>> अश्विन बापट


गोष्टीची पुस्तकं, कालनिर्णय कॅलेंडर, दाते पंचांग, निर्णयसागर पंचांग....अशी आरोळी देत एक छोटी मूर्ती गिरगाव आणि परिसरात फिरत असे. मुरलीधर घैसास त्यांचं नाव. त्यांना पुस्तक काका किंवा पुस्तक आजोबा म्हणूनच या परिसरात ओळखलं जातं. खांद्याला दोन-तीन पिशव्या, अर्थातच पुस्तकं, कॅलेंडर, पंचांगांनी भरलेल्या. हाफ पँट, हाफ शर्ट असा पेहराव. त्यांच्या विशिष्ट ठिकाणी जाण्याच्या तारखाही ठरलेल्या. आमच्या इमारतीत महिन्याच्या 5,12, 19 आणि 26 तारखेला त्यांची स्वारी यायचीच यायची. घारे डोळे, चेहऱ्यावर हसू, थोडा मिश्किलपणाही. ते पुस्तकांनी भरलेल्या पिशव्यांचं ओझं घेऊन आजोबा घरोघरी पोहोचायचे. अगदी गिरगावातील लिफ्ट नसलेल्या चार-पाच मजली चाळीत, इमारतीतही आजोबांचा मुक्त संचार असायचा.


मी शाळेत असल्यापासून त्यांना पाहत आलोय. ते दिवसाला इतकं चालत, इतक्या जिन्यांच्या पायऱ्या चढत किंवा उतरत की, कदाचित त्यांना वेगळा व्यायाम करावाच लागला नसणार. फिटनेस मंत्राच होता तो जणू त्यांचा. क्रॉफर्ड मार्केट ते आरटीओ ऑफिस ताडदेव या परिसरात त्यांची मुक्त भ्रमंती असे, अर्थात पुस्तकविक्रीसाठीच. अगदी पोलीस आयुक्तांचं ऑफिस किंवा क्रॉफर्ड मार्केट परिसरातील बीएमसी कार्यालयातही जाऊन ते पुस्तक विक्री करत, अशी माहिती मला ‘बळवंत पुस्तक भांडार’चे मकरंद परचुरे यांच्याकडून मिळाली. त्यांच्या या पुस्तक विक्री मिशनची सुरुवात 70 च्या दशकात झाली. बळवंत पुस्तक भांडारचे माधव उर्फ बापू परचुरे यांच्या प्रोत्साहनाने, पुढाकाराने घैसास आजोबांनी ही सुरुवात केली. उदबत्ती, कापरासोबत घैसास आजोबांच्या पोतडीतून वाचनाचा गंधही पसरु लागला.



मुळ्येकाकांनी केलेल्या घैसास आजोबांच्या सत्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना तसंच ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव उपस्थित होते

मग पुढे मॅजस्टिक, हळबे करता करता अनेक ठिकाणहून ते पुस्तकं विक्रीसाठी नेऊ लागले. शारीरिकदृष्ट्या इतकं थकवणारं काम करताना त्यांना कधी दुर्मुखलेलं, चिडलेलं, थकलेलं पाहिलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक ग्लो असे, तजेलदारपणा असे. अगदी वयाच्या 83-84 वयापर्यंत म्हणजे सुमारे 44 वर्षे त्यांनी आपलं हे वाचनसंस्कृती जोपासण्याचं काम सुरु ठेवलं. त्यांच्याकडून घेतलेली पुस्तकं वाचून किमान तीन-चार पिढ्या नक्की वाढल्यात. दरम्यानच्या काळात वृद्धापकाळानुसार, त्यांना झालेल्या प्रकृतीच्या त्रासामुळे त्यांना हॉस्पिटलवारीही करावी लागली. त्या वेळेपासून ते सध्या त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या पेणच्या अहिल्या महिला मंडळ संचालित वृद्धाश्रमापर्यंतच्या काळात त्यांनी जोडलेल्या अनेक माणसांनी त्यांना मदत केली. त्यांच्या या काळात नाना देवधर, अनंत बापट, राजू हुद्दार, प्रथमेश जोग, समीर लेले, शुद्धोदन सप्रे, राहुल पटवर्धन, मकरंद परचुरे अशी असंख्य मंडळी त्यांच्या मदतीला धावून आली. इतके हात त्यांच्या मदतीला आले की, कदाचित यातली काही नाव इथे राहूनही गेली असतील. हे सारं संचित घैसास आजोबांनी निर्माण केलेलं आहे.


ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंनी अर्थात मुळ्येकाकांनीही घैसास आजोबांच्या या योगदानाचा आपल्या कार्यक्रमात खास गौरव करुन त्यांना आर्थिक मदतही केली होती. अगदी वृद्धाश्रमातही घैसास आजोबा आजूबाजूचं वातावरण सतत चैतन्यमय ठेवत असत. कुणाची खोडी काढ, कुणाची मस्करी कर, त्यांचं सुरुच होतं. त्याच वेळी वृद्धाश्रमातील ताटं उचलून ठेव, एखाद्याला मदत कर. हेही सुरु असे. वृद्धाश्रमात जरी ते राहत होते, तरी त्यांचं मन गिरगावात फेरफटका मारुन यायचंच. गिरगावची त्यांना विलक्षण ओढ होती.



स्वावलंबी वृत्ती, कष्टाळूपणा हा त्यांनी आयुष्यभर जपला आणि जोपासला. सकारात्मक ऊर्जेने वावरताना कायम आनंदी राहण्याचा त्यांचा प्रयत्न असे. एकटेपणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला नाही. कसा मिळेल, अख्खं गिरगाव हेच त्यांचं कुटुंब होतं. इतकं मोठं कुटुंब असलेला माणूस एकटा कसा बरं असू शकेल? पुस्तक विक्रीचा पर्यायाने वाचन संस्कृती रुजवण्याचा अन् ती वाढवण्याचा हा महायज्ञ त्यांनी अनेक वर्ष धगधगत ठेवला. त्यांच्या पश्चातही त्या यज्ञातून कसदार पुस्तकांची ऊबच मिळत राहील. त्यांच्याकडून घेतलेलं एखादं पुस्तक उलटताना जणू ते पुस्तकच त्यांच्या आवाजात बोलू लागेल.. ‘कालनिर्णय कॅलेंडर, रामदास डायरी, गोष्टीची पुस्तकं, निर्णयसागर पंचांग..’ त्याच वेळी पुस्तकाचं एखादं पान ओलसर होईल अन् आपल्या पापण्याही नकळत ओल्या होतील पुस्तक आजोबांच्या आठवणीने.