तसं पाहायला गेलं तर एक रुपयाला तशी काहीही किंमत नाही. फक्त देणगी देताना 21,51,101, 1001 अशी देणगी दिली जाते पण यात एक रुपया सहसा कोणी देत नाही. याचे कारण म्हणजे सध्या एक रुपया कोणी जवळ बाळगतही नाही. रुपयाची किंमत इतकी कमी आहे की भिकारीसुद्धा एक रुपयांची भीक घेत नाही. टॅक्सी ऑटोवाल्याला देण्यासाठी सुट्टे पैसे हवेत म्हणून आपण सुट्टे ठेवतो. परंतु हे ड्रायव्हरही दोन रुपयाचे नाणे दिल्यावर एक रुपया परत करीत नाहीत आणि आपणही तो सोडून देतो. आज याची आठवण येण्याचे कारण म्हणजे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याचे केलेले वक्तव्य. संजय राऊत म्हणतात चंद्रकांत पाटील यांची किंमत सव्वा रुपयांऐवढीही नाही तर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना तुमची मानहानी एवडी स्वस्त नाही, मानहानीची रक्कम वाढवा. जिथे एक रुपयाला किंमत नाही तेथे 25 पैशांना काय किंमत असणार?


एक रुपयाला सध्या किंमत नसली तरी केवळ एखाद्यापेक्षा मी वरचढ आहे हे दाखवून देण्यासाठी त्याने अमूक कोटी घेतले तर त्यावर मला फक्त एक रुपया जास्त द्या असे बॉलिवूडचे कलाकार सांगताना दिसून आलेले आहेत. नागरिकांना एक रुपयांची किंमत नसली तरी कलाकारांना याच एक रुपयाचे किती महत्व आहे हे तुम्हाला पुढील उदाहरणांवरून दिसून येईल.


राजेश खन्ना बॉलिवुडचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याचे एकामागोमाग एक चित्रपट हिट होत असत. त्याला टक्कर देण्यासाठी अँग्री यंग मॅनच्या रुपात अमिताभसमोर ठाकला होता. दोघांचेही चित्रपट येत असत परंतु राजेश खन्नाची सद्दी संपल्यासारखे झाले होते. याच काळात जेव्हा राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चन यांच्याकडे एखादा निर्माता जात असे तेव्हा मानधनाचा विषय आली की दोघेही एकमेकांपेक्षा एक रुपया जास्त देण्याची मागणी करीत असत. विशेष म्हणजे सुरुवातीला अमिताभ बच्चनपेक्षा राजेश खन्नाला जास्त रक्कम दिली जात असे परंतु नंतर जेव्हा अमिताभने बॉक्स ऑफिसवर जादू चालवण्यास सुरुवात केली तेव्हा हा एक रुपयाचा मुद्दा पुढे केला जात असे.


असाच प्रकार बॉलिवुडमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे चांगले मित्र असलेल्यांमध्येही होता. मित्र असले तरी व्यावसायिकदृष्ट्या दोघे एकमेकांचे शत्रुही  आहेत. एखाद्या निर्मात्याने शाहरुखला चित्रपटाबाबत विचारले आणि त्या निर्मात्याने सलमानबरोबर काम केले असेल तर तो सलमानला मागे किती पैसे दिले होते असे विचारायचा आणि सलमानही असेच करायचा. 2010 मध्ये यशराजनने सलमान खानशी एका चित्रपटाबाबत बोलणी सुरु केली. सलमानला विषयही आवडला होता. मानधनाचा विषय निघाला तेव्हा सलमान खानने शाहरुख खानला मागील चित्रपटासाठी किती पैसे दिले होते ते विचारले. याचे कारण शाहरुखने यशराजसोबत अनेक चित्रपट केल्याने त्याला यशराजने तगडी रक्कम दिल्याचे बोलले जात होते. सलमानने शाहरुखला आज जेवढी रक्कम द्याल त्यापेक्षा एक रुपया मला जास्त मिळाला पाहिजे अशी अट यशराजला टाकली आणि यशराजनेही ती अट मान्य केली. शाहरुखपेक्षा एक रुपयाने माझी किंमत जास्त हेच सलमानला यातून दाखवायचे होते.


