>> अश्विन बापट
अमिताभ बच्चन.. या सात अक्षरांशी आमची, आमच्या मागची तसंच नंतरच्याही दोन पिढ्याही जोडल्या गेल्यात. हे फक्त एक नाव नाहीये, हा भारतीय सिनेमातला असा प्रवाह आहे, असा धबधबा आहे जो अखंड ओसंडून वाहतोय. अगदी वयाच्या 78 व्या वर्षीही. म्हणजे बिग बींनंतरच्या पिढीचे काही अॅक्टरही कालबाह्य किंवा काही प्रमाणात विस्मृतीत गेले. पण, ही अभिनयाची गगनचुंबी इमारत पाय रोवून भक्कम उभी आहे. इतकी वर्षे सातत्य राखणं, हे विस्मयचकित करणारं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमांची अक्षरश: पारायणं केलीयेत. त्यातले दीवार आणि शराबी हे माझे पर्सनल फेव्हरेट. दीवारमधील आजभी मै फेके हुए पैसे नही उठाता..किंवा चाबी जेब मे रख पीटर, अब ये ताला मै तुम्हारी जेबसे चाबी निकाल करही खोलूँगा, किंवा अगले महिने एक और कुली इन मवालियो को पैसा देने से इन्कार करेगा.. असे असंख्य संवाद मनावर एखाद्या महाकाव्याप्रमाणे कोरले गेलेत.
तसेच 'मुछे हो ते नथ्थुलालजी जैसी हो वरना न हो', किंवा प्राणसाहेबांसोबत वडील-मुलगा संवाद सुरु असताना कही उपर वाले ने मेन स्विच बंद कर दिया तो.. असं म्हणतानाचा त्याचा काळीज चिरुन टाकणारा संवादही असाच मनात घर केलेला. या सिनेमातले ओम प्रकाश-अमिताभ यांचे सीन्सही मनाचा ठाव घेणारे.
तसाच 'नौलख्खा मंगा दे' गाण्यात 'नशा शराब मे होता' म्हणत अमिताभ एन्ट्री घेतो तेव्हाचा अभिनय असो किंवा सलाम-ए-इश्क गाण्यात इसके आगे की अब दासताँ मुझ से सून, हा पीस असेल, दोन्हीकडे किशोर कुमार यांचा आवाज आणि अमिताभचे एक्स्प्रेशन्स काळजात घुसतात. घायाळ करतात. ती जखम हवीहवीशी वाटते. इतका हा अभिनयातील जिवंतपणा अन् गीतं मोहून टाकणारी.
नमक हलालमधील क्रिकेट कॉमेंट्रीचाही पीस असाच दिलखुलास हसवणारा.
'आनंद'मधला डॉक्टर, 'मि.नटवरलाल'मधला परदेसियाँ गाण्यातला अमिताभ किंवा लावारिसमधला मेरे अंगने मे गाणारा अमिताभ. ही गाणी, हे सिनेमे आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत आणि राहणार.
त्याच वेळी जंजीरमधला ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही म्हणणारा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीही भावणारा. तसाच शहेशनहामधील रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है हा खास बच्चन स्टाईल संवाद असो
किंवा शोलेमधील मौसीकडे आपल्या मित्राचे वीरुचे दुर्गुण सांगत सांगत बसंतीचा हात मागणारा जयदेखील तितकाच हवाहवासा वाटणारा. बडे मियाँ छोटे मियाँमधील मखना गाण्यातील गोविंदा, माधुरीसोबतची केमिस्ट्रीही अशीच अफलातून.
अमिताभ यांच्याबद्दल थक्क करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची सेकंड इनिंगही भन्नाट आहे. ब्लॅक, पा, चिनी कम, पिकू, किती नावं घेऊ. नि:शब्दसारखा वेगळा सिनेमाही त्यात आहे, तसाच बागबानसारखा सोशल अँगल असलेलाही. बंटी और बबलीमध्ये कजरा रे..म्हणताना ऐश्वर्या, अभिषेकच्या साथीने तितकाच एनर्जिटिक डान्स करणारा अमिताभही भाव खाऊन जातो. काळानुरुप हा माणूस ज्या पद्धतीने मोल्ड होत गेला, त्याला खरंच सलाम आहे. रमेश सिप्पी, यश चोप्रा, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, हृषिकेश मुखर्जी यांच्यासारखे बुजुर्ग दिग्दर्शक असो वा राम गोपाल वर्मा, करण जोहर, आर बाल्कीसारखे आजच्या जमान्यातले दिग्दर्शक. प्रत्येकांशी त्यांचे सूर जुळले, ते आजच्या पिढीशी समरस झाले.
