महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. राज्यातील जनतेने या दोघांना बहुतमही दिले. पण केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसेची घरोबा केला. अर्थात या सगळ्या घडामोडीत सगळ्यात मोठा वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा. त्यांनी शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची लालसा ओळखली आणि मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात स्वतःच्या पक्षाकडे चांगली खाती मिळवली. असाच प्रकार त्यांनी यापूर्वीही केला होता. राष्ट्रवादीचे आमदार जास्त असतानाही त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली होती. आज या सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा उजळणी करण्याचे कारण म्हणजे देशात तिसरी आघाडी तयार करण्यासाठी शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी काँग्रेसला मात्र दूर ठेवले. त्यांनी दूर ठेवले की काँग्रेस स्वतःहून दूर राहिली याकडे लक्ष देणे यानिमित्ताने आवश्यक ठरत आहे.


प्रख्यात रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आणि जवळपास तीन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात शरद पवार दिल्लीला गेले आणि त्यांनी प्रथम राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आणि नंतर यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचच्या अंतर्गत देशातील 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला मोदींवर नाराज होऊन तृणमूलवासी झालेले यशवंत सिन्हा, काँग्रेसमधून निलंबित झालेले संजय झा, सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, सुप्रिया सुळे, माजिद मेमन, वंदना चव्हाण, राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, आपचे खासदार सुशील गुप्ता यांच्यासह प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, सुधिंद्र कुलकर्णी, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, प्रितिश नंदी आदि उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिशम्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगितले जाते.


2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपने जेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केले होते तेव्हा नरेंद्र मोदी भाजपला एकहाती सत्ता मिळवून देतील असे वाटले नव्हते. पण नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचार करून भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. यशाची परंपरा त्यांनी 2019 मध्येही कायम ठेवली. एवढेच नव्हे तर भाजपच्या खासदारांची संख्याही 300 च्या पार नेऊन ठेवली आणि काँग्रेससह अनेक मोठ्या पक्षांचा पालापाचोळा करून टाकला. मात्र सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवार यांनी देशात तिसरी आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, केंद्रात सत्ता प्राप्त करायची असेल तर एक राष्ट्रीय पक्ष आवश्यकच असतो.  शरद पवार यांनी ज्या पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते ते सर्व प्रादेशिक पक्ष आहेत.


शरद पवार आज जे करू पाहातायत ते तेलुगु देसमच्या चंद्राबाबू नायडू यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी देशभरात फिरून भाजपविरोधात आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःला उपपंतप्रधान म्हणूनही घोषित केले होते. परंतु त्यांचा हा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही.


प्रादेशिक पक्षाची ताकद ही फक्त त्यांच्या राज्यापुरती मर्यादित असते. जर प्रादेशिक पक्षाची केंद्रात ताकद मिळवण्याऐवढी असती तर आजवर अशा युतीतून अनेक पंतप्रधान मिळू शकले असते. प्रत्येक प्रादेशिक पक्ष केवळ राज्यातच स्वतःला मजबूत करण्याकडे लक्ष देत असतो आणि जर केंद्रात सत्तेत सहभागी होता आले तर सहभागी होऊन आनंदी होत असे. त्यामुळेच काँग्रेसला वगळून केवळ प्रादेशिक पक्षांची आघाडी करून नरेंद्र मोदी यांना मात देणे शक्य नाही. कदाचित प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना ही बाब समावूनही सांगितली असेल.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये 27 पक्षांची मोट बांधून केंद्रात सत्ता हस्तगत केली होती. परंतु यामुळे काँग्रेसचेच नुकसान झाले आणि अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कमजोर झाली. प्रादेशिक पक्षांची ताकद मात्र वाढली आहे.  आज काँग्रेसला साथीदारांची आवश्यकता असली तरी त्यांना झुकणे मंजूर नाही. त्यामुळेच  काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दुसरा मोर्चा तयार करून भाजपविरोधात त्यांना लढायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस दुसऱ्यांच्या हातातील बाहुले बनू द्यायचे नाही असा सोनिया गांधी यांचा पवित्रा आहे. प्रादेशिक पक्षांना काँग्रेससोबत न जाताच सत्ता मिळवायची असल्याने तिसरी आघाडी कशी तयार होईल आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशी ताकद कशी निर्माण होऊ शकेल असा प्रश्न केवळ दिल्लीतीलच नव्हे तर सर्व राज्यांमधील राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.