गेल्या काही दिवसापूर्वी एव्हरग्रीन नावाचं  महाकाय जहाज सुएज कालव्यात अडकलं आणि जगाचा मोठा व्यापार ठप्प झाला. या जहाजाने सुएज कालवा ब्लॉक केल्याने जगाचं तासाला सुमारे 2800 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं. सहा-सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेलं हे जहाज निघालं आणि जगाने सुटकेचा निश्वास टाकला. पण या कालव्याने जगाला अशा प्रकारे काही पहिल्यांदाच कोड्यात टाकलं नव्हतं. त्या आधी 1956 साली या कालव्याच्या नियंत्रणावरून युद्ध झालं होतं, दोन महासत्ता आमने-सामने आल्या होत्या. 


सुएज क्रायसिस किंवा सुएज कालव्याचा प्रश्न ही विसाव्या शतकातील अशी घटना होती की त्याने एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटन आणि फ्रान्सच्या शक्तीला जवळपास संपवलं. आज या दोन राष्ट्रांकडे संयुक्त राष्ट्रातील केवळ स्थायी सदस्यत्व आहे आणि ते देखील अमेरिका नियंत्रित करते अशी परिस्थिती आहे. 


सुएज कालव्याचा प्रश्न हा 29 ऑक्टोबर 1956 रोजी इस्त्राईलच्या लष्कराने इजिप्तवर केलेल्या हल्ल्याने सुरू झाला. त्याला नंतर ब्रिटन आणि फ्रान्सने साथ दिली आणि सुएज कालव्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रशियाने आक्रमक भूमिका घेतली आणि अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली. या कालव्याचे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी राष्ट्रीयीकरण केलं होतं. सुएज कालवा एवढ्यासाठी महत्वाचा होता कारण युरोपकडे जाणारे दोन तृतीयांश कच्चे तेल हे या कालव्याच्या माध्यमातून जायचे. सुएज कालव्याचा प्रश्न हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्तामधील शीतयुद्धातील एक महत्वाची घटना मानली जाते. 


सुएज कालवा निर्मितीचे प्रयत्न
ब्रिटन आणि फ्रान्स तसेच इतर युरोपीयन देशांचा मुख्य व्यापार हा भारत आणि इतर आशियायी देशांशी होता. त्यासाठी त्यांना पार आफ्रिका खंडाला वळसा घालून यावं लागत होतं. त्यावेळी सुएज कालव्याच्या माध्यमातून युरोपीयन देशांना आशियाशी व्यापारी संबंध ठेवण सुलभ ठरत होतं. 1799 साली नेपोलियनने या कालव्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता पण मोजमापाचे गणित न बसल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. 


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात फ्रेन्च इंजिनिअर फर्डिनांड डी लेसेप्स याने सुएज कालवा निर्मितीची एक योजना आखली आणि ती इजिप्तच्या शासकाच्या, सैद पाशाच्या गळी उतरवली. त्या अर्थी सुएज कालवा निर्मितीची कल्पना ही फ्रान्सची. हा कालवा झाला तर युरोपला आशियाशी व्यापार करणं सुलभ होईल असं फ्रान्सचं मत. ब्रिटनचा याला विरोध होता. त्यांना अशी भीती होती की हा कालवा झाला तर युरोपातील कोणताही देश उठेल आणि भारताशी व्यापार करेल. 


सुएज कालव्याच्या निर्मितीचे काम सुरू
सुएज कालव्याच्या निर्मितीचे काम 1858 साली सुरू करण्यात आले. या कालव्याच्या निर्मितीचे काम फ्रेन्च कंपनी असलेल्या 'युनिव्हर्सल सुएज शीप कॅनाल कंपनी' कडे देण्यात आलं. हा कालवा तयार करताना असा करार करण्यात आला की, ज्या वेळी हा कालवा सुरू होईल तेव्हापासून 99 वर्षासाठी तो भाडे तत्वावर या कंपनीकडेच राहिल आणि नंतर त्याचे अधिकार इजिप्तकडे देण्यात येतील. तब्बल दहा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 1869 साली हा कालवा वाहतूकीसाठी खुला झाला. इजिप्तच्या वाळवंटात तयार करण्यात आलेला हा कालवा जवळपास 193 किलोमीटर लांबीचा आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी तसेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.


ब्रिटिशांनी संधी साधली
त्यावेळी इजिप्तवर ऑटोमन साम्राटाचं राज्य होतं. या कालव्याच्या निर्मितीत इजिप्तचा सर्वेसर्वा सैद पाशाचाही पैसा लागला होता. पण 1875 साल उजाडता हा पाशा मोठ्या कर्जात बुडाला. मग आपल्याला डावलून सुरू करण्यात आलेल्या या कालव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी डावपेच आखले. 1882 साली पाशाच्या विरोधात त्याच्या लष्कर प्रमुखानेच उठाव केला. अडचणीत सापडलेल्या पाशाने ब्रिटिशांकडे मदत मागितली आणि ब्रिटिशांना आयतीच संधी मिळाली. ब्रिटिशांनी पाशाला लगेच मदत केली कारण कोणत्याही परिस्थितीत त्यांना सुएज कालव्यावर नियंत्रण हवं होतं. आता सगळ्