BLOG : यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तामिळ भाषेतील चित्रपट 'सूराराय पोट्रू'ला मिळणार अशी अपेक्षा होती आणि अगदी तसेच झाले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारासह चित्रपटातील मुख्य नायक सूर्याला मिळाला. हिंदी चित्रपटांपेक्षा दक्षिणेचे चित्रपट सरस का असतात आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपट असूनही त्यांचा देशभरातच नव्हे तर जगभरात डंका का वाजतो त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण आहे ते म्हणजे चित्रपट निर्मिती ते मनापासून आणि प्रेक्षकांना लक्षात ठेऊन करतात. सूरारय पोट्रू हा एक जीवनपट आहे. आणि तो जीवनपट आहे जीआर गोपीनाथ यांचा. जीआर गोपीनाथ यांचे नाव आज अनेकांना ठाऊक नसेल. मात्र एक दशकापूर्वी ते चांगलेच चर्चेत होते.


देशात सर्वात स्वस्त विमान प्रवास देण्यास जीआर गोपीनाथ यांनी सुरुवात केली होती. त्यांच्यामुळेच कोट्यवधी मध्यमवर्गियांचे विमान प्रवास करण्याचे स्वप्न सत्यात उतरले होते. देशातील पहिली सर्वात स्वस्त विमान सेवा देण्यास सुरुवात करणारे जीआर गोपीनाथ कोणी उद्योगपती नव्हते. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते आणि शेतीही करीत. घराला हातभार लागावा म्हणून गोपीनाथ यांनी सैन्यात प्रवेश केला. 1971 ला बांग्लादेशसोबत झालेल्या युद्धापर्यंत ते सैन्यात होते. काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने त्यांनी 28 व्या वर्षी सैन्यातून निवृत्ती घेतली. त्यांनी व्यवसायात हात आजमावण्याचे ठरवले. मित्रांच्या मदतीने त्यांनी सिल्कची शेती सुरु केली. त्यानंतर हॉस्पिटॅलिटीमध्येही नशीब आजमावलं. त्यांचं आवडतं वाक्य होतं फक्त स्वप्न पाहिली जाऊ नयेत तर स्वप्न विकता आली पाहिजेत. ते स्वप्न विकण्याचा प्रयत्न करीत असत. संपत्ती सगळ्यांकडे समान पद्धतीने वाटली गेली पाहिजे असे त्यांना वाटत असे. गोर-गरीब आणि जाती-पातीतला भेद मिटावा असेही त्यांना मनापासून वाटत असे.


1997 मध्ये त्यांनी हेलिकॉप्टर सेवा सुरु केली. त्यांचा मंत्र होता, तुम्ही ठिकाण दाखवा आणि तुम्हाला तेथे घेऊन जाऊ. 2000 मध्ये ते अमेरिकेला गेले होते. तेथे त्यांनी एक स्थानिक विमानतळ पाहिले. त्या विमानतळावरून दिवसाला हजारों उड्डाणे होत असत आणि प्रत्येक दिवशी साधारणतः 1 लाख प्रवासी प्रवास करत असत. खरे तर हा अमेरिकेच्या मोठ्या विमानतळाच्या तुलनेत अत्यंत नगण्य असा विमानतळ होता. भारतातील अनेक विमानतळांपेक्षा या विमानतळावर जास्त वाहतूक होती. त्यांनी माहिती घेतली असता त्यांना समजले की अमेरिकेत प्रत्येक दिवशी 40 हजार विमानांचे उड्डाण होते आणि भारतात फक्त 420. तेव्हाच त्यांनी भारतात स्वस्त दरातील विमानसेवा सुरु करण्याचे ठरवले.


ऑगस्ट 2003 मध्ये गोपीनाथ यांनी सहा छोट्या विमानांसह एअर डेक्कनची सुरुवात केली. कंपनीचे पहिले उड्डाण हुबळी ते बेंगलोर झाले. 2007 पर्यंत देशातील 67 विमानतळावरून एअर डेक्कनची 380 उड्डाणे होऊ लागली होती. विमानांची संख्यांही 45 वर पोहोचली होती. एअर डेक्कनचं आगाऊ तिकीट फक्त एक रुपयात बुक करता येत होते. एक रुपये तिकिटावर जवळ जवळ 30 लाख लोकांनी प्रवास केला होता. नंतर महागाई वाढल्याने एअर डेक्कनले हादरे बसू लागले. तोटा वाढू लागला आणि 2007 मध्ये त्यांनी एअर डेक्कन विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर कंपनीला एअर डेक्कनची विक्री केली. तिथेच भारतातील नागरिकांचे स्वस्त दरात विमान प्रवास करण्याचे स्वप्न भंग पावले विजय मल्ल्या यांनी एअर डेक्कनचे नाव बदलून किंगफिशर रेड ठेवले. पण नंतर विजय मल्ल्याही दिवाळखोर झाले आणि कंपनी बंद झाली.


गोपीनाथ यांनी एअर डेक्कनच्या निर्मितीमागची कथा सिम्प्ली फ्लाय- अ डेक्कन ओडिसी या नावाने लिहून काढली. निर्माता गुनीत मोंगा यांनी त्याच पुस्तकाचा आधार घेत गोपीनाथ यांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर आणण्याचे ठरवले. मणिरत्नच्या सहाय्यक सुधा कोंगरा यांनी हे पुस्तक वाचले होते आणि त्यावर चित्रपट बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जवळ जवळ 10 वर्ष त्यांनी आणखी माहिती गोळा केली. कथा लिहिली. एका कार्यक्रमात अभिनेता सूर्याला कथा ऐकवली. त्याला ही कथा खूप आवडली आणि त्याने गुनीत मोंगांशी संपर्क केला. गुनीत मोंगा लगेचच तयार झाले आणि सुराराई पोट्रूला सुरुवात झाली. साऊथचा सुपरस्टार सूर्याने यात गोपीनाथ यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट थेट अमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आला आणि या चित्रपटाने प्रेक्षक संख्येचा विक्रम केला. सूर्याने गोपीनाथ यांची भूमिका अत्यंत परिणामकारक पद्धतीने साकारली. ही जीवनगाथा असली तरी ती अत्यंत मनोरंजक पद्धतीने नाचगाण्यांसह पडद्यावर साकारण्यात आली होती. या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा झाली. ऑस्करसाठीही या चित्रपटाचे नामांकन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 


अशा या वेगळ्या, परिणामकारक, मनोरंजक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अभिनंदन. तसेच निर्माते गुनीत मोंगा, दिग्दर्शिका सुधा कोंगरा, अभिनेता सूर्या यांचेही मनःपूर्वक अभिनंदन.