प्रख्यात अभिनेत्री साधनाने जेव्हा आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा कारकिर्दीतील पहिल्या सिंधी चित्रपटासाठी मानधन म्हणून तिने फक्त एक रुपया घेतला होता. बिमल रॉय ‘बिराज बहू’ चित्रपट तयार करीत होते तेव्हा मुख्य भूमिकेसाठी त्यांनी मधुबालाचा विचार केला होता. मधुबाला तेव्हा सुपरस्टार असल्याने तिची किंमतही जास्त होती. त्यामुळे बिमल रॉय यांनी कामिनी कौशलची मुख्य भूमिकेसाठी निवड केली आणि चित्रपटाचे काम सुरु केले. मधुबालाला जेव्हा पैशांसाठी बिमल रॉय यांनी साईन केले नाही असे कळले तेव्हा तिने फक्त एक रुपयात काम करण्याची तयारी दर्शवली. परंतु बिमल रॉय यांनी कामिनी कौशलला घेऊनच चित्रपट पूर्ण केला.


राज कपूर यांनी सुरुवातीलाच बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळवले. त्यांचा मेहनतानाही वाढला होता. याच काळात जेव्हा प्रख्यात गीतकार शैलेंद्र यांनी ‘तीसरी कसम’ चित्रपटाला सुरुवात केली आणि राज कपूर यांच्याकडे गेले तेव्हा खरे तर त्यांना पैशांची चिंता होतीच. आपल्या मित्राची पैशांची चिंता राज कपूर यांनी जाणली आणि केवळ एक रुपयात चित्रपट केला. या चित्रपटाने नंतर कमाईचा विक्रम तर केलाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. राज कपूर आणि प्राण यांचीही चांगलीच मैत्री होती. ‘मेरा नाम जोकर’मुळे राज कपूर आर्थिक संकटात होते. आपल्या आरके बॅनरला पुन्हा उभे करण्यासाठी त्यांनी ऋषी कपूर आणि डिंपलला घेऊन बॉबीची निर्मिती सुरु केली. यातील भूमिकेसाठी राज कपूर जेव्हा प्राणकडे गेले तेव्हा मित्रासाठी प्राण यांनी फक्त एक रुपया मानधन घेऊन काम केले.


संगीताच्या क्षेत्रातही गीतकार साहिर लुधियानवी आणि गायिका लता मंगेशकर यांच्यात छुपे युद्ध सुरु होते. साहिर लुधियानवी यांना वाटायचे माझ्या गीतांच्या बोलांमुळे लता मंगेशकर लोकप्रिय झाली तर लता मंगेशकर यांना वाटायचे साहिरच्या बोलांना मी चांगल्या पद्धतीने गाते त्यामुळे गाणी लोकप्रिय होतात. त्यामुळेच साहिर लुधियानवी नेहमी लता मंगेशकरपेक्षा एक रुपया ज्यादा देण्याची मागणी करीत असत. लता मंगेशकर यांना ही गोष्ट कळल्यानंतर दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते.


राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी प्रख्यात धावपटू मिल्खा सिंहच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट बनवण्याचे ठरवले. यासाठी त्यांना मिल्खा सिंह यांची परवानगी घेणे आवश्यक होते. राकेश ओमप्रकाश मेहरा जेव्हा मिल्खा सिंह यांना भेटले आणि चित्रपट बनवण्याचे अधिकार मागितले. यासाठी ते पैसे देण्यासही तयार होते. परंतु मिल्खा सिंह यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून रॉयल्टीच्या रुपात 1958 मध्ये छापलेली एक रुपयाची नोट फक्त घेतली होती.या शिवायही एक रुपयाची खरी किंमत दाखवणारी अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात. पण त्या सगळ्यांचाच येथे उल्लेख करणे स्थानाअभावी शक्य नाही. मात्र या उदाहरणांवरून एक रुपयाची किंमत किती असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.