टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचा क्लायमॅक्स सीन काही तासांवर आलाय. एकूणातच हा सिनेमा चांगला रंगला. भारतीय टीमसारखे क्रिकेटच्या पडद्यावरचे हिट कलाकार अपेक्षेप्रमाणे भूमिका बजावू शकले नाहीत. तर, पाकिस्तानसारख्या टीमच्या तुलनेने नव्या असलेल्या शिलेदारांनी सेमी फायनलपर्यंत बाजी मारली. असं असतानाच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलचे कठीण पेपर सोडवत फायनल गाठली. टी-ट्वेन्टी क्रिकेटचा थरार म्हणजे काय, हे या दोन्ही मॅचेसनी दाखवलं.


इंग्लंडच्या खिशात सामना आहे, असं वाटत असतानाच मिशेल-नीशॅम जोडीने त्यांच्या तोंडातला विजयाचा घास काढला. अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये सामना फिरला. त्याचीच झेरॉक्स कॉपी पाहायला मिळाली, दुसऱ्या दिवशी. वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलसारख्या तोफा तंबूत गेल्यानंतर पाकिस्तान टीमला वाटलं असणार आला फायनलचा मौका. त्याच वेळी मॅथ्यू वेड आणि स्टॉईनिस जोडीचं वादळ शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये पाकिस्तान टीमच्या आशांचा पालापाचोळा करुन गेलं.


दोन्ही मॅचेसमधील समान दुवे म्हणजे दोन्ही टीम्समध्ये असलेल्या ऑलराऊंडर्सचा भरणा. तसंच फलंदाजीतली डेप्थ. म्हणजे आघाडीचे बुरुज कोसळल्यानंतरही मधल्या फळीतील सैनिकांमुळे त्यांची तटबंदी अभेद्य राहिली. इतकंच नव्हे तर या सैनिकांनी गड जिंकून आणला. नीशॅम आणि वेड या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी आपापल्या टीम्सची नौका पार केली, तीही हुकमी मोठे फटके खेळत. त्यातही शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेडने चढवलेला हल्ला अंगावर शहारे आणणारा होता. अर्थात तिथे मला ऑस्ट्रेलियन टीमच्या बुद्धिमान क्रिकेटची चुणूक पाहायला मिळाली. म्हणजे शाहीन आफ्रिदीच्या डावखुऱ्या गोलंदाजीसमोर डावखुरा मॅथ्यू वेडच फलंदाजीला येईल, अशा प्रकारे ते प्लॅनिंग वाटलं. डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू उजव्या फलंदाजाला थोडा त्रासदायक ठरु शकतो. रोहित शर्माची विकेट आठवा किंवा मग याच मॅचमधील फिंचची. याउलट डावखुऱ्या फलंदाजाला डावखुऱ्या गोलंदाजाचा अँगल वापरता येतो. त्यात ऑसी फलंदाज वेगाच्या पाळण्यात वाढलेले. त्यामुळे शाहीन आफ्रिदीच्या वेगाचं त्यांना अजिबात कौतुक, प्रेशर वगैरे काहीही नाही. वेडने तीन वेळा चेंडूला स्टँडची सैर घडवून आणली. त्यातले दोन चेंडू तर संभाव्य यॉर्कर टाईप्स होते.


रविवारची फायनलदेखील अशीच अखेरच्या क्षणापर्यंत रंगली आणि तीही एखाद्या अष्टपैलूच्या झंझावाताने गाजली तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात नॉक आऊट मॅच, त्यात दुबईचं मैदान, पडणारं किंवा न पडणारं संभाव्य दव यामुळे निर्णायक ठरु शकणारी नाणेफेक अशा अनेक गोष्टी यात मॅटर करतात. किवी टीमची जाणवणारी खासियत म्हणजे त्यांच्या टीममध्ये विल्यमसनसारखा खणखणीत चमकणारा हिरा असूनही सांघिक कामगिरी हे त्यांचं बलस्थान आहे. मिशेल, नीशॅम, सॅन्टनर किती नाव घ्यायची.


दोन्ही टीम्स एकमेकांना बॅलन्स वाटतात. इकडे गप्टिल तिकडे वॉर्नर, इकडे विल्यमसन तिकडे स्मिथ, इकडे नीशॅम तिकडे वेड, इकडे बोल्ट तिकडे स्टार्क, इकडे साऊदी तिकडे कमिन्स,  इकडे सॅन्टनर तिकडे झॅम्पा. हिसाब बराबर लग रहा है.अर्थात टी-ट्वेन्टी मॅच ही लहरी हवामानासारखी असते. कधी वातावरण बदलेल सांगता येत नाही. तो दिवस, तो क्षण आणि तो खेळाडू यावरच सारं काही अवलंबून असतं. तरीही सध्याच्या घडीला ही मेगाफायनल फिफ्टी-फिफ्टी कॉन्टेस्ट वाटतेय. रविवारी टी-ट्वेन्टी क्रिकेटची ही मेजवानी घ्यायला सज्ज होऊया.


संबंधित ब्लॉग-