गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्र गिरीशचा मेसेज आला. आज परांजपे टीचरांकडे कोण कोण येणार? परांजपे टीचर म्हणजे आमच्या हायस्कूलमधील वर्गशिक्षिका. त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्यापैकी काही वर्गमित्रमंडळी नियमित भेटत असतात, त्यांचे आशीर्वाद घेत असतात. खास करुन गिरीश दरवर्षी जातच असतो. काल भेटलो तेव्हा त्याने सांगितलं, मी एकदा कामानिमित्ताने जर्मनीला आणि एकदा यूकेला होतो, तेव्हाही त्यांना फोन केला होता. त्याच्या सातत्याला हॅट्स ऑफ.


काल गिरीश, वैभव, संदीप आणि मी असे चौघेजण होतो. सर्वांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार, आम्ही टीचरांकडे संध्याकाळी 7 ला पोहोचलो. पोहोचता क्षणी, टीचरांचे मायेचे शब्द, या बाळांनो. ही हाक अनेक वर्षांनी ऐकली आणि पुढचे दोन तास आम्ही त्यांच्या शब्दांचं बोट धरुन आम्ही शाळेच्या वर्गावर्गात फिरुन आलो. मन थेट सातवी-आठवीच्या वर्गात गेलं. जेव्हा टीचर आम्हाला असंच संबोधून शिकवत असत. परांजपे टीचरांनी आम्हाला लावलेली एक उत्तम सवय, जी मला माझ्या या क्षेत्रातही फार उपयुक्त ठरतेय, त्याचा अर्थातच गप्पांमध्ये आवर्जून उल्लेख झाला, टीचरही त्याबद्दल भरभरुन बोलल्या. तेव्हा शाळेच्या पहिल्या तासात त्या जेव्हा अटेंडन्स घेत असत, तेव्हा त्या एखादा विषय, एखादं वाक्य फळ्यावर लिहून देत आणि अटेंडन्स पूर्ण होईपर्यंत आम्हाला त्यावर लिहायला सांगत. मग एक पॅराग्राफ असो किंवा एक पान. आमच्या लिहिण्याबोलण्यातली भाषा विकसित होण्यासाठी, विचार शक्ती वाढीला लागण्यासाठी, एखाद्या विषयावर किती बाजूंनी विचार करावा लागतो हे कळण्यासाठी ही बाब त्यांनी आमच्या मनावर ठसवली. ज्याचा फायदा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतोय, जाणवतोय. या भेटीमध्ये पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या शाळेतल्या दिवसांबद्दल टीचरही भरभरुन बोलत होत्या. त्यांचं वय 80 च्या जवळ आहे. तरीही ते क्षण जसेच्या तसे संदर्भासह आमच्यासमोर ठेवत होत्या. आम्हीही ते क्षण वेचण्याचा प्रयत्न करत होतो. त्या बोलत असताना त्यांच्या शब्दांपेक्षा डोळे जास्त व्यक्त होत होते. म्हणजे शाळेच्या दिवसांमध्ये त्यांनी फळ्यावर लिहिलेले शब्द वाचत असू, कालच्या भेटीत मात्र त्यांच्या डोळ्यातलं वाचत होतो.


प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक खास शैली होती. तशीच परांजपे टीचरांचीही. एखाद्या गोष्टीत आपली चूक झाली असेल किंवा काही कमतरता राहिली असेल तर ती सांगण्याचीही टीचरांची एक वेगळी पद्धत होती. हे तू चुकलास, असं सांगण्यापेक्षा तू हे असं केलं असतंस तर जास्त चांगलं झालं असतं. किंवा तू अमुक अमुक मुद्दे यामध्ये अधिक आणले असतेस तर ते जास्त परिपूर्ण झालं असतं, असं टीचर आम्हाला सांगत असत. शालेय शिक्षणासोबतच जगण्याचं शिक्षणही त्यांच्यासह आमच्या शिक्षकांनी आम्हाला दिलंय. विनम्रतेने तुम्ही समोरच्याला जिंकू शकता, हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवलंय.याशिवाय काही कठीण गोष्टीही अत्यंत सोप्या शैलीत समोर ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. 


या भेटीमध्ये बोलण्याच्या ओघात अनेक शिक्षकांची आठवण निघाली. खाडिलकर टीचर, महाजन टीचर, लवाटे टीचर, नरसाळे टीचर, परब टीचर, करगुटकर टीचर, भोसले सर, महाले सर, कासार सर.. किती नावं घेऊ.आम्हाला घडवण्यासाठी या मंडळींनी जिवाचं रान केलंय. आम्हाला त्यांच्या मुलांसारखं सांभाळलंय, जपलंय. कधी मायेने कानही उपटलेत तर, कधी तितक्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने कौतुकही केलंय. आज त्याच शिक्षकांपैकी एक असलेल्या परांजपे टीचरांशी आमची होत असलेली भेट अत्यंत हृद्य होती. या गप्पांदरम्यान आम्ही निरनिराळ्या क्षेत्रात कसं काम करतो, ते त्यांना सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद हा सध्या आपल्याकडे पडणाऱ्या पावसापेक्षाही वेगाने वाहत होता.


आमचा अमेरिकास्थित बॅचमेट नितीन त्यांना दरवर्षी गुरुपौर्णिमा दिनानिमित्ताने आवर्जून फोन करतो, हे सांगतानाचं त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान काही औरच होतं. ते दोन तास शाळेतल्या आठवणींचा दरवळ आम्ही अनुभवला. टीचरांचा निरोप घेताना त्यांना पुन्हा नमस्कार करण्यासाठी त्यांच्या पायाजवळ हात नेताना ज्यांनी आमच्या आयुष्याचा पाया घडवलाय, त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होत आहोत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतायत ही भावना वेगळं समाधान, आनंद देऊन जाणारी आणि त्याच वेळी जबाबदारी वाढवणारी होती. टीचर जाताना म्हणाल्या, बाळांनो, खूप मोठं व्हा. तुमच्या बाळांनाही मोठं मोठं करा आणि मला भेटायला येत राहा,  माझे विद्यार्थी मला भेटायला आलेत, जाता जाता शेजाऱ्यांना त्यांनी अभिमानाने, आनंदाने सांगितलं. टीचरांचा प्रत्येक शब्द, त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण आम्हाला नवीन ऊर्जेचा, सकारात्मकतेचा ऑक्सिजन देणारा आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्ताने तमाम शिक्षक वर्गाला आदरपूर्वक वंदन.