पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह काही मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एकूण 16 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकात सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसने कात टाकण्याचे ठरवलेय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रियांका गांधी वड्रा यांच्यावर टाकण्यात आली असून त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारास सुरुवातही केली आहे. कात टाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॉंग्रेसने जेनएयूच्या डाव्या विचारांनी भारलेल्या तीन माजी विद्यार्थ्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिलीय. हे तिघेही विद्यार्थी संघटनांचे माजी अध्यक्ष असून त्यांनी राहुल आणि प्रियंकावर चांगलेच गारुड केलेय. या तिघांपैकी एक जण काँग्रेसचा रणनीतिकार, दूसरा सोशल मीडिया प्रभारी आणि तिसरा पक्षाचा आवाज बनलाय. पण यापैकीच एकामुळे म्हणजे कन्हैया कुमारमुळे बिहारमध्ये काँग्रेसला आरजेडीची साथ मिळणे अवघड झालेय. आणि त्याचा फटका कॉंग्रेसला बसणार आहे. एवढंच नव्हे तर पक्षातही या तिघांबाबत प्रचंड नाराजी असल्याचं चित्र दिसतंय.
प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेश निवडणुकच्या प्रचारास सुरुवात केली. सुरुवातीला लखीमपूर प्रकरणी अटक केल्यावर त्यांनी झाडू मारला. त्यांचा झाडू मारतानाचा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी प्रियंका गांधी वड्रा यांनी एका घरासमोर झाडू मारला आणि त्याचेही फोटो व्हायरल झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'लड़की हूं लड़ सकती हूं' ही घोषणा देत 40 टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याचे प्रियंकांनी जाहीर केले. त्यांच्या या सगळ्यामागचा मेंदू आहे त्यांचा खाजगी सचिव आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष संदीप सिंह याचा.
संदीप 2007-08 मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. तो हिंदीचा विद्यार्थी असल्याने त्याची हिंदी ही अन्य हिंदी भाषी नेत्यांपेक्षा खूपच चांगली आहे. गेल्या तीन वर्षांपासून संदीप काँग्रेसशी जोडला गेलेला आहे. आणि या तीन वर्षातच त्याने डाव्या विचारांचे सुधांशु वाजपेयी, सरिता पटेल, अनिल यादव यांच्यासह 10-12 जणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणलेला आहे. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये कट्टर भाजपाविरोधातील एनजीओ रिहाई मंचच्या काही कार्यकर्त्यांनाही काँग्रेसमध्ये आणले आहे. असा हा संदीप सिंह प्रियंका आणि राहुल या दोघांचीही भाषणेही लिहितो. एवढेच नव्हे तर संदीप सिंह यांचे प्रियंकावर इतके गारुड आहे की, संदीपच्या परवानगीविना काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रियंकांना भेटू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संदीप सिंहबाबत प्रचंड नाराजी आहे आणि त्याचा विपरीत परिणाम उत्तर प्रदेश निवडणुकीत होईल असे म्हटले जात आहे.
संदीपसोबत मोहित पांडेही सध्या राहुल आणि प्रियंकाच्या अत्यंत जवळच्या साथीदारांपैकी एक आहे. मोहित पांडे 2016-17 मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. मोहित काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहात आहे. कट्टर कॉम्रेड असलेला मोहित काँग्रेसच्या सोशल मीडियावर काय गेले पाहिजे, कोणत्या पोस्ट टाकाव्यात हे पाहात असतो. गेल्या काही काळात सोशल मीडियावर काँग्रेस सक्रिय झाल्याचे जे चित्र दिसत आहे त्यामागे या मोहित पांडेचेच डोके आहे. त्याने मंजूर केल्याशिवाय काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकही पोस्ट जात नाही. राहुल आणि प्रियंकाच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोहित जातीने लक्ष ठेऊन असतो.
यांच्यासोबतच आता काँग्रेसने गेल्या महिन्यात कन्हैयाकुमारला काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय. कन्हैयाच्या भाषणांना प्रचंड गर्दी होते आणि सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्सही जास्त आहेत. काँग्रेसमध्ये गर्दी जमवणारा नेता नसल्याने राहुल आणि प्रियंका यांनी कन्हैयाकुमारला गर्दी जमवणारा नेता म्हणून काँग्रेसमध्ये स्थान दिलेले आहे. कन्हैयाकुमारने 2015-16 मध्ये ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवले होते. कट्टर डाव्या विचारांचा असलेल्या कन्हैयाकुमारने कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने बेगुसराय येथून 2019 मध्ये लोकसभेची निवडणुक लढवली होती. पण आरजेडीने त्याला विरोध केलेला असल्याने तिरंगी लढतीत त्याचा पराभव झाला होता. तोच आता बिहारमध्ये काँग्रेसचा तारणहार बनणार असे म्हटले जात होते. पण जसे मी सुरुवातीलाच म्हटले, आरजेडीचा कन्हैयाला विरोध असल्याने बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसची युती तुटली आहे. आणि त्याचा फटका काँग्रसला बसणार आहे. सीपीआय नेत्यांनीही कन्हैया काँग्रेसमध्ये गेल्यावर त्याच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तो अत्यंत स्वार्थी असून त्याला आयडॉलॉजी नव्हे तर राजकारणात करिअर करायचे आहे असा आरोप केलाय.
एकूणच या तिघांच्या जोरावर राहुल आणि प्रियंका देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रात सरकार आणण्याचे स्वप्न पाहात आहेत. पण दुसरीकडे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढतच चाललेली दिसतेय. पंजाबमध्ये काय चाललेय ते आपण पाहिलेच आहे. काँग्रेसशासित बाकीच्या राज्यांमध्येही काही चांगली परिस्थिती नाही. गोवा तर काँग्रेसच्या हातातून गेलेच आहे. छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती आहे. राहुल, प्रियंका आणि त्यांचे अत्यंत विश्वासू झालेले डावे त्रिकुट, नाराज ज्येष्ठ नेते यातून काँग्रेसला सावरण्याचे मोठे काम हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना करावे लागणार आहे. यात त्या कितपत यशस्वी होतात ते आगामी काळात कळेलच.