‘ये जीत नही, ‘डॉमिनन्स’ की कहानी है, द्रविड के लडकोंने कब किसकी मानी है’ 19 वर्षाखालील भारतीय संघाला चौथा विश्वचषक जिंकून देणारी धाव भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्विक देसाईने घेतल्यानंतर समालोचन कक्षात बसलेल्या आकाश चोप्राच्या तोंडून निघालेलं हे वाक्य. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाचं चपखल वर्णन करणारं.
न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कांगारूंच्या संघाचा दणदणीत पराभव करत चौथ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजेतेपदासह भारताने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. कांगारुंचा संघ तीन विजेतेपदासह दुसऱ्या स्थानी आहे.
या संपूर्ण स्पर्धेतील भारतीय संघाच्या प्रवासावर नजर टाकली असता एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते की भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेवर निर्विवादपणे आपले वर्चस्व राखले. अगदी पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत सगळेच सामने आपण एकहाती जिंकले. संपूर्ण स्पर्धेत कुठेही भारतीय संघ संघर्ष करताना दिसला नाही. एकही पराभव संघाने पाहिला नाही. शिवाय प्रत्येक विजय हा प्रतिस्पर्धी संघाला शब्दशः ‘धूळ चारणारा’ आणि म्हणूनच ही फक्त विजयाची कहाणी न राहता ‘डॉमिनन्स’ची कहाणी ठरते. हा संपूर्ण प्रवास सत्तरच्या दशकातील विंडीजच्या संघाची किंवा 1999 ते 2009 या काळातील कांगारुंच्या संघाच्या क्रिकेटवरील वर्चस्वाची आठवण करून देणारा आहे.
संघाचे प्रशिक्षक ‘सर’ राहुल द्रविड बद्दल काय बोलणार..? या माणसाविषयी बोलावं-लिहावं तितकं थोडंच आहे. त्याच्यामागे ज्या वैभवशाली क्रिकेट कारकीर्दीचा वारसा होता, त्याचा विचार करता मुख्य भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणूनही तो सहज रुजू होऊ शकला असता, तशी विचारणा देखील त्याला झाली होती. पण त्याच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्याने 19 वर्षाखालील संघ आणि भारतीय ‘अ’ संघाचं प्रशिक्षकपद सांभाळण्याचा निर्णय घेतला. कारण काय तर त्याला म्हणे याच खेळाडूंची भक्कम पायाभरणी करून त्यावर भारतीय संघाची इमारत उभारायची होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एवढा प्रदीर्घ अनुभव असणारा खेळाडू 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळू इच्छित होता. हा असा निर्णय घेणं फक्त त्याच्यासारखा क्रिकेटच्या कर्मयोग्यालाच शक्य होतं.
द्रविडने संघाची सूत्रे हाती घेतली आणि मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी करायला घेतली. द्रविड सरांनी या नवख्या पोरांवर घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणून आज चौथ्यांदा भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. साहजिकच त्याबद्दल द्रविडवर प्रचंड प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होतोय. पण या यशाचं श्रेय घेणं मात्र द्रविडने नम्रपणे नाकारलंय. हे संपूर्ण संघाच्या कठोर मेहनतीचं आणि सपोर्ट स्टाफचं यश असल्याचं मत त्याने व्यक्त केलंय. एवढ्या महत्वाच्या क्षणी हे असं इतकं विनम्र होता येणं, यश मिळालेलं असताना पाय जमिनीवर ठेवता येणं हेच द्रविडचं मोठेपण. ज्यामुळे तो इतरांपेक्षा उठून दिसतो. एक मात्र निश्चित की द्रविडला त्याच्या कारकिर्दीत कधीच विश्वचषक जिंकता आला नव्हता, पण या विजयाने हे विश्वचषक विजयाचं स्वप्न सत्यात उतरलंय. त्यामुळे भारतीय युवा संघाने आपल्या ‘सरांना’ दिलेली भेट निश्चितच खूपच स्पेशल आहे.
प्रशिक्षक म्हणून द्रविडने केवळ खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीवरच लक्ष केंद्रित केलं असं नाही तर मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना शांत आणि संयमितपणे परिस्थिती कशी हाताळायची याचे धडे देखील त्याने या युवा खेळाडूंना दिले. खेळाचं म्हणून एक मानसशास्त्र असतं, हे त्यांच्या मनावर व्यवस्थितरीत्या बिंबवलं. त्याचाच परिपाक म्हणून की काय पण आजच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरलेला कांगारूंचा संघ ज्यावेळी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला त्यावेळी त्यांनी, त्यांचं हुकमी अस्त्र म्हणजेच ‘स्लेजिंग’ची सुरुवात केली. पण पृथ्वी शो असेल किंवा मनज्योत कालरा असेल दोघांनीही त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होणार नाही, याची काळजी घेत आपापल्या महत्वपूर्ण इनिंग्ज साकारल्या.
उपांत्य फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी घडवलेले खिलाडूवृत्तीचे दर्शन देखील तितकेच महत्वाचे. या गोष्टी जरी छोट्या असल्या तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या अतिशय परिणामकारक ठरत असतात. या गोष्टींवर राहूल द्रविडच्या उपस्थितीचा प्रभाव निश्चितच जाणवल्याशिवाय राहात नाही.
पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, शुभम मावी, अनुकूल राय (संघ म्हणून ही पोरं इतकी चांगली खेळलीयेत की बहुधा सगळ्यांचाच उल्लेख करायला लागेल) यांसारखे अनेक नवीन चेहरे या विश्वचषकाने भारतीय क्रिकेटला दिलेत. यातली बहुतेक नावे नजीकच्या भविष्यकाळात भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर तळपताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. यातील बहुतेकांनी आपल्या कामगिरीचं श्रेय द्रविडलाच दिलंय. ही पोरं गेल्या दीड वर्षात द्रविड ‘सरांच्या’ तालमीत तयार झालेली असल्याने निश्चितच त्यांचा पाया भक्कम झालाय. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना बघणं ही क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. तूर्तास विश्वचषक विजेत्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा.
(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)
क्रिकेटच्या कर्मयोग्याला भारतीय संघाची विश्वविजयी भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2018 09:40 PM (IST)
द्रविडने संघाची सूत्रे हाती घेतली आणि मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी करायला घेतली. द्रविड सरांनी या नवख्या पोरांवर घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणून आज चौथ्यांदा भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. साहजिकच त्याबद्दल द्रविडवर प्रचंड प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होतोय. पण या यशाचं श्रेय घेणं मात्र द्रविडने नम्रपणे नाकारलंय. हे संपूर्ण संघाच्या कठोर मेहनतीचं आणि सपोर्ट स्टाफचं यश असल्याचं मत त्याने व्यक्त केलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -