हिंदी चित्रपटांमध्ये खलनायक प्रचंड लोकप्रिय होत असल्याने अनेक नायकांनी स्वतःच खलनायक किंवा अँटी हीरोची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा या कलाकारांनी तर खलनायक म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते सुपरहिट नायक झाले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनीही अँटी हिरो, खलनायकाच्या भूमिका पडद्यावर साकारल्या होत्या. पण बॉलिवूडमध्ये सर्वप्रथम अँटी हीरो साकारला होता अशोक कुमार यांनी... अत्यंत देखणे असलेल्या अशोक कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकूनच अनेक नायकांनी अँटी हिरो साकारला.
आज अशोक कुमार यांची आज विसावी पुण्यतिथी. 10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईत निधन झाले होते. त्यानिमित्ताने त्यांची आठवण काढताना त्यांच्या या अँटी हिरोच्या रुपाची आठवण झाली. 13 ऑक्टोबर 1911 ला भागलपुर येथील एका बंगाली कुटुंबात कुमुदकुमार गांगुली उर्फ अशोक कुमार यांचा जन्म झाला होता. अलाहाबाद यूनिव्हर्सिटीत शिकत असतानाच त्यांची ओळख निर्माते दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यामुळेच अशोक कुमार यांनाही दिग्दर्शक होण्याची इच्छा झाली होती. अशोक कुमार यांनी त्यांच्या एकुलत्या एका बहिणीचे लग्न शशधर मुखर्जी यांच्याशी केले. शिक्षणानंतर अशोक कुमार न्यू थिएटरमध्यो लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करत होते.
शशधर मुखर्जींनी अशोक कुमारच्या बहिणीशी लग्न केल्यानंतर अशोक कुमार यांना त्यांच्या बॉम्बे टॉकिजमध्ये नोकरी दिली. अशोक कुमार यांचा चित्रपटात प्रवेश योगायोगानेच झाला. बॉम्बे टॉकिजने 1936 मध्ये जीवन 'नैया' चित्रपटास सुरुवात केली होती. चित्रपटाचा नायक नजमुल हसन आणि नायिका होती. बॉम्बे टॉकिजचे नालक हिमांशु रॉय यांची पत्नी देविका राणी. मात्र चित्रपटाचे शूटिंग सुरु होताच देविका राणी नायक नजमुल हसनसोबत पळून गेल्या. काही दिवसांनी त्या परत आल्या. पण हिमांशु रॉय यांनी नजमुल हसन यांची चित्रपटातून हकालपट्टी केली. बॉम्बे टॉकिजमध्ये काम करीत असलेल्या कुमुदलाल गांगुली यांचे नामकरण अशोक कुमार असे करून त्यांना नायक म्हणून उभे केले. अशोक कुमार आणि देविका राणी यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यांनी सुपरहिट अछूत कन्यासह जवळ-जवळ सहा चित्रपट एकत्र केले होते.
याच देखण्या अशोक कुमार यांनी 1943 मध्ये आलेल्या ग्यान मुखर्जी दिग्दर्शित किस्मत चित्रपटात प्रथमच अँटी हीरोची भूमिका साकारली होती. अशोक कुमार यांनी या चित्रपटात एका पॉकेटमारची भूमिका केली होती. प्रेक्षकांना त्यांचे हे अँटी हीरो रूप प्रचंड आवडले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला होता. त्या काळात या चित्रपटाने एक कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. 40 च्या दशकात चित्रपटात आलेल्या अशोक कुमार यांनी जवळ-जवळ 50 वर्षे म्हणजे 90 च्या दशकापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपट निर्मितीही केली आणि जिद्दीमधून देव आनंद यांनाही रुपेही पडद्यावर संधी दिली होती. मधुबालाची कारकिर्दही त्यांनीच 1949 मध्ये महल चित्रपटातून सुरु करून दिली होती.
त्यानंतर अनेक कलाकारांनी अँटी हिरोची भूमिका साकारली पण फार कमी जणांना अशोक कुमारसारखे यश मिळवता आले नाही. अमिताभ बच्चन यांनी कस्मे वादे चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना एक नायक तर दुसरा अँटी हिरो होता. या चित्रपटाने बऱ्यापैकी व्यवसाय केला होता. त्यानंतर सत्ते पे सत्तामध्येही अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारताना अँटी हिरोची भूमिका साकारली होती. अमिताभचा सगळ्यात सुपरहिट चित्रपट म्हणजे डॉन. या चित्रपटातही अमिताभ बच्चनची दुहेरी भूमिका होती ज्यापैकी एक भूमिका अंडरवर्ल्ड डॉनची होती.
शाहरुख खानने बाजीगर चित्रपटात अँटी हिरोची भूमिका साकारली आणि यश मिळवले होते. त्यानंतर शाहरुखने डुप्लीकेट, फॅन, रईस अशा काही चित्रपटांमध्येही अँटी हिरोची भूमिका साकारली होती. आमिर खाननेही यशराजच्या फना चित्रपटामध्ये अतिरेक्याची भूमिका साकारली होती. आमिर खानने यशराजच्या धूममध्येही अँटी हीरो साकारला होता. जॉन अब्राहमने आणि ऋतिक रोशननेही धूम चित्रपटात अँटी हीरो साकारला होता. खरे तर ही यादी आणखी मोठी आहे. खरे तर केवळ नायकच नव्हे तर नायिकांनीही अँटी नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु या सगळ्याची सुरुवात अशोक कुमार यांनी केली होती हे विसरता येणार नाही.
संबंधित लेख :