केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर तमाम जगासाठी गेली दोन वर्षे आयुष्य बदलून टाकणारी ठरलीत. कारण, अर्थातच कोरोना. असं असलं तरीही या कोरोना काळातही अनेक जणांनी नाऊमेद न होता, त्याच ऊर्जेने आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रावर निष्ठा ठेवत आपला कर्तव्ययज्ञ अखंड सुरु ठेवलाय. अशाच समर्पित वृत्तीचं दर्शन घडवणारा एक अवलिया डॉक्टर म्हणजे प्रकाश जोशी. गिरगावस्थित हे डॉक्टर 13 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतायत. यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्याचा हा एक छोटा प्रयत्न.




अॅलोपथी, आयुर्वेद, योगा यांचा गाढा अभ्यास असलेले डॉ. प्रकाश जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत म्हणजे त्यांचं सिनेमाप्रेम, संगीतप्रेम. विद्या तुम्हाला सुशिक्षित करते, पण कला तुम्हाला सुसंस्कृत करते, असं एक वाक्य माझ्या वाचनात आलं होतं. ते डॉ. जोशी यांना चपखल लागू होतं. जुन्या जमान्यातल्या सुमारे 1000 रेकॉर्डस, सिनेमाच्या सुवर्णयुगातील कलाकार, संगीत दिग्दर्शक यांचे सुमारे पाच हजार अत्यंत दुर्मिळ फोटो, 200 ओरिजिनल पोस्टर्स, जुनी सिने नियतकालिकं 500  हून अधिक क्लासिक्समध्ये गणल्या जाणाऱ्या व्हिडीओ आणि ऑडिओ सीडीज..आणि बरंच काही...हिंदी-मराठी सिनेमांसंदर्भातलं हे कलेक्शन पाहून तुम्हाला वाटेल की, एखाद्या फिल्म म्युझिअमची ही यादी आहे. पण, तसं नाहीये, हा एका डॉक्टरने कलाविश्वावर जीवापाड प्रेम करत जपलेला संग्रह आहे. चोर बाजारापासून दिल्ली, लंडन, दक्षिण आफ्रिका अशा अनेक ठिकाणांहून त्यांनी जमवलेली ही संपत्ती आहे. जी त्यांना पैसा अडका, सोन्या चांदीपेक्षाही अनमोल आहे.




संगीत, सिनेमाच्या वेडापायी त्यांनी जोपासलेलं हे आयुष्यभराचं व्रतच म्हणा ना. यातली प्रत्येक वस्तू त्यांच्या फॅमिली मेंबरसारखी आहे. जिला त्यांनी जीव लावलाय. त्यांच्या या संग्रहाची अनेक प्रदर्शनं झालीत. सिनेमा, संगीताचा मेळ घालणारा ऑडिओ विज्युअलचा कार्यक्रम ते  वयाच्या पंचाहात्तरीतही तितक्याच उत्साहात सादर करतात.अनिल बिस्वास, सज्जाद हुसेन, ओ.पी. नय्यर, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, कल्याणजी-आनंदजी, तलत मेहमूद जॉनी वॉकर , आरडी बर्मन अशा अनेक दिग्गजांचा सहवास आणि त्यांच्या सोबतच्या गप्पांच्या किंवा संगीत मैफलीतील अनेक अविस्मरणीय क्षण जगण्याचा योग डॉक्टरांना अनेकदा आलाय.


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 80 व्या वाढदिवशी त्यांनी खास उपक्रम केला. 101 विविध संगीतकारांच्या  लतादीदींनी गायलेल्या गीतांचं पुस्तक आणि सीडी त्यांनी प्रकाशित केली. तुम्ही थक्क व्हाल, पण ही त्यांची आवड आहे, मूळ कार्यक्षेत्र नव्हे. त्यांची डॉक्टरकीही अविरत सुरु आहे. किमान पाच दशकं तरी. अगदी कोरोना काळातही त्यांनी रुग्ण सेवाभाव सुरुच ठेवला. विल्सन हायस्कूल-पोद्दार कॉलेज-सेंट जॉर्ज कॉलेज असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर प्रकाश जोशींनी बीएएम अँड एस सहा वर्षांचा कोर्स केला आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली मोहोर उमटवली. याशिवाय कैवल्यधाम योगा सेंटरमध्ये ते   10  वर्षे मेडिकल योगा कन्सल्टंट म्हणूनही काम पाहत होते.




गिरगाव कॅलेंडरसारखा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेला, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या पानावर एकेक क्षेत्रातील नामवंताचं मनोगत आम्ही मांडलं होतं.ज्यात अर्थातच डॉ. प्रकाश जोशीही होते. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा मला भावलेला पैलू म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं दिलखुलास हास्य. असं म्हणतात की, हसून स्वागत करणारा किंवा सुहास्य वदने विचारपूस करणारा डॉक्टर तुमचा अर्धा आजार बरा करतो. डॉक्टरांचं अगदी तसंच आहे. त्यांचं पहिलं स्माईलच तुमच्या औषधाचे दोन डोस कमी करत असावं. इतकं ते प्रभावी आहे. याला साथ अर्थातच त्यांच्या संगीत प्रेमाची. गमतीने असंही म्हणता येईल की, डॉक्टर जोशी इंजेक्शन देत असतानाही पेशंटला बहुदा वेदना नव्हे तर गुदगुल्याच होत असाव्यात. गरजेपेक्षा जास्त औषधं घेऊ नका, योगा, फिटनेसवर लक्ष द्या, असं ते नेहमी पेशंट्सना आवर्जून सांगत असतात. पेशंटची नाडी आणि सुरांची गोडी यांचा अचूक मेळ साधणारे डॉ. जोशी यांचं नावही किती सार्थ आहे पाहा. 




प्रकाश. सकारात्मकतेच्या, कलासक्त वृत्तीच्या या प्रकाशाने ते तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा, नैराश्याचा काळोख नष्ट करतात.  डॉक्टरांच्या या थक्क करणाऱ्या वाटचालीत त्यांच्या सहचारिणी संजीवनीताई सावलीसारख्या पाठीशी राहिल्यात. तर डॉक्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र डॉक्टर राहुलही वैद्यकीय तसंच संगीत क्षेत्रात कार्यरत राहून वडिलांच्या कार्यकर्तृत्वाची प्रकाश किरणं आणि क्षितीज आणखी विस्तारतायत. वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या डॉ. प्रकाश जोशी यांना पुढच्या वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा. तुम जियो हजारो साल..साल के दिन हो पचास हजार..