गणेशोत्सव पण आमचा गणपती! कारण आम्ही कोकणातले. राज्यभरात होणारा गणेशोत्सव आणि आमच्या कोकणातील गणेशोत्सव हा पूर्णपणे वेगळा. आमच्यासाठी सर्वस्व आणि गणेश विसर्जनानंतर लगेचच आम्ही पुढच्या वर्षीचं गणेश आगमन आणि त्याच्या प्लॅनिंगला लागतो. यावरून आम्हा कोकणवासियांसाठी गणेशोत्सव किती जिव्हाळ्याचा विषय असेल हे लक्षात येईल. आम्ही कोकणी माणूस जगात कुठंही असलो तरी गणपतीसाठी गावी येणार नाही असं होत नाही. वर्षभर सुट्टी न घेता काम करणारे थेट गणेशोत्सवासाठी आपली ऑफिसमधील सुट्टी राखून ठेवतात. यावरून आमच्यासाठी गणेशोत्सवाचं महत्त्व किती असेल हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. 


राज्याच्या विविध भागात, शहरात होणारं गणपती बाप्पाचं आमगन आणि आमच्या कोकणातील बाप्पाचं आगमन यामध्ये मोठा फरक. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर किंवा मग औरंगाबादमध्ये निघणाऱ्या मोठ मोठ्या मिरवणुका या निश्चितच आकर्षणाचा केंद्रबिंदू. पण, आम्ही कोकणी माणूस आजही पारंपरिक पद्धतीनं, वाड-वडिलांपासून चालत आलेल्या रूढी, प्रथा, परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करतो. झाकडी, नमन, भजन, आरती, फुगडी यांच्या साथीनं आम्ही बाप्पाचा जयघोष करत असतो. कोकणातील प्रत्येक घरात बाप्पा विराजमान होत असल्यानं प्रत्येकाची लगबग असते. अगदी सजावट करण्यासाठी देखील एक छुपी पण सुप्त अशी स्पर्धा असते. याच निमित्तानं आम्ही बाप्पाचा आशिर्वाद घेत आमच्या नातलगांना हक्कानं भेटून धम्माल आणि मजा, मस्ती करण्यात दंग देखील असतो. 


या गणेशोत्सवानिमित्त काही आठवणी देखील जाग्या होतात. लहान असताना साजरा होणार गणेशोत्सव आणि आत्ताचा यामध्ये नक्कीच फरक पडलाय. बरंचसं शिक्षण कोकणात झाल्यानं गणेशोत्सवातील सारे पैलू आणि मागच्या गोष्टी आजही डोळ्यासमोरून झरझर सरकतात. कधी काळी बाबांना हाक मारणाऱ्या आमच्यापैकी अनेक जण आई - बाबा झालेत. त्यामुळे एक जनरेशन गॅप आणि फरक नक्कीच जाणवतो. भजन करताना पारंपरिक चालीवर गायली जाणाऱ्या भजनांमध्ये एक वेगळं अॅडिशन जाणवते. अर्थात आमच्या कोकणी माणसाचा बाप्पाप्रती असलेला भाव मात्र तोच आहे. आपल्या नातवंडांना बोट धरून प्रथा - पंरपरा शिकवताना आजी आजोबांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा भाव पाहण्यासारखा असतो. शिक्षण असो किंवा नोकरी धंदा यानिमित्त शहरांमध्ये वास्तव्याला असलेला प्रत्येक कोकणी माणूस आपल्या कुटुंबासह आपल्या मूळगावी दाखल होतो.काळ बदलला तरी आम्हा प्रत्येक कोकणी माणसाची बाप्पाप्रति असलेली भावना आणि ओढ कायम आहे.
 
