उत्सवांचा राजा श्रीगणेशोत्सव घराघरात, इमारतीत, चाळीत सुरु होतोय. सलग दुसऱ्या वर्षी हा उत्सव आपण कोरोनाच्या सावटाखाली साजरा करतोय. त्यामुळे नियमांचं भान हे पाळावंच लागेल. तरीही गणेशोत्सव म्हटलं की, उत्साह, चैतन्य आणि ऊर्जेचा संगम. बाप्पांची मूर्ती पाहून नैराश्य, मरगळ कुठल्या कुठे पळून जाते आणि अवघं वातावरण भारुन जातं.


त्यातही कोरोना काळाआधीचा उत्सव आठवताना मन फ्लॅशबॅकमध्ये जातं. त्यातही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग काही औरच. म्हणजे उत्सव 10-11 दिवसांचा असला तरी त्याची तयारी साधारण किमान महिनाभर सुरु होते. अगदी गणेशोत्सव मंडळाच्या पहिल्या मीटिंगपासून ते शेवटच्या मीटिंगपर्यंत. दहीहंडी झाली की, मग मंडप घालायला सुरुवात. मंडपाचा एकेक खांब रोवला जाताना एकेक दिवस बाप्पांच्या आगमनाचा दिवस जवळ येण्याची जाणीव होत असते. हा उत्सव मंडपात साजरात होत असला तरी तो प्रत्येकाच्या अंगात अक्षरश: जणू  भिनलेला असतो, संचारलेला असतो. तहानभूक, जेवणखाण या गोष्टी या काळात आणि पुढे उत्सवातही फक्त औपचारिकता असतात. खरी तृप्तता मिळत असते ती बाप्पांच्या तयारीत आणि नंतर मंडपात त्यांच्या सानिध्यात व्यतित केलेल्या क्षणांनी. मंडपातील ते क्षण अनेक सुगंधी उदबत्त्यांपेक्षा सुवासिक आणि अनेक गोड पदार्थांहून अधिक गोड असतात.


गिरगावसारख्या भागात तर बहुतांश ठिकाणच्या या उत्सवांना किमान 60 वर्षांची परंपरा. लोकमान्य टिळकांनी मुंबईत ज्या ठिकाणी श्रीगणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवही गिरगावातलाच. याशिवाय पंतप्रधानांनी इको फ्रेंडली बाप्पा म्हणून ‘मन की बात’मध्ये ज्याचा आवर्जून उल्लेख केला तो गिरगावचा राजाही इथलाच.


आमच्या श्याम सदनमधील बाप्पालाही 93 वर्षांची परंपरा. हिंदी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र माजी रहिवासी. कोरोना काळ वगळता नेमाने आपल्या या जुन्या घरी येऊन बाप्पाचं मनोभावे दर्शन घेणारे. जितेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर चाळीतील रहिवाशांतर्फे गणेशोत्सव मंडळाकडून त्यांचा खास सन्मान करण्यात आला. तेव्हा त्यांचं एक वाक्य ऐकून मन भरुन आलं, ते म्हणाले, जब तब सांस मे सांस है तब तक आता रहूँगा. चमचमत्या दुनियेत काम करुन, आलिशान घरात सध्या राहत असतानाही जितेंद्र यांना आपल्या जुन्या घरातील, गिरगावच्या चाळ संस्कृतीतील बाप्पाची ओढ आजही कायम आहे, यावरुनच इथल्या उत्सवातील आपलेपणा, त्यातला ओलावा दिसून येतो.


खरं तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकारी मंडळात सहभाग घेणं हा एक प्रचंड सुखद आणि शिकवणारा अनुभव आहे. म्हणजे मॅन मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट यासह विविध बाबतीत व्यवस्थापनाचे धडे तुम्हाला मिळतात. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या कलाने पुढे जायचं असतं. मग कार्यक्रम ठरवणं असो, स्पर्धा घेणं की अगदी स्पर्धांसाठी बक्षिसं काय द्यायची इथपर्यंत. सारंच त्यात आलं. इथल्या स्पर्धांच्या स्टेजवर अनेकांच्या कलागुणांना वाव मिळतो. हे क्षण तुम्हाला आनंद तर देतातच. पण, माणूस म्हणून घडण्यासाठीही मदत करतात.


