बालपण! सर्वांना हवंहवासा वाटणारा काळ. या काळात प्रत्येकाच्या आठवणी असतात. आठवणींच्या मखमलीरुमालात त्या प्रत्येकाने जपून ठेवलेल्या असतात. काळ सरु लागला की प्रत्येकाचं मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झोका घेतं. 'रम्य ते बालपण' म्हणत प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा काळ आठवताना प्रत्येक जण याबद्दल भरभरुन बोलताना दिसून येतो. लहानपण, आई-बाबा, आजी-आजोबा, मामाचं गाव, बालपण गेलेलं ठिकाण, गाव-शहर, सुख-दु:ख अशा एक ना अनेक गोष्टींना हा आठवणींचा पेटारा प्रत्येकानं जपून ठेवला आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला स्फूर्ती, उमेद देतात. नवीन गोष्टी, नवीन अनुभव ऐकायला आणि जगायला एक वेगळीच मजा असते. आयुष्याची गाडी रुळावर धावू लागल्यानंतर एक एक गोष्ट झरझर मागे सरते. अशांपैकी एक म्हणजे शाळेतील आयुष्य. पहिली पायरी चढताना होणारा स्वागत समारंभ ते शाळेतून बाहेर पडताना होणारा निरोप समारंभ, या कालावधीत असंख्य आठवणी आपल्या स्मृतींच्या या गाठोड्यात असतात. कधीकाळी निवांतपणे हे आठवणींचं गाठोडं उघडल्यानंतर त्या उलगडून पाहताना चेहऱ्यावर नकळत हसू देखील फुलतं. 


माझी गावची प्राथमिक शाळेत देखील या आठवणींनी भरलेला पेटारा आहे. (हायस्कूल, कॉलेज याच्या आठवणी देखील नक्कीच आहेत) सहजपणे ग्रामीण भागात बातमीकरता फिरताना अनंताचं झाड आणि त्यावर फुललेलं फुल दिसलं आणि नकळत मन त्याच्याभोवतीच्या कथेत रमलं. बाई! बाई! म्हणून होणारा गलका कानात गुंजू लागला. डोळ्यासमोर तो सारा प्रसंग उभा राहिला. 




गावच्या घरासमोर, शेजाऱ्यांच्या घरासमोर विविध प्रकारची फुलं आणि त्यांची बाग अक्षरक्षा फुलून गेलेली असायची. विविध प्रकारचे गुलाब, कृष्णकमळ, चाफा, अनंत, आबुली अशी कितीतरी फुल झाडांकडे पाहताना डोळ्यांना सारं विलोभनीय वाटायचं. तोच मागून आवाज यायचा, बघतोस काय? तोड त्या फुलाला आणि शाळेत जाताना घेऊन जा आणि दे बाईंना! आई, आजी, काकी सहजपणे फूल तोडून हातावर द्यायची. उद्या बाईंना फूल द्यायचं या विचारानं मन हर्षभरीत होऊन जात असे. रात्री एखाद्या पाण्यानं भरलेल्या भांड्यात ते फुल कोमेजू नये म्हणून ठेवत त्याची विशेष काळजी घेतली जायची. काही वेळेला तर शाळेतल्या बाईंना उद्या फूल द्यायचे म्हणून आदल्याच दिवशी एक कळी तोडून ठेवायची. उद्या बाईंना फूल द्यायचं आहे म्हणून मन आनंदानं डोलू लागायचं. 


सकाळी शाळेत जाताना डब्बा राहिला तरी चालेल पण, फूल मात्र विसरता कामा नये यासाठी दक्षता घेतली जात असे. बाईंना फूल देण्यासाठी शाळेच्या दिशेनं पावलं भराभरा चालू लागायची. फुलाला धक्का लागू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असे. वर्गात गेल्यानंतर शक्यतो लपवण्याचा आव आणत पण दुसऱ्याच्या नजरेस पडेल अशा रितीनं वर्गात प्रवेश करायचा. पण, यामध्ये एक गोष्ट आणखी देखील आहे, वर्गात असे आणखीन देखील विद्यार्थी असायचे ज्यांनी बाईंसाठी फूल आणलेलं असायचं. काही वेळा तर मुली चक्क गजरा विणूनच घेऊन आलेल्या असायच्या. वर्गात तासिकेसाठी बाईंचा प्रवेश होईपर्यंत आपणच बाईंसाठी फूल घेऊन आलोय हा गोड गैरसमज असायचा. पण, बाईंनी वर्गात प्रवेश केल्यानंतर त्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्यासमोर फुलांचा जणू सडाच पडलेला असायचा. त्यामुळे बाईंनी माझ्याकडील फूल घ्यावं यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची. पण, बाई देखील कुणालाही न दुखवता या साऱ्याला नीटपणे हाताळायच्या. तो क्षण, त्यावेळी वर्गात होणारा गलका संपूर्ण शाळेत ऐकू जायचा. वऱ्हांड्यातून कुणी एक शिक्षक जात असल्यास ए मुलांनो शांत बसा की, बाई सर्वांची फुलं घेणार म्हणून मायेनं दम देखील भरायचे. 




इतकी सारी फुल पाहिल्यानंतर हिरमोड मात्र नक्की व्हायचा. कारण, बाईंसाठी फूल आणलेला मी एकटाच नव्हतो हे कळल्याचं दु:ख आणखी जास्त असायचं. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा एका नवी शक्कल लढवत बाईंना फूल द्यायचं. केव्हा केव्हा तर शिक्षकांच्या वर्गात थेट घुसखोरी व्हायची. हे सारं करणारा मी काही एकटाच नव्हतो. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त असायची. पण, बाईंना फूल आणून देण्यामध्ये होणारी चढाओढ आठवल्यानंतर चेहऱ्यावर मात्र एकच हास्य फुलतं. इतकंच नाही तर शाळा सुटल्यानंतर गाडीवरुन बाई जात असताना होणारा गलका आज देखील श्रवणीय वाटतो. मन या आठवणींभोवती रुंजी घालू लागते. शाळेच्या आठवणी, मित्र हे सारे प्रसंग भराभर डोळ्यासमोरून सरकू लागतात. कारण, आठवणी या तुम्हाला नेहमीच फुलांच्या सुगंधाप्रमाणे प्रफुल्लित करत असतात! तुमच्या वर्तमानात त्यांचा दरवळ हा कायम हवाहवासा वाटतो.