अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यावर मेलबर्नची दुसरी कसोटी काही तासांवर आलीय. ०-1 वरुन 1-1 करायचं असेल तर फलंदाजांना बराच घाम गाळावा लागणार आहे. 36 चा आकडा म्हणजे पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावातील हा स्कोर दु:स्वप्न म्हणून विसरुन जावं लागणार आहे. मात्र ती जखम लक्षात ठेवून फलंदाजीला उतरावं लागणार आहे.


तसं पाहिलं तर पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील खेळ वगळता आपण सामन्यावर बऱ्यापैकी वर्चस्व गाजवलं होतं. त्या एका तासात मात्र तू जा मी येतो.. स्टाईलने विकेट गेल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे पहिल्या डावात 50 हून अधिक रन्सचा लीड घेतल्यानंतर माझ्यासारखे भारतीय क्रिकेटरसिक 1-0 चं स्वप्न रंगवू लागले होते. पण, कमिन्स, हेझलवूडचा अप्रतिम स्पेल, त्याला भारतीय फलंदाजांच्या काही खराब फटक्यांची मिळालेली साथ यामुळे त्या स्वप्नाची काच नुसती तडावलीच नाही तर त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. अर्थात उम्मीद पे दुनिया कायम है...त्यामुळे आणि भारतीय टीमच्या क्षमतेवरही विश्वास असल्याने आता आणखी एक स्वप्न क्रिकेटरसिक पाहू लागलेत. 1-1 चं.


मात्र यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतील. खास करुन फलंदाजांना. त्यात या सामन्याआधी जी प्लेईंग इलेव्हन चर्चेत आहे, त्यामध्ये दोन नवखे सलामीवीर पुन्हा एकदा नव्या चेंडूचा सामना करतील. मयांक अगरवाल आणि शुभमान गिल यांच्याकडून डावाची सुरुवात होईल असं दिसतंय. त्यातही आत्मविश्वास दुणावलेल्या कमिन्स, हेझलवूडचा तसंच डावखुऱ्या अँगलने घातक ठरू शकणाऱ्या स्टार्कशी त्यांना दोन हात करायचे आहेत.


कसोटी मालिकेत सलामीवीर किती काळ खेळपट्टीवर राहतात, यावर बरंच काही अवलंबून असतं. खास करुन जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंडमध्ये खेळता तेव्हा तर त्यांची जबाबदारी अधिक असते. कुठे खेळपट्टीतील बाऊन्स नाकातल्या केसांना हुंगून जातो तर कुठे स्विंग बॅट्समनची तपश्चर्या भंग करण्याच्या प्रयत्नात असतो. यामुळे ही जोडी पायाभरणी कशी करते यावर स्कोरची इमारत किती बुलंद होणार हे बऱ्याच अंशी निर्भर राहील.


आपण या मालिकेत आतापासूनच्या पुढच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये मायनस विराट कोहली आहोत, हा फॅक्टर समोरच्या टीमच्या अंगावर मूठभर नव्हे मणभर मास चढवणारा आहे तर आपली जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. त्याचवेळी रहाणेच्या खांद्यावर कॅप्टन्सीची मदार आलीय. क्लासी फलंदाज अशी ख्याती असलेल्या रहाणेने काही दर्जेदार खेळी करुनही त्याच्या संघातील स्थानाबद्दल काही वेळा चर्चा होत असते. यानिमित्ताने दोन्ही आघाड्यांवर टॉप परफॉर्मन्स देऊन या चर्चांना कुलूप लावण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी रहाणेकडे आहे. अर्थात हे मिशन नक्कीच आव्हानात्मक आहे. अननुभवी ओपनिंग प्लेअर, शमीसारखा की बोलर दुखापतग्रस्त, त्यात जी चर्चा ऐकतोय, त्यानुसार जडेजा खेळणार असल्याने एक फलंदाजही कमी. म्हणजे पाच स्पेशालिस्ट बॅट्समन, पाच स्पेशालिस्ट बोलर्स आणि एक कीपर. असं कॉम्बिनेशन असेल असं सध्या तरी दिसतंय.


म्हणजे पहिल्या इनिंगमधील आपल्या स्कोरवर मॅचचा निकाल ठरु शकतो, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.


विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंतला स्थान देण्यात आलंय. पंतकडे प्रचंड बॅटिंग टॅलेंट असलं तरी ऑसी खेळपट्ट्यांवर त्यातही संघ 0-1 ने पिछाडीवर असताना त्याला फटाक्यांची लवंगी माळ लावता येईल का? काहींच्या मते त्याच्यात गिलख्रिस्ट होण्याची क्षमता आहे. पण, नुसती क्षमता आहे, असं वाटणं आणि प्रत्यक्ष त्या पाऊलवाटेवर चालणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे पंतला विकेट कीपिंगचा आणि फलंदाजीचाही स्तर कमालीचा उंचवावा लागणार आहे. खास करुन किपिंगमध्ये ‘हुकाल तर चुकाल’ हा मंत्र लक्षात ठेवावा लागेल. स्टीव्ह स्मिथ किंवा लबुशेनचा एखादा मिस्ड चान्स म्हणजे मॅच गेलीच समजा. अर्थात कांगारुंचा संघही वॉर्नरच्या अनुपस्थितीत या दोघांवरच जास्त अवलंबून असतो. ही बाब दोघांवरचं प्रेशर वाढवणारी ठरु शकते.


स्मिथ पहिल्या कसोटीत जरी अपयशी ठरला असला तरी वनडे मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता हे विसरायला नको. भारतीय गोलंदाजी म्हटली की, स्मिथच्या तोंडाला जणू पाणीच सुटतं. पण, त्याच्या तोंडाला पाणी सुटू न देता, त्याच्या तोंडचं पाणी पळवायचं असेल तर तो क्रीझवर आल्यापासून अलर्ट राहावं लागेल आणि त्याची विकेट घेण्याचाच प्रयत्न करावा लागेल. अश्विनने पहिल्या मॅचमध्ये त्याच्या व्हेरिएशनने स्मिथला मामा बनवलं होतं. त्यामुळे हा सायकॉलॉजिकल प्रेशरचा भाग म्हणून अश्विनला त्याच्या समोर त्याच्या इनिंगच्या सुरुवातीलाच आणता येईल. अर्थात मॅच सिच्युएशन काय असेल यावर बरंच काही अवलंबून राहील.


फलंदाजीत पुजारा, रहाणे तर गोलंदाजीत बुमरा, अश्विन हे आपले एक्के असतील.


पुजारा आणि रहाणे दोघांकडेही राहुल द्रविडसारखा नांगर टाकण्याची क्षमता आहे. ती या दोघांनीही आधी दाखवूनही दिलीय. पण, आक्रमक वृत्तीच्या कांगारुंसमोर खेळताना नुसता नांगर टाकून चालणार नाही, त्या नांगराचा फाळ किती धारदार आहे तेही दाखवावं लागेल. अर्थात अरे ला कारे हे करावंच लागेल. रोहित आणि कोहली या दोन तोफा नसताना ‘आक्रमण’ असं म्हणत ऑसी गोलंदाजीला काही वेळा प्रत्युत्तरही द्यावंच लागेल.


गोलंदाजीत बुमरा हा आपला स्टार गोलंदाज आहे. त्याला सूरही गवसलाय. स्पीड, स्विंग, यॉर्कर या त्रिसूत्रीने तो ऑसी खेळपट्टीवर यजमानांना घाम फोडू शकतो. अश्विनलाही पहिल्या सामन्यात विकेट्स मिळाल्या असल्याने त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. त्यात यावेळी त्याच्या जोडीला जडेजा आहे. म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनरचं व्हेरिएशन आलंय. शिवाय त्याच्या संघ समावेशाने फलंदाजीतही आक्रमकपणा आलाय.


मोहम्मद सिराजचा कसोटी क्रिकेटमधील पाळणा हलणार अशीच सध्याची स्थिती आहे. तो बुमरा, यादव यांना थर्ड बॅकअप गोलंदाज म्हणून कशी गोलंदाजी करतो, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.


दोन्ही संघ वन टू वन पाहिले तर गोलंदाजीत दोन्ही टीम्स समान ताकदीच्या वाटतात. फलंदाजीत खास करुन पहिल्या डावात जो संघ चांगली फलंदाजी करेल, त्याचाच वरचष्मा राहू शकेल. अर्थात या वाक्याला छेद देणारा निकाल पहिल्या कसोटीत आपण पाहिला, जिथे 200 च्या आत ऑल आऊट होऊन कांगारुंनी बाजी पलटवली. परीक्षा भारतीय फलंदाजीची आणि कसोटी भारतीय नेतृत्वाची आहे. वर्षाची अखेर मालिकेतील 1-1 निकालाने व्हावी, अशी अपेक्षा बाळगूया. रहाणेच्या टीम इंडियाला शुभेच्छा देऊया.