हिंदी सिनेमात काम मिळायला लागलं की लोक कायम हवेत असतात. पण रमेश देव त्यातले नव्हते. मराठीतून ते हिंदीत गेले. नुसते गेले नाही, तर तत्कालिन प्रस्थापितांच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहिले. तिथे स्थिरावले, पण आपलं मराठीपण विसरले नाही. मराठी सिनेमासोबतच, रंगमंच आणि टीव्ही मालिकांमध्येही त्यांची मुशाफिरी सुरू होती. रमेश देव हे काळाच्या पुढचे अभिनेते होते ते यासाठीच की, त्यांनी कुठलंही नवं माध्यम आत्मसात केलं. वयाच्या नव्वदीनंतरही त्यांना सतत काहीतरी शिकायची इच्छा होती, नवीन पीढीसोबत काम करायचं होतं. नवं माध्यम जाणून घ्यायचं होतं. पण काळासमोर कुणाचं काही चालत नाही. अभिनेते रमेश देव आज आपल्यात नाहीयेत.


राजहंसासारखं अत्यंत देखणं, हँडसम व्यक्तिमत्व. वयाच्या 93व्या वर्षीही रमेशजींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होतं. चटकन कुणाच्याही नजरेत भरावा इतका भारदस्तपणा होता. एकंदरीतच पक्कं हीरो मटेरियल. पण सिनेमात त्यांनी विलनचेच रोल अधिक केले. राजा परांजपेंच्या आंधळा मागतो एक डोळा सिनेमात पहिल्यांदाच त्यांनी व्हिलनचा केला. तिथून त्यांचा सिनेमाचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. दिग्दर्शक होते राजा परांजपे. राजाभाऊंनी रमेशजींना अभिनयाचे बारकावे शिकवले. राजाभाऊ हे रमेशजींचे आद्यगुरू.


एक छोटासा प्रसंग तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक दिवस राजा गोसावी, शरद तळवलकर, सीमा देव, रमेश देव साहेब असे सगळे जण नाटकावरून परतत असताना त्यांची गाडी बंद पडली. ते शेजारच्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. शरद तळवलकरांनी हॉटेल मधल्या त्या मुलाला पाणी मागितलं. त्या मुलाने कसल्यातरी कळकट ग्लासात पाणी दिलं. तळवलकर म्हणाले “अरे तिकडे ते कामाचे ग्लास आहेत त्यात पाणी दे. हे काय दिलयंस.” त्यावर तो मुलगा हसून म्हणाला,  “तुम्ही काय स्वत:ला हीरो समजता का? ते ग्लास मोठ्या लोकांसाठी आहेत.” त्यावर शरद तळवलकर म्हणाले, “अरे आम्ही सिनेमात काम करतो. हे रमेश देव, हे राजा गोसावी, मी शरद तळवलकर..” त्यावर तो मुलगा परत हसला. आतमध्ये जाऊन तो देव आनंद आणि दिलीप कुमार यांचे फोटो घेऊन आला. सगळ्यांना दाखवत म्हणाला, “हे बघा हे आहेत हीरो..” या प्रसंगानंतर रमेश देव यांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी ठरवलं, आता हिंदीत जायचं. ते हिंदीत गेले आणि पुढे त्यांनी तब्बल साडे तीनशे हिंदी सिनेमांना आपल्या अभिनयाचा साज चढवला.


हिंदीत त्यांना प्रमुख भूमिका फार कमी मिळाल्या. 1962 साली आरती नावाचा पहिला हिंदी चित्रपट मिळाला. अशोक कुमार, प्रदीप कुमार, मीना कुमारी असे सगळे दिग्गज त्यांच्या सोबत होते. पुढे शिकार, सरस्वतीचंद्र, जीवन मृत्यू, खिलोना अशा हिट सिनेमांच्या पोस्टरवर रमेश देव झळकू लागले. पण देशभरात त्यांचं नाव पोहोचलं ते 1971 साली आलेल्या हृषिकेश मुखर्जींच्या आनंद सिनेमामुळे. त्याकाळचे बॉलिवुडचे सुपरस्टार राजेश खन्ना, सुपरस्टार होण्याच्या मार्गावर असलेले अमिताभ बच्चन आणि या दोघांसोबत आपले रमेश देव आणि सीमा देव. हिंदी सिनेयुगातला हा अत्यंत हिट सिनेमा होता. रमेश देव हे नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या घराघरात पोहोचलं. त्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांचा सपाटाच लावला. तत्कालिन सर्वच ज्युनियर, सीनियर कलाकरांसोबत त्यांनी खूप काम केलं. सुरूवातीला त्यांना सोज्वळ माणसाचे रोल मिळाले. पण नंतर मात्र व्हिलनचे रोल मिळू लागले. त्याकाळी अमजद खान, प्राण, प्रेम चोप्रा, अजीत अशी खलनायकांची मोठी फळी होती. या सर्वांच्या रांगेत आणखी एक नाव जोडलं गेलं ते रमेश देव यांचं.


