मला सांगा..सुख म्हणजे नक्की काय असतं?.. मराठी रंगभूमीचे विक्रमवीर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) नाटकातलं हे गाणं आपल्या आयुष्यातील सुखाची व्याख्या अगदी सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगणारं. त्याच प्रशांत दामलेंनी नाट्य कारकीर्दीतील आणखी एक विक्रम सर केला. खरं तर प्रशांत दामले आणि नाटकातले विक्रम हे समीकरण जुनं आहे. त्यांच्या अनेक नाटकांचे हजार प्रयोग पाहता पाहता पूर्ण झालेत. तसंच एकाच दिवसात तीन नाटकांचे पाच प्रयोग करण्याचा अफाट पराक्रमही त्यांच्या नावावर आहे. या विक्रमांच्या शिरपेचात त्यांनी रविवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला तो नाट्य कारकीर्दीतल्या 12 हजार 500 व्या प्रयोगाच्या टप्प्याने. याचनिमित्ताने एबीपी माझाने त्यांच्याशी नुकताच संवाद साधला. 


'बेस्ट' अर्थात बीईएसटीचे एकेकाळी कर्मचारी राहिलेले प्रशांत दामले यांनी व्रत घेतल्यासारखं नाटक जपलंय, जोपासलंय. 1983 मध्ये  'टूरटूर' पासून सुरु झालेली ही अभिनयाची टूर अविरत सुरु आहे. याबद्दल ते या मुलाखतीत भरभरुन बोलले. किंबहुना त्यांना तो  'बेस्ट' मधील त्यांचा सुरुवातीचा काळ पुन्हा जगता यावा, म्हणून बेस्ट बसमध्येच घेऊन जात या गप्पा केल्या. प्रशांत दामलेंचं मोठेपण हे की, त्यांनीही या संकल्पनेला होकार दिला. खरं तर त्यांच्या इतक्या थकवणाऱ्या शेड्युलमध्ये, तेही 12  हजार 500 व्या प्रयोगाची लगबग हे सगळं सुरु असताना ते यासाठी (म्हणजे या संकल्पनेसाठी) नाही म्हणू शकले असते. कारण, ही थोडी थकवणारी किंवा वेळ घेणारी कन्सेप्ट वाटू शकली असती. खरं तर ते आज तेवढ्या उंचीवर आहेत की, ते ही गोष्ट सहज नाकारु शकले असते. पण, त्यांनी तसं केलं नाही. त्यांना जेव्हा मी ही संकल्पना सांगितली, तेव्हा लगेच होकार दिला. फक्त पाठोपाठ प्रयोग असल्याने वेळेच्या गणितात कसं बसवायचं, हे त्यांनी माझ्यावर सोडलं. त्यांचं कलेबद्दल निस्सीम प्रेमच यानिमित्ताने दिसून आलं. खरा मोठा माणूस आपली मूळं विसरत नसतो, हेही त्यांनी या उदाहरणाने दाखवून दिलं. या मुलाखतीत बेस्टमधले कर्मचारी म्हणून त्यांनी अनुभवलेले दिवस, बेस्टने आपल्या कारकीर्दीत दिलेलं योगदान, तिथलं टायपिस्टचं काम याबद्दल दिलखुलास बोलले. 


या प्रवासादरम्यान त्यांनी बसचं तिकीटही काढलं. बसच्या सीट्सबद्दलही खास आठवण सांगितली. कंडक्टरचं डिजिटल झालेलं काम पाहून ते सुखावले. आपण बसून गप्पा करुया का, असं त्यांना विचारलं असता, म्हणाले, नको.. सध्या उभंच राहूया.. उभं राहून असं बोलण्याची मजा वेगळी आहे. बसच्या हँडलचा हात पकडून ते गेल्या 40 वर्षांच्या आठवणींचं ड्रायव्हिंग व्हील घेऊन ते बोलत होते. पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, मंगेश कदम, रत्नाकर मतकरी अशा त्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक मंडळींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याच वेळी आज आपल्यात नसलेल्या प्रदीप पटवर्धन यांच्यासारख्या जिगरी दोस्ताबद्दल बोलताना त्यांनी घेतलेला पॉझही खूप बोलका होता. आम्ही जवळपास 35 ते 40 मिनिटांचा बस प्रवास केला. ज्यादरम्यान अनेक प्रवासी बसमध्ये चढउतार करत होते. त्यांच्याकडे पाहत होते, त्यांच्याशी बोलत होते. त्याच वेळी प्रशांत दामलेंच्या मनातही असाच आठवणींचा प्रवास सुरु होता. जो कधी शब्दांनी व्यक्त होता, त्याच वेळी डोळ्यांनीही बरंच काही सांगून जात होता. कधी सहकलाकारांना दिलखुलास दाद देणं असेल किंवा मग आता सोबत नसलेल्या काहींची आठवण काढल्यावर त्यांच्या डोळ्यात तो काळ दाटणं असेल. हे सगळं गप्पांच्या ओघात घडत होतं. बसमध्ये जशी प्रवाशांची गर्दी वाढली, तसे ते मला म्हणाले, गर्दी वाढतेय, आपण बसूया. मग आम्ही दोघंही बसलो आणि सुरु झाला गप्पांचा पुढचा अंक.