या उत्सवकाळात मी आधी कॉलेज वयात आणि नंतर वृत्तपत्रातील काम करतानाच्या सुरुवातीच्या काळात मंडपातून बाहेर पडताना अंत:करण जड होत असे. अजूनही कधीकधी असं होतं. हा मंडप सोडून आपण काही तास बाहेर राहायचं , ही कल्पनाच सहन होत नसे. किंबहुना आमच्यापैकी अनेक मित्रमंडळींच्या, शेजाऱ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत असतात. तीही मंडळी घरी गणपती  असताना देखील बराच काळ मंडपातच असतात. चाळ सोडून गेलेले, पण मनाने चाळीतच असलेले माजी रहिवासी बाप्पांच्या दर्शनाला येत असतात (अपवाद कोरोना काळातील ही दोन वर्षे). बाप्पांचं दर्शन तर होतंच शिवाय चाळीतील एक्सटेंडेंड फॅमिलीचीही भेट होते. तब्येतीची विचारपूस होते, मुलाबाळांच्या शिक्षणाबद्दल आपुलकीने विचारलं जातं. याच कुटुंबातला कोणी वर्षभरात आपल्याला सोडून गेला असेल तर आठवणींचा गहिवर येतो. तर, कुणाकडच्या एखाद्या आनंदाच्या बातमीचं सेलिब्रेशनही याच मंडपात होत असतं. मंडपातल्या बाप्पांना आकर्षक फुलांची माळा घातलेली असते आणि या मंडळींमध्ये त्याच वेळी आठवणींच्या माळेत एकेक क्षणाचा मणी ओवला जातो. गप्पा तासन् तास रंगतात आणि मग निरोपाची वेळ. बाप्पांच्या आणि आपल्या मित्रपरिवार, शेजाऱ्यांच्याही.


कोरोना काळाआधी महाआरती हादेखील चाळीतल्या या गणेशोत्सवातील सोहळाच जणू. एरवीही आरतीचे सूर निनादत असतातच. पण, ढोलच्या तालावर, झांजांच्या साथीने अगदी ‘सुखकर्ता दु:खहर्ता..’ पासून मंत्रपुष्पांजलीपर्यंत आरतीमध्ये भक्तगण तल्लीन होतात, रंगून जातात. अनंतचतुदर्शीच्या दिवशीची आरती झाल्यावर ‘जाहले भजन..’ म्हणताना डोळे भरुन आलेले असतात. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी..म्हणताना ऊर दाटून आलेला असतो. आपला लाडका बाप्पा गावाला जाणार असतो. म्हणजे दोन क्षणांमध्ये किती फरक बघा. बाप्पांच्या आगमनाआधी मंडपातील मोकळा चौरंग आतुरतेची जाणीव करुन देणारा, तर अनंतचतुर्दशीच्या दिवसानंतरचा मोकळा चौरंग मंडपातला आणि आपल्या आयुष्यातलाही जणू रितेपणा दाखवणारा.


ही जादू लाडक्या बाप्पांची आहे, त्यांच्या आपल्यावरच्या आशीर्वादाची आणि आपल्या त्यांच्यावरच्या अपार भक्तीची आहे. गणेशोत्सवाआधीचा आणि गणेशोत्सवातला प्रत्येक क्षण एकेक सणासारखा असतो. कोरोना काळामुळे याही वर्षी हे सारं आपण मोकळेपणाने अनुभवू शकणार नाही. कारण, प्रश्न आरोग्याचा आहे. तेव्हा सर्वांनीच हे समाजभान पाळूया. आणि बाप्पांना साकडं घालूया. कोरोनारुपी विघ्न कायमचं दूर कर. तसंच यावर्षी अतिवृष्टी होतेय, त्यातूनही सावरण्याची सर्वांना शक्ती दे. पुन्हा एकदा आम्हाला तुझा उत्सव त्याच जोशात, जल्लोषात करायचाय बाप्पा. तसं घडो तुझ्या चरणी प्रार्थना.