ऑफिसचं काम आटोपून घरी परतत असताना ऑफिस ड्रॉपची गाडी वरळीपर्यंत आली. स्त्याच्या दुतर्फा बीडीडी चाळीच्या पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमाचे फलक दिसले. सहकारी व्हिडीओ एडिटर यज्ञेश वरळीत त्याच्या घराजवळ उतरला, त्याच वेळी उजवीकडे जांबोरी मैदानात नजर गेली. रात्रीची शांतता जणू बोलू लागली. गाडी पुढे जाऊ लागली आणि मन मागे.


गिरगावात राहत असलो तरी वरळीशी, इथल्या बीडीडी चाळीशी खास नातं आहे. माझा जन्म वरळीतलाच, सुरुवातीची काही वर्षे इथेच होतो. जांबोरी मैदानात माझी बालवाडीची शाळा. मैदानाच्या बाजूलाच असलेल्या बीडीडी चाळीत आजी-आजोबा, मामा राहायचे. इथली 100 च्या आसपास स्क्वेअर फुटांची घरं, प्रत्येक मजल्यावर साधारण 20 खोल्या, मजल्यावर कॉमन गॅलरीसारखी भली मोठी जागा. 10 बाय 10 च्या त्या जागेत 6, 8 माणसंही आनंदात राहिलेली मी पाहिलीत. तेव्हा सुखाच्या पतंगाला पैशाच्या दोरीने नव्हे तर नात्यांच्या गाठींच्या धाग्यात बांधून ठेवलेलं असायचं. अख्खा मजला म्हणजे एक कुटुंब वाटावा असा तो काळ. याच साधर्म्यामुळे वरळी आणि गिरगाव हे दोन्ही मनातले अत्यंत हळवे आणि जवळचे कोपरे आहेत आणि कायम राहणारच.


बीडीडी चाळीतल्या त्या सिंगल रुममध्ये टेरेस फ्लॅटचा आनंद उपभोगलाय. सोबत आजी-आजोबा, मामा लाड करायला होतेच. पुढे कालांतराने वरळीतून गिरगावात गेलो तरी बीडीडी चाळीशी खास नातं जपलंय. म्हणजे इकडच्या नवरात्रोत्सवात एकदा तरी उपस्थिती ठरलेलीच. तेव्हा देवीचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर एकदा भरभरुन चाऴीकडे पाहून ती चाळ मनात आणि डोळ्यात साठवून घ्यायची, वर्षभरासाठी. भिंतींचा रंग थोडा धूसर झालेला असला तरी या वास्तुशी नातं इतकं एकजीव झालेलं आहे की, तिथे गेल्या गेल्या आतले क्षण पटापट समोर येतात. या चाळीलगतच्या जांबोरी मैदानातली जत्राही एकदम खास. जत्रेतील टिपिकल खेळ खेळायचे. अगदी अलिकडेपर्यंत ते खेळलोय. मडक्यात बॉल फेकून तो मडक्याबाहेर पडू न देणे, रिंग फेकून एखादी वस्तू जिंकणे, रचलेल्या ग्लासचा पिरॅमिड बॉलने एकाच फटक्यात पाडणे. बंदुकीने फुगे फोडणे हे खेळ आज वय वाढलेलं असलं तरी तेवढाच आनंद देतात. जांबोरी मैदानातील त्या मातीतला अशा आनंददायी क्षणांनी लगडलेला तो वृक्षच जणू. याच जांबोरी मैदानातून चाळीकडे बाहेर पडताना एका काकांचा शेवपुरी-पाणीपुरीचा छोटासा स्टॉल आहे. तिकडे ते, लग्नातील पंगतीत करतात तसा आग्रह करकरुन खाऊ घालतात. प्लेट रिकामी दिसली की पुरी आलीच त्यात. आपलेपणाची चव उतरल्याने पाणी-पुरी आणखीच गोड लागते. कोरोनामुळे दोन वर्षे ती मिस करतोय.


या बीडीडी चाळीच्या मोठ्ठाल्या गॅलरीसारख्या पॅसेजमध्ये लग्न, बारशी आणि श्री सत्यनारायण महापूजादेखील होत असे, तसंच दिवाळीत घरांसमोरच्या रांगोळ्यांनी गॅलरी सजून जायची, असं सगळं मी माझ्या मामाकडून ऐकत आलोय. याच बीडीडी चाळीत आमचा एबीपी माझाचा सहकारी मित्र वैभव परबच्या हळदीचा कार्यक्रमही अटेंड केलाय. तोपर्यंत हळदीचा कार्यक्रम ऐकून होतो. पण, लग्नापेक्षाही मोठा हळदीचा सोहळा त्या दिवशी अनुभवला. वैभवने आम्हाला थेट चाळीच्या छतावर बसायला दिलं होतं. लग्न परबांच्या वैभवचं होतं, पण अख्खी चाळच वऱ्हाडी झाली होती. हळदीचा रंग पिवळा असला तरी ज्या आनंदरंगात सगळे न्हाऊन निघाले तो रंग कुणी तयार करु शकत नाही, तो आतून येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.


आज बीडीडी चाळ पुनर्विकासाचे बोर्ड ठिकठिकाणी लागले, कार्यक्रम पार पडला. तेव्हा हा सारा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरुन तरळून गेला. माझ्या चार-पाच वर्षांच्याच सहवासाने जर बीडीडी चाळीशी माझं इतकं घट्ट नातं झालंय, तर या वास्तुत अवघी हयात, आपलं सारं आयुष्य घालवणाऱ्या मंडळींचा ऊर आज नक्की दाटून आला असणार. चाळींच्या पुनर्विकासाचा पाया रचला जात असतानाच त्यांच्याही मनात अशा टोलेजंग आठवणींनी दाटी केली असणार. या सर्वांना त्यांच्या मनासारखं नवं घर लवकर मिळू दे हीच शुभेच्छा. मोठ्या घरांमध्ये जाताना या क्षणांची श्रीमंती त्यांची घरं अधिक समृद्ध करेल. चाळीतल्या आठवणींचा दरवळ त्यांचं पुढचं आयुष्य सुगंधाने भरुन आणि भारुन ठेवेल.