तुमच्यातला ताजेपणा कसा टिकवून ठेवलात? असा प्रश्न मी त्यांना केला असता, ते म्हणाले, मी रंगभूमीवर असतो, तेव्हाचे तीन तासच मी सर्वात जास्त रिलॅक्स असतो, मजेत असतो. एरवी दौरे कसे करायचे, कुठे करायचे यासारखी कामं आहेतच. नाटक हे उत्तम टीमवर्कचं उदाहरण आहे. जो संच एकमेकांच्या चुका उत्तमपणे झाकू शकतो, ते नाटक उत्तम होतं. त्याच वेळी तुम्ही नाटकातले तीन तास तुमचं सर्वस्व द्यायला हवं. यू मस्ट बी अन्सरेबल फॉर इच अँड एव्हरी वर्ड अँड मोमेंट. हे सूत्र त्यांनी मांडलं. ऐकण्याचं स्किल उत्तम विकसित करणं, नाटकात फार महत्त्वाचं आहे. ही बाबही प्रशांत दामलेंनी यावेळी अधोरेखित केली. ते म्हणतात, नाटकामध्ये सहकलाकार काय बोलतोय, हे ऐकायचं असतंच, त्याचवेळी प्रेक्षक काय बोलतात, कशी प्रतिक्रिया देतायत याकडेही आपलं लक्ष असायला हवं. त्यामुळे उत्तम लिसनिंग स्किल असणं गरजेचं असतं.


या गप्पांमध्ये त्यांच्या टी-स्कूल प्रोजेक्टबद्दलही ते सविस्तर बोलले. नाटकाचा किती सखोल विचार हा माणूस करतो, हेही त्यातून दिसून आलं. ते म्हणाले, माझ्या प्रशिक्षणार्थींच्या बॅचची सुरुवात जर सहा वाजता होणार असेल तर ती सहा वाजताच होते, सहा वाजून पाच मिनिटांनी नाही. तसंच चारच्या नाटकाला तीन पंचावन्नला येऊन चालत नसतं. तुम्ही तीन वाजता येणं अपेक्षित असतं. हा वक्तशीरपणा मी या उद्याच्या कलाकारांमध्ये भिनवतो. या मुलाखतीत निर्मात्याच्या भूमिकेतील आव्हानं त्यांनी सांगितली. एक महत्त्वाचं वाक्य ते सांगताना ते म्हणाले, काय करायचं नाही, हे कळणं गरजेचं असतं, ते मला चांगलं ठाऊक आहे. याशिवाय भविष्यात दिग्दर्शक होण्याची मनीषाही त्यांनी बोलून दाखवली. रॅपिड फायरच्या प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांच्यातलं प्रेझेन्स ऑफ माईंड दिसून आलं. रात्री झोपताना पाटी कोरी करुन झोपल्याने तुमचा सुरु होणारा पुढचा दिवस उत्तम जातो, असा मंत्रही त्यांनी या गप्पांच्या वेळी दिला. तुम्ही सिनेमे जाणीवपूर्वक कमी केलेत का? असा प्रश्न विचारला असता दोन्ही दगडांवर पाय ठेवणं योग्य नव्हे, एकाचवर फोकस करुन पुढे जाणं गरजेचं आहे. हे त्यांनी ठासून सांगितलं.


वयाच्या अवघ्या साठीत असलेल्या या तरुण कलाकाराने आजच्या सोशल मीडियाशीही उत्तम जुळवून घेतलंय. फेसबुकवर त्यांनी या विक्रमी प्रयोगानिमित्ताने गप्पांचा सेगमेंट केला. संकर्षण कऱ्हाडेने या गप्पांचं अँकरिंग केलं. ज्यात दामलेंच्या कारकीर्दीत महत्त्वाचा रोल प्ले करणारे पुरुषोत्तम बेर्डे, शुभांगी गोखले, कविता मेढेकर, अशोक पत्की आदी सहभागी झाले होते. तेजश्री प्रधानसोबत मागे एकदा प्रशांत दामलेंचा विषय निघाला, तेव्हा ती मला म्हणाली होती, प्रशांत दादाकडे कोणत्या नाटकाचा प्रयोग, कोणत्या दिवशी, कुठे, किती वाजता लावायचा याचा उत्तम सेन्स आहे. तेजश्रीने प्रशांत दामलेंसोबत ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक केलं होतं. त्या अनुभवावरुन ती सांगत होती.


प्रदीप पटवर्धन, वंदना गुप्ते या पिढीपासून ते संकर्षण कऱ्हाडे, अद्वैत दादरकर या ताज्या दमाच्या मंडळींपर्यंत इतकं विपुल काम दामलेंनी केलंय, अजूनही करतायत. कोविड काळात पाककौशल्यही अजमावून पाहिल्याचं ते सांगतात. अष्टपैलू अभिनेता, गोड गळ्याचा गायक, अत्यंत नियोजनबद्ध काम करणारा निर्माता, टी स्कूलचा सर्वेसर्वा, कठीण काळात बॅक स्टेज आर्टिस्टच्या पाठीशी उभं राहत सामाजिक भान जपणारा संवेदनशील माणूस, अशी त्यांची बहुआयामी ओळख. इतकं सगळं करुनही त्यांच्यात भरलेली ऊर्जा केवळ सॅल्यूट करण्यासारखी. काही लोकांचं नुसतं नाव घेतलं तरी तुमचा चेहरा खुलतो, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. या यादीतलं नाव म्हणजे प्रशांत दामले. विक्रमांची अशीच शिखरं त्यांनी सर करत राहावीत, यासाठी त्यांना शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा.


या निमित्ताने त्यांना सांगूया.. तुम्ही आमचं हसणं आहात आणि जगण्याचा एक भागही. तुमच्यासारखे कलाकार आमच्यासाठी जगण्याचा ऑक्सिजन आहेत. तो आम्हाला भरभरुन देत राहा.