बंद गळ्याच्या सूट, कपाळावर केसांची बट, ओठांवर पातळशी मिशी, नजरेतला बेदरकारपण आणि आवाजातला भारदस्तपणा. रमेश देव हीरो पेक्षाही व्हिलनच्या रुपात भाव खाऊन गेले. महिलांची छेड काढणारा, ‘बिगडे बाप की औलाद’ टाईप्सचे अनेक रोल हिंदीत केले. मराठीत मात्र ते जास्तीत जास्त वेळा हीरो म्हणूनच दिसले. पण ‘भिंगरी’ सिनेमातला खलनायक उल्लेखनीय होता. खलनायक असल्यामुळे सिनेमात अभिनेत्रीची छेड काढण्याचा सीन त्यांनी कितीतरी वेळा केला असेल. तब्बल शंभरपेक्षा जास्त सिनेमात तर त्यांनी अभिनेत्रींवर बलात्काराचा सीन केलाय. यामध्ये तत्कालीन हेमा मालिनी, नीतू सिंग पासून अनेक मोठ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. व्हिलनच्या रोलमध्ये त्यांच्यातला कोल्हापूरचा रांगडा गडी अगदी उठून दिसायचा.


रमेश देव होतेच कलानगरीचे... कोल्हापूरच्या मातीचा सुंगध त्यांचा अभिनयात होताच. रमेशजींचे वडिल छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात कायदे सल्लागार होते. शाहू महाराज त्यांना म्हणायचे, “काय देवासारखे धावून आलात.” तेव्हापासून त्यांचं आडनाव देव पडलं. तसं रमेशजींच्या वडिलांचं मूळ आडनाव ठाकूर होतं. हे ठाकूर म्हणजे राजस्थानचे. रमेशजींचे आजोबा, पणजोबा हे त्या काळातले उत्तम इंजिनीयर होते. जोधपूरमधल्या प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्यांना कोल्हापूर शहराच्या रचनेसाठी सल्लागार म्हणून नेमलं. नंतर ते कोल्हापूरला स्थायिक झाले.


रमेश देव यांनी कोल्हापुरमधूनच आपली अभिनय कारकीर्द सुरू केले. शेकडो नाटकात काम केलं. मग मराठी सिनेमा, नंतर हिंदी सिनेमा. पण या सगळ्या प्रवासात त्यांच्या सोबत होत्या नलिनी सराफ उर्फ सीमा रमेश देव.


सीमा देव आणि रमेश देव यांची भेटही ऐतिहासिकच आहे. रमेश देव यांना मोगऱ्याचा सुगंध फार आवडायचा. एक दिवस मुंबईच्या लोकलच्या डब्यात त्यांना मोगऱ्याचा सुगंध आला. मागे वळून बघतो तर एका मुलीनं केसांमध्ये भला मोठा गजरा माळला होता. रमेशजी ताडकन उठले आणि तिच्या समोर जाऊन बसले. ती मुलगी होती सीमा देव. विशेष म्हणजे त्या दिवशी रमेशजी गोरेगाव फिल्मसिटीत एका सिनेमाच्या निमित्तानं जात होते. सीमा देव या सुद्धा आपल्या पहिल्याच सिनेमाची बोलणी करण्यासाठी फिल्मसिटीत जाण्यासाठी निघाल्या होत्या. ती लोकलमधली मोगऱ्याच्या सुगंधाची भेट पुढे प्रेमविवाहात बदलली. या प्रसंगाला...


‘सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे.


आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे...’


या गाण्याच्या ओळी अगदी तंतोतंब बसतात.


रमेश देव आणि सीमा देव हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं एक सदाबहार जोडपं. अनेक सिनेमांत त्यांनी एकत्र काम केलं. काही सिनेमात प्रेयसी, तर काही सिनेमात पत्नी. ‘आलिया भोगासी’ आणि ‘सरस्वती चंद्र’ सिनेमात सीमा देव यांनी रमेश देव यांच्या बहिणीचा रोल केलाय. एका सिनेमात तर चक्क रमेश देव यांच्या मुलीचा रोलही सीमा देव यांनी साकारला. अनेक गंमती-जमतीमधून सुखी संसाराचं सिनेसृष्टीतलं हे आदर्शवत जोडपं होतं.


मराठीमध्ये ‘जगाच्या पाठीवर’, ‘पैशाचा पाऊस’, ‘पडछाया’, ‘पाठलाग’, ‘सुवासिनी’, ‘मोलकरीण’, ‘पुढचं पाऊल’ अशा हिट सिनेमांपासून ते 2012 साली आलेल्या ‘पीपाणी’ सिनेमापर्यंत दोनशेपेक्षा जास्त सिनेमात काम केलं, हिंदीत 1962 सालच्या आरती सिनेमापासून ते 2016 साली सनी देओलच्या ‘घायल वन्स अगेन’ सिनेमापर्यंत साडेतीनशे सिनेमांत काम केलं. म्हणजे साडेपाचशे सिनेमात अखंड काम.. नाटकांचे हजारो प्रयोग, दुसरीकडे मालिका.. अशी मुशाफिरी त्यांची सुरू होती. 31 जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. तेव्हाही ते आपल्याला ‘आणखी काम करायचंय!’ असं खणखणीत आवाजात बोलले. ते एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही समृद्ध जीवन जगले आणि आपल्यालाही ती श्रीमंती बहाल केली.


रमेश देव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.