केबीसीसारखं टेलिव्हिजन इतिहासातील मानाचं पान हेही बच्चन साहेबांच्याच नावावर.
त्यातलं देवियो और सज्जनो असं अदबीने म्हणत सर्वांना वेलकम करणारा अमिताभ. त्याच वेळी स्पर्धकांशी हसतखेळत संवाद साधणारा अमिताभ. स्पर्धकांना खास करुन वयोवृद्ध किंवा महिला स्पर्धकांना खुर्ची ओढून देत त्यांचं आदरातिथ्य करुन त्यांचं स्वागत करणारा अँकर अमिताभ. केबीसीमध्ये रक्कम जिंकण्याबरोबरच अमिताभसोबत घालवत असलेले क्षणच या स्पर्धकांना आयु्ष्यभरासाठी अनमोल ठरत असतील.
एखाद्या उत्पादनाची जाहिरात असो वा, चित्रपट नाहीतर केबीसीचं अँकरिंग. प्रत्येक कामात या माणसाने जी एनर्जी, डेडिकेशन दाखवलंय, जी जिद्द दाखवलीय त्याला केवळ वाकून नमस्कारच करायला हवा.
अमिताभ यांना कुली सिनेमावेळी शूटिंगदरम्यान झालेला जीवघेणा अपघात, त्यांची राजकीय कारकीर्द, आर्थिक संकटावर त्यांनी केलेली मात, आजारपणांशी केलेला सामना अगदी अलिकडेच कोरोनाशी केलेले दोन हात, हे सारं तुम्हाआम्हाला अचंबित करणारं. या माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक टप्पा आपल्याला शिकवून जाणारा आहे. जीवनातील चढउतार ज्या ग्रेसफुली बच्चन साहेबांनी घेतले त्याला तोड नाही.
त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल मला ज्येष्ठ सिने लेखक द्वारकानाथ संझगिरी सरांनी एकदा एक किस्सा सांगितलेला, एकदा त्यांच्या एका कार्यक्रमाला बिग बी येणार होते, त्यावेळी त्यांना पाच मिनिटं यायला उशीर होणार होता, त्याकरताही अमिताभ यांनी निरोप पाठवला होता. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही वेळेची किंमत अन् भान ठेवणारा अमिताभ.
तसाच दिलीप ठाकूर या ज्येष्ठ सिने लेखकांकडूनही मी त्यांच्याबद्दल एक किस्सा ऐकलाय. एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बच्चन साहेबांना विचारलं, आप एकही वक्त फिल्म, अॅड, केबीसी ये सब काम कैसे मॅनेज करते हो...तेव्हा बिग बींनी दिलेलं उत्तर आपल्याला आयुष्याचं मर्म सांगून जाणारं आहे. अमिताभ म्हणाले, मै काम नही मॅनेज करता हूँ, मै टाईम मॅनेज करता हूँ, काम अपने आप मॅनेज हो जाता है.
ऐशीव्या वर्षाकडे कूच करत असतानाही अजून मागणीत मी हेच अमिताभ यांनी दाखवून दिलंय. प्रभास तसंच दीपिका पदुकोणसोबत एका फिल्ममध्ये ते दिसणार आहेत.
अॅमेझॉनच्या एलेक्सा डिव्हाईसलाही बिग बींचा आवाज असणार आहे. हे गारुड आहे, बिग बींच्या जादुई व्यक्तिमत्त्वाचं. जसा लतादीदींचा आवाज आमच्या जगण्याचा आधार आहे, तशी अमिताभ यांची ही अदाकारीही आमचं जगणं सुसह्य करुन गेलीये. या लेखात अमिताभ यांचा उल्लेख बऱ्याच संदर्भांच्या वेळी एकेरी केलाय, तो आपलेपणाने. आपल्या कुटुंबातलाच सदस्य अशी भावना मनात ठेवून.
अशा या अथक वाटचालीला मानाचा मुजरा. अन् 78 व्या वाढदिवसानिमित्ताने बिग बींना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.