एक था गुल और एक थी बुलबुल


दोनों चमन में रहते थे


है यह कहानी बिलकुल सच्ची


मेरे नाना कहते थे


तो आणि ती. एकमेकांना अनुरूप होते. दोघांचे विचार जुळत होते. खरं तर हे दोघेही त्यांच्या घरातील वरिष्ठांमुळे जवळ आले होते. जवळ-जवळ 25 एक वर्ष दोघांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत होते आणि संकटप्रसंगी एकमेकांना मदतही करीत होते. दोघांचे कुटुंबीय मध्ये काही काळ एका घरात राहू लागले होते, पण काही कारणास्तव पुन्हा दोघे आपापल्या घरात राहायला गेले होते. दोघांचे कुटुंबीय शरीराने दूर असले तरी मनाने एकत्र होते.


ही वर्षांनी दोघांच्या कुटुंबीयांतील वरिष्ठांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि या दोघांवर कुटुंबाची जबाबदारी आली. जुनं नातं लक्षात ठेवून दोघांनी मैत्री सुरु ठेवली. कुठेही जायचे असेल तर दोघे एकत्र जात. दोघांच्या या मैत्रीला अनेकांची दृष्ट लागत असे पण त्यातून ते तावून सुलाखून निघत.


दोघांनी एकदा एकत्र येऊन एकाच घरात नांदण्याचे ठरवले. त्यांच्या एकत्र येण्याला गावातील सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यांनाही कुठेतरी हे दोघे एकत्र यावेत असे वाटत होते. दोघे एका घरात सुखाने नांदतील असे वाटत होते. पण संसार सुखाचा झाला नाही आणि पुन्हा दोघे वेगळे झाले.


काही काळाने पुन्हा दोघे एकत्र आले. गावातील लोकांना याचा आनंद झाला. लोकांनी पुन्हा त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला. आता लवकरच दोघे लग्न करतील असे वाटू लागले होते. मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्याऐवजी दोघांच्या प्रेमात बिब्बा घालणाऱ्याशी सूत जुळवण्यास सुरुवात केली. हे दिसताच त्यानेही काहीतरी निर्णय घेतला आणि भल्या पहाटे प्रेमात बिब्बा घालणाऱ्याशी लग्न करून मोकळा झाला. अर्थात त्याने जिच्याशी लग्न केले तिच्या पित्याला हे लग्न पसंद नव्हते. त्यामुळे तीन दिवसातच या दोघांचा संसार मोडला. तिकडे तिने बिब्बा घालणाऱ्यांशी संबंध आणखी दृढ केले आणि संसार थाटला. तिच्या घरच्यांना तो संसार काही आवडला नव्हता. पण तिची आवड असल्याने त्यांनी वरवर लग्नाला आशीर्वाद दिला. दोन अडीच वर्ष त्या दोघांचा संसार सुरु होता. दोघांचे विचार वेगळे असल्याने मध्ये मध्ये अडचणी येत होत्या पण मुलाचा पिता खंबीर असल्यानं तो संसार मोडीस येऊ देत नव्हता. पण मुलीच्या घरचे नाराजच होते. या दोघांच्या संसाराला कंटाळलेल्या मुलीच्या नातेवाईक एका रात्री घर सोडले आणि पार लांब गेले. तिने दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे नाराज झालेल्याने तिच्या नातेवाईंकापैकीच एकाशी संधान बांधले आणि लग्न करून मोकळा झाला. ‘या’ दोघांनी लग्न केल्यामुळे ‘त्या’ दोघांचा संसार मोडला. आणि तिच्या एका नातेवाईकाने थयथयाट करण्यास सुरुवात केली.


‘त्या’ दोघांच्या संसाराला आशीर्वाद देण्यासाठी ‘तिच्या’ अनेक नातेवाईकांनी तिची साथ सोडली. आता काय करावे असा प्रश्न तिला छळू लागला. नातेवाईकांना सोबत ठेवण्यासाठी तिने धडपड सुरु केली. त्या दोघांचा संसार मोडावा म्हणून पार न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण दोघेही सज्ञान असल्याने आणि एकमेकांच्या संमतीने लग्न केलेले असल्याने न्यायालयानेही त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. दोघांचा संसार सुरु असला तरी नाराज असलेल्या तिने या दोघांचा संसार सुखी होऊ द्यायचा नाही असा चंग बांधला आणि आपल्या भूतपूर्व पतिला प्रत्येक क्षणी नामोहरम कसे करता येईल याचा विचार करू लागली. मात्र तिच्यासोबत असलेले काही नातेवाईक तिला समजवत होते. झाले गेले विसरावे आणि ‘त्या’च्याकडे परत जाऊया असे सांगू लागले. तिलाही काही सुचत नव्हते. त्याने आपल्याच एका नातेवाईकाला फोडून त्याच्याशी लग्न केले, आपले नातेवाईकही त्याच्याकडे जाऊ लागलेत, एवढेच नव्हे तर आपणच खरे कुटुंब असे दाखवण्याचा सुरु असलेला नातेवाईकांचा प्रयत्न तिला प्रचंड दुःख देत होता. एक मन त्याच्याकडे जावे असे म्हणत होते तर दुसरे मन जाऊ देत नव्हते.


तिची ही अशी मनोस्थिती सगळ्यांच्या लक्षात येत होती. ती लवकरच त्याच्याकडे परत जाईल आणि पुन्हा दोघे संसाराला नव्याने सुरुवात करतील असे गावातील मंडळींना वाटत होते.


ती आता काय करणार?


त्यासाठी या गोष्टीचा दुसरा भाग लवकरच सादर केला जाईल.


शेवटी फक्त एवढेच की


त्याच गाण्याच्या कडव्यातील या ओळी


आती थी आवाज हमेशा


ये झिलमिल झिलमिल तारों से


जिसका नाम मुहब्बत है वो


कब रुकती हैं दीवारों से


इक दिन आह गुल-ओ-बुलबुल की


उस पिंजरे से जा टकराई


टूटा पिंजरा छूटा कैदी


देता रहा सय्याद दुहाई


रोक सके ना उसको मिलके


सारा जमाना सारी खुदाई


गुल साजन को गीत सुनाने


बुलबुल बाग में वापस आई


(या कथेचा सध्या सुरु असलेल्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)