अशी कल्पना करा की पोटात मस्त भूक असताना तुम्ही एखाद्या रेस्टॉरन्टमध्ये जाता, मेन्यूकार्डमध्ये वडापाव दिसतो, तुम्ही तो ऑर्डर करता आणि वडापाववर ताव मारायचा विचार करत असताना तुमच्या समोर जे ठेवलं जातं त्यात वडा नसतोच, उलट एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवली जाते तुमच्यासमोर आणि ती खा असं सांगितलं जातं किंवा मस्त चाट खायचीय पण प्लेटमध्ये दिसतो तो साबणाचा फेस. मात्र बुचकळ्यात पडलेले आपण जेव्हा ती प्लॅस्टीकची पिशवी किंवा तो फेस तोंडात टाकतो तेव्हा जी काही चव जीभेवर येते त्याने पुन्हा एकदा आश्चर्यचकीत व्हायला होतं.. अशी ही थक्क  करणारी खाद्यपदार्थांची जादू करण्याचं कसब सध्या अनेक शेफ मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीच्या माध्यमातून खाद्यप्रेमींना दाखवत असतात. अशा खास रेस्टॉरेन्टमध्ये जाऊन हटके ट्विस्ट असलेले पदार्थ चाखण्याचा नविन ट्रेण्ड आलाय मुंबईमध्ये..


मॉलिक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे नक्की काय तर खाद्यपदार्थांची निर्मिती करत असताना पांरपरिक स्वयंपाकाच्या पद्धतींचा वापर करण्याऐवजी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातल्या थोड्याशा ट्रिक्स वापरायच्या आणि पारंपरिक जेवणाला वैविध्यपूर्ण ट्विस्ट द्यायचा.



मुंबईतही असे अनेक शेफ आणि त्यांची रेस्टॉरन्ट्स आहेत जिथे मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचा वापर करुन हटके जेवण तुमच्या टेबलवर सादर केलं जातं.. पण त्यातही दिल्लीच्या जिग्स कालराचं ​बी​केसीमधलं ‘मसाला लायब्ररी’ हे रेस्टॉरन्ट सगळ्यात पहिलं किंवा आद्य मानलं जातं..  तीन वर्षांपूर्वी हे रेस्टॉरन्ट सुरु झाल्यापासून मंबईकरांमध्ये या रेस्टॉरन्टबद्दल आणि तिथल्या पदार्थांबद्दल प्रचंड क्रेझ आहे.. हे हॉटेल कायम फुल्ल असतं.. गमतीची गोष्ट म्हणजे ८ ते १० दिवस आधी बुकिंग केल्याशिवाय इथे टेबल मिळत नाही अशी दिड दोन वर्षापूर्वी परिस्थिती होती,  दहा दिवसांनी आपण बाहेर जेवायला जायचं असं प्लॅन करणं शक्य नसल्यानं या मसाला लायब्ररीची पायरी इच्छा असूनही आम्ही चढलो नाही,



दरम्यान अशा प्रकारचे पदार्थ देणारी आणखीही काही रेस्टॉरन्टस मुंबईच्या वेगवेगळ्या भागात उघडलीत, तिथे जाऊन मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे नक्की काय याचा अनुभवही आम्ही घेतला... परळच्या स्पाईसक्लबमध्ये तर डिकन्स्ट्रक्टेड वडा पाव असा एक भन्नाट पदार्थ मिळतो.. वेटर एक लांब ट्रे घेऊन येतो.. त्यात सात आठ छोटे पाव आणि खारी बुंदी असते, एका वाडग्यात पिठल्यासारखा पिवळा गरमागरम पदार्थ असतो आणि सोबत जितके पाव तितक्या छोट्याछोट्या प्लॅस्टीकच्या पिशव्या असतात, त्या पिशवीत लाल चटणीसारखं काहीतरी असतं, मग वेटर ते सगळे पदार्थ प्लॅस्टीकच्या पिशवीसकट कसे खायचे हे सांगतो आणि तोंडात गेल्यावर सेम टू सेम वडापावची चव जिभेवर येते...ती प्लॅस्टीकची पिशवी बटाट्याच्या स्टार्चपासून तयार केलेली असते आणि चविष्ट लागते.



असे अनुभव घेतल्यानंतरही मसाला लायब्ररीत जाऊन नक्की काय वेगळंय हे बघण्याची इच्छा होतीच काही दिवसांपूर्वी ती इच्छा अचानक पूर्ण झाली, त्या रेस्टॉरन्टची क्रेझ कमी झाली म्हणून की काय पण आम्हाला फोन करताच दुसऱ्या दिवशीचं बुकिंग मिळालं आणि पोचलो आम्ही सहकुटुंब जिग्स कालराच्या मसाला लायब्ररीला..

