयत्न करतो.

खूबसूरत सा एक पल का हिस्सा बन जाता है,
जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है..
कुछ खास लोग मिलतें है जिंदगी मै
जीनसे कभी ना बिछडनेवाला रिश्ता बन जाता है...

अशी अनेक लोकं असतात ज्यांच्यासोबत आपल्या भावविश्वात त्यांचं आणि आपलं एक अनोखं नातं तयार होतं. मी बोलतोय अनाथ मुलांच्याबद्दल... 2007 साली उन्हाळी सुट्टीत आम्ही मित्रमंडळी काहीतरी समाजासाठी करायचं आहे या विचाराने झपाटून गेलो होतो.. पण काय करायचं हे माहिती नव्हतं... निश्चित ठरत नव्हतं.. पण एक विचार आला की कोणातरी घडवू या.. कुणालातरी म्हणजे अनाथ मुलांना घडवण्याचा मार्ग आम्ही निवडला आणि याची सुरुवात झाली ती एका उन्हाळी शिबिरापासून.. दादरमध्ये आम्ही मित्रमंडळींनी अनाथआश्रमांशी संपर्क साधला आणि तिथून सुरु झाला एक प्रवास अनुभूती घेण्याचा...

खरंतर आपल्या सगळ्यांना अनाथ मुलांविषयी एक कायम आकर्षण, कुतुहल, सहानुभूती असते. त्यांच्यासाठी कामं करणाऱ्या असंख्य संस्था, व्यक्ती आहेत.. मग आपण ते काय वेगळं करणार या मुलांसाठी यावर विचारमंथन वैगरे सुरु होतं. याविषयीच्या कायद्याचा अभ्यास केला. जेणेकरुन यामध्ये कुठेही आपण उगाच काम करताना अडथळा नको.. ज्या ज्या वेळी वेगवेगळ्या अनाथ आश्रमांना भेट दिली त्यावेळी लक्षात आलं की प्रत्येक अनाथामध्ये एक स्वनाथ दडलेला असतो. त्याला फुलवायची गरज असते. त्यासाठी आम्ही मित्रमंडळी त्याचे ताई-दादा झालो वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि त्यांना फुलू दिलं.

2007 साली सुरु झालेला हा प्रवास आज 12 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. त्या एका छोट्या उन्हाळी शिबीराचं रुपांतर अंकुर प्रतिष्ठान नामक एका संस्थेमध्ये झालं आणि इथूनच सुरु झाला दरवर्षीचा एक ऊर्जात्मक प्रवास..



आजवर अनेकजण विविध अनाथ आश्रमांमध्ये जातात. पैसे देऊ करतात, तिथल्या मुलांना कपडेलत्ते, गोडधोड देऊ करतात. मुलांसोबत बरेचजण वाढदिवस साजरा करतात तर बरेचजण तिथल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलतात. आपापल्यापरीने सगळेजण या मुलांना ती मुलं वेगळी नाहीत याच समाजप्रवाहतले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अंकुर प्रतिष्ठान म्हणजे आम्ही या मुलांमध्ये अनोख्या संकल्पनांचे अंकुर रोवण्याचं कामं करतं आलो. तिथल्या मुलांमधली गुणवत्ता हेरुन, त्यांच्या गुणांना आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.

एक छोटसं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या एका मित्राला बुद्धिबळ चांगलं खेळता येतं, तो मित्र सोबत त्याच्यावेळेनुसार दर रविवारी आम्ही परवानगी घेतलेल्या विविध आश्रमात जाऊन मुलांना बुद्धिबळ शिकवतो. सगळ्याच मुलांना ते आवडतं असं नव्हे पण त्यांच्यात एखादा तरी असतो की त्याला यातली आवड निर्माण होते. मग अशा मुलाला अथवा मुलीला यातलं विशेष प्रावीण्य कसं मिळवून देता येईल हा आम्ही संस्था म्हणून विचार करतो आणि त्यादृष्टीने पावलं टाकतो. याच विचाराने झोळी वाचनालयं, रक्षाबंधन, मातृभूमी परिचय शिबीर यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आणि त्या यशस्वीपणे राबवल्यासुद्धा गेल्या.



अभिमानाची बाब म्हणजे 12 वर्षात 1000 हून अधिक मुलांना 18 पेक्षा जास्त विषयांचं प्रशिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. आज त्यांच्यापैकी कितीतरी मुलं स्पर्धात्मक पातळीवर चांगली कामगिरी करत आहेत. जेव्हा कायद्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर ही मुलं आश्रमतून बाहेर पडतील त्यावेळी त्यांना नक्कीच शिक्षणाच्या, करिअरच्या संधी यांच्यासाठी दार ठोठावत असतील असा विश्वास आहे.

प्रत्येक संस्थेत चढ-उतार हे काळानुरुप येत असतात. आम्ही सुद्धा त्यावेळी कॉलेजात होतो परंतु पुढे जाऊन अनेकजण नोकरी कामानिमित्त इतरत्र गेले परंतु काम सुरु होतं आणि संस्थेलाही मदतीच्या हातांची गरज होती. इथूनच सुरु झाला अनुभूती हा इंटर्नशीप कार्यक्रम..

सहा आठवड्यांचा हा भरगच्च कार्यक्रम वेगवेगळ्या कॉलेजांमधून एकत्र आलेले विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष कामासाठी सज्ज होतात. शिका आणि शिकवा संकल्पनेवर आधारित कार्यक्रम, खेळ किंवा काही अक्टिव्हिटीज शोधून 2 तासांत प्रत्यक्षात उतरवायच्या असतात. आजमितीला 12 वेगवेगळ्या कॉलेजेसमधून 107 विद्यार्थी अंकुर प्रतिष्ठानसोबत काम करत होते. यातून लहान मुलांचं भावविश्व समजून घेताना कॉलेजमधले विद्यार्थीसुद्धा एक वेगळीच प्रत्यक्ष अनुभूती अनुभवतात मग त्यांना कळू लागतं की हा फक्त ट्रेलर होता पिक्चर तो अभी बाकी है.



या मुलांच्या मधली गुणवत्ता हेरुन त्यांना मुख्य प्रवाहात आणि एक संवेदनशील माणूस म्हणून घडवताना पुढची पिढी घडवायचा हाच यातला हेतू आहे. आम्ही खूप काही करतो हे सांगायचा यातला हेतू नाही पण असंख्य मुलं आज अशी आहेत त्यांना केवळ मायेची एक फुंकर घालून आपलंसं करुन योग्य ती दशा ओळखून त्यांना दिशा देण्याची गरज आहे. गेली 12 वर्षे मुलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत वावरताना विं.दांच्या ओळी आठवतात..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे..