आदरणीय आर्यन शाळा..सादर प्रणाम. आज या माझ्या लाडक्या शाळेला म्हणजेच तुला 125 वर्ष पूर्ण होतायत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचं हे खास औचित्य.  आज या दिवसानिमित्ताने तुझ्या चरणी ही शब्दफुलं वाहण्याचा प्रयत्न.


तसा तुझा-माझा सहवास 11 वर्षांचा 1983 ते 1993. तुझा निरोप घेऊन जवळपास तीन दशकं लोटली. तरी असं वाटतंय, काल परवाच झाला आमचा दहावीचा सेंडऑफ. इतकी तू आमच्यात आणि आम्ही तुझ्यात मिसळून गेलोत. एकजीव झालोत. छोटा शिशु, मोठा शिशु वर्गापासून म्हणजे आताच्या भाषेत ज्युनियर-सीनीयर केजी ते 10 वीपर्यंतच्या अनेक क्षणांनी मनात आत्ता कल्लोळ केलाय. पूर्व प्राथमिकच्या वर्गात गिरवलेली बाराखडी, आयुष्याची मुळाक्षरंच ती. त्या वर्गातली लाल रंगाची घसरगुंडी. खाली पडल्यावर पुन्हा उभारी घेण्यासाठी सज्ज होण्याची प्रेरणा देणारी जणू. गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे दिवस. सभाधीटपणाचं बेअरिंग देणारा तो मंच हाच. जिथे कालांतराने मी एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आलो होतो. म्हणजे कार्यक्रमाच्या भाषेत पाहुणा. आलो होतो, माझ्याच घरी, माझ्या कुटुंबात. तेव्हा भाषण करताना तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रू जास्त आले होते. मनातल्या भावना पापण्यांच्या किनाऱ्याला न जुमानता वाहत होत्या. इथे जसा आठवणींचा गहिवर अनुभवायला मिळतो तशी या वास्तुत आल्यावर वेगळीच ऊर्जा मिळते. इथे आलो की, सकारात्मकतेचा ऑक्सिजन भरभरून घेतो आणि सोबत नेतो. म्हणजे कमी पडायला नको, नाहीतरी गेली दोन वर्षे ऑक्सिजन लेव्हलचा प्रॉब्लेम आपण सारेच फेस करतोय नाही का?


इथल्या वर्गांमध्ये बाकांवर बसून आयुष्यातले अनेक तास गणित, भाषा, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, विज्ञान यासारखे विषय शिकलो, तसंच समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचं, एकजुटीने राहण्याचं बाळकडूही आमच्या गुरुजनांनी आम्हाला पाजलं ते इथेच.


आज जेव्हा ऑनलाईन शिक्षणासाठी माझ्या मुलीचं दप्तर उघडतो, तेव्हा तिच्या पुस्तकात डोकावतानाही माझ्या असंख्य आठवणींची पानं बोलू लागतात.


चित्रकलेचा तास, पीटी अर्थात शारीरिक शिक्षण वर्ग, स्काऊटचा वर्ग, विज्ञानाची प्रयोगशाळा..वाचनालय..हे फक्त शब्द उरत नाहीत, ही विद्यार्थी तसंच माणूस म्हणून घडतानाची, आमच्या आयुष्याची अनुक्रमणिका आहे. पुस्तक-वह्यांचा गंध आजही मनात दरवळतोय. एखाद्या उंची परफ्युमलाही फिकं पाडणारा.


मधल्या सुट्टीत किंवा पीटीच्या तासालाही शाळेच्या गणवेशातच क्रिकेटचा रंगणारा खेळ. स्टेज किंवा बाहेरचं पटांगण तेव्हा वानखेडे स्टेडियम भासायचं. याच मधल्या सुट्टीत एकमेकांच्या डब्यातल्या खाऊवर ताव मारणंही खूप मिस करतो. त्याचसोबत रुसवे-फुगवे, वर्गात सर्वाधिक बक्षिसं आली की केलेला जल्लोष..सारं काही मेमरीत एकदम फिट बसलंय आणि फोरजी नेटवर्कच्या स्पीडपेक्षाही वेगाने आत्ता आठवतंय.


इथल्या सर्वच गोष्टी एक्स्क्लुझिव्ह आहेत, तसा इथला एक पदार्थही. खरं तर प्रसाद. श्रीकृष्ण जयंतीला प्रसादरुपी मिळणारे दहीपोहे. ती चव आजही जिभेवर रेंगाळतेय. शाळेतली प्रार्थनाही व्यवस्थित आठवतेय. निदान सुरुवात तरी नक्कीच. तू माझी माऊली..मी वो तुझा तान्हा..शाळा नावाच्या आईचं नेहमीच स्मरण देणारी.


शाळेची दगडी वास्तू, शिक्षकांसह सर्वांच्याच मायेने, आपुलकीने कायम पाझरणारी. शाळेत प्रवेश करतानाच्या पायऱ्याही बरंच काही शिकवणाऱ्या. म्हणजे पायऱ्या चढताना कायम पुढे जाण्याची, उच्च ध्येय राखण्याची प्रेरणा देणाऱ्या. तर उतरताना नजर खाली ठेवून चालणं म्हणजेच कायम जमिनीवर राहण्याचं भान देणाऱ्या. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुझं दर्शनही आम्हाला क्लिकवर होतं. तरी तुला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद सर्वोच्चस्थानी.


आज आमच्यापैकी कोणी इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, मीडिया अशा विविध आकाशात विहार करतंय. त्या सर्वांचं अवकाश तूच आहेस, म्हणजे ही माझी शाळा.


माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर, जी काही थोडीफार वाटचाल केलीय, त्यातल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय शाळा,गुरुजन-आईवडिलांचं. जे रितेपण राहिलंय ते माझं. आज या दिवसाच्या निमित्ताने आपल्या पालघरच्या शाळेतील माळी सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला, त्यांनी भाकरीवर तुझं नाव, बोधचिन्ह, आद्य  संस्थापकांची नावं लिहिलीत. पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी भाकरी आणि ती भाकरी कमवण्यायोग्य आम्हाला बनवणारी, त्या भाकरीचा अर्थ सांगणारी ती तू अर्थात माझी शाळा, आमची शाळा. खाण्यासोबतच संस्कारांची, शिक्षणमूल्यांची भरपूर शिदोरी सोबत देणारी. शाळा नावाच्या आईला, आमच्या गुरुजनांना साष्टांग दंडवत. 


अश्विन बापट


(माजी विद्यार्थी - आर्यन शाळा)