खरं तर या नव्या शेफनी त्यांच्या रेस्टॉरन्ट्समध्ये वैविध्यपूर्ण कल्पनांना विज्ञानाची जोड देऊन, बाहेर खाणं हा एक युनिक अनुभव कसा ठरेल याचाच प्रयत्न केलाय... मसाला लायब्ररीत गेल्या गेल्या आश्चर्यचकीत करणारी चवदार सरप्राईज तुमची वाट बघत असतात. सुरुवातीला सूपसाठी वापरतो त्यापेक्षा एका मोठ्या चमच्यात थंडाई दिली जाते (हे कॉम्प्लिमेंटरी होतं) त्यात एक पारदर्शक गोळा होता, वेटरने तो कसा खायचा याची माहिती दिली, तो थंडाईचा चमचा तोंडात टाकल्यावर पारदर्शक गोळा तोंडात फुटतो आणि ती चव जिभेवर रेंगाळत राहते...



स्टार्टर्समध्येही प्रत्येक डिश युनिक, काही अगदी पारंपरिक पदार्थांना आंतरराष्ट्रीय ट्विस्ट दिलेला, तर काही आंतरराष्ट्रीय पदार्थांना भारतीय चव...  आम्ही खाल्लं ते मलबारी पराठा क्वासेडिला नावाचं स्टार्टर, क्वासेडिला नावाच्या मेक्सिकन डिशला मलबारी पराठ्याचा भारतीय ट्विस्ट होता तो.. दुसरं स्टार्टर म्हणजे एक चाटचा नाविन्यपूर्ण प्रकार होता, त्यात हिरवट रंगाचा फेस होता, हा फेस म्हणजे हिरवी चटणी होती.. प्रत्येक घासाबरोबर चमच्यात थोडासा फेस उचलायचा चटणीच्या चवीसाठी, जिभेवर तो फेस ठेवल्यानंतरचा अनुभव एकदम भन्नाटच..



स्टार्टर आणि मेन कोर्सच्यामध्ये पुन्हा एक सरप्राईज आणून ठेवलं जातं आपल्यासमोर, एका झाडाच्या कुंडीत खोचलेला लहान मुलांच्या लॉलीपॉपसार​खा​ पांढऱ्या रंगाचा पदार्थ येतो पॅलेट क्लिन्जर म्हणून.. म्हणजे आधीची जव जाऊन जीभ नविन चवीसाठी स्वच्छ करण्यासाठीचा छोटासा पदार्थ, मिष्टी दहीच्या चवीचा सॉर्बै (सॉर्बै म्हणजे आईसक्रीमसारखा थिजलेला किंवा थंड पदार्थ). या सॉर्बेनंतर मेनकोर्समध्ये पुन्हा वैविध्यपूर्ण व्हरायटी आणि तयार जेवण सादर करण्याची पद्धतही तितकीच आकर्षक, आम्ही खाल्ली ती भाजी म्हणजे पंजाबी आणि बंगाली चवीचा संगम होता.. दम आलू आणि बंगाली झाल मुडी (म्हणजे बंगाली भेळ)  एकत्र असा तो पदार्थ होता...



जिग्स कालराच्या मसाला लायब्ररीत सगळ्यात प्रसिद्ध आहेत ते त्यांचे डेझर्टस, आणि त्यातही प्रसिद्ध आहे तो ​जिलेबी कॅव्हियर नावाचा शेफ स्पेशल पदार्थ... एका मोठ्या शिंपल्यात हा पदार्थ आपल्या समोर येतो.. पण नावात जिलेबी असूनही जिलेबी कुठे दिसतच नाही.. दोन बाजूला केशरी आणि पांढऱ्या रंगाचा फेस, शिंपल्यात पूर्ण भरलेली रबडी आणि त्या रबडीच्या मधोमध केशरी रंगाचा मोतीचुराचा गोल आकार नसलेला मोठ्ठा लाडू.. त्या लाडवात जिलेबी आणि मोतीचूर दोन्हीची चव तर असतेच पण जिलेबीचा कुरकुरीतपणाही जाणवतो. रबडी, लाडू आणि केशराचा फेस एकत्र खाल्ल्यावर तर गोडाच्या शौकीनांसाठी स्वर्गीय आनंदच, सगळ्यात शेवटी आणखी एक सरप्राईज बिलाच्या आधी मिळतं. एका कुंडीत खोचलेले बुढी का बालचे पुंजके आपल्यासमोर आणून ठेवले जातात, चव घेतल्यावर कळतं की ते बुढ्ढी के बाल पानाच्या चवीचे असतात, म्हणजे जेवणाचा शेवटही एकदम हटके... तेव्हा नाविन्याची हौस असलेल्या खवय्यांनी या मॉलिक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीचा एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही... अर्थात या युनिक अनुभवानंतर खिसा चांगलाच रिकामा होतो हे वेगळं सांगायला नको...