तसं मुंबईत जवळपास 10 वर्षे वास्तव्य केलं. परिणामी मी देखील एक मुंबईकर झालो होतो. शिक्षणातील काही भाग आणि नोकरीची सुरूवात मुंबईतील त्यामुळे गणेशोत्सवातील काही दिवस मी अनुभवले आहेत. पण, मनापासून सांगायचं झालं तर शरीर मुंबईत पण मात्र गावी अशी अवस्था असायची. मुंबईनं खूप काही शिकवलं पण मुंबईतील गणेशोत्सवात मन मात्र कधी रमलं नाही. मीडियामध्ये काम करताना अशा वेळी सुट्टी घेताना  कसरत असायची. कारण, प्रत्येकाला सण असल्यानं सुट्टी घेताना प्रत्येकाची दमछाक होत असायची. त्यात एकाच डिपार्टमेंटला काम करणारे कोकणातील असल्यास मग दिवस, तारखा आणि वेळ याचा नुसता किस पडायचा. तुमचं काय ते ठरवा आणि माझ्याकडे या वरिष्ठांचं सांगणं असायचं. मला आजही एक किस्सा आठवतोय एका टीव्ही चॅनलला मुलाखतीला गेलो होतो. अगदी एप्रिलचा महिना होता. मुलाखत तशी नीट झाली होता. त्यानंतर चहा मागवला आहे बस, तोवर बोलू म्हणून सहज  वरिष्ठांशी गप्पा चालल्या होत्या. त्यात कोकणातील शिक्षण, धम्माल किंवा काही किस्से असं सारं काही सुरू होतं. अर्थात इनफॉर्मल गप्पा असल्यानं मी शिमग्याची धमाल सांगितली. त्यावर समोरून लगेच इथं जॉईन झालास तर गणपतीला सुट्टी मिळणार नाही असं सरळ सांगितलं गेलं. मला पहिला राग आला. याला काय अर्थ आहे गणपतीला गावी जायला सुट्टी नाही म्हणजे काय? असा विचार मनात आला. मी हो ला हो म्हटलं. पण, जॉईन झाल्यानंतर सुट्टीसाठी लावलेला तगादा आणि सारी धावपळ पाहता त्याच व्यक्तिनं पुन्हा सांगितलं मुलाखतीला आलास तेव्हा सांगितलं होतं सुट्टी मिळणार नाही म्हणून. मग काय मी थेट संपादकांची केबिन गाठली होती. पण, गणपतीसाठी कोकणी माणूस काय करू शकतो त्याचा हा साधा किस्सा. मला आजही आठवते काही जण तर सरळ सांगतात सुट्टी नाही पण आलोय. गेल्यावर बघू.


कोकणातील गणेशोत्सवाची धमाल ही सामाजिकदृष्ट्या देखील असते. या काळात गावातील, घरातील किंवा अगदी इतर सर्व नातेवाईक यांची भेट अगदी हमखास होते. आरती, भजनं करताना तोवशी ( काकडी ) चिबूड यांची चोरी करण्याची मज्जा. आरती, भजन करताना होणारी धमाल या साऱ्या गोष्टी तुम्हाला माणूस म्हणून देखील अधिक समृद्ध करतात. अशाच आठवणी या प्रत्येकाच्या कोकणाती  गणेशोत्सवाशी जोडलेल्या आहेत. एक ठराविक पट्टा, जिल्हा किंवा गावांनुसार गणेशोत्सवातील प्रथा या बदलताना देखील दिसतात. विसर्जनादरम्यान कुणाची दारू सुटू दे, कुणाचं लग्न ठरू दे, नोकरी लागू दे, दहावी, बारावीला पास होऊ दे किंवा अमक्याच्या घरात पाळणा हळू दे ( बाळ होण्यासाठी केलेला नवस ) म्हणून बाप्पाला केलेला नवस या साऱ्यांमध्ये एक वेगळी आत्मियता असते. त्यामुळे हे सारं कधी अनुभवायचं असेल तर कोकणात फिरण्यासाठी तर याच. पण, गणेशोत्सवाला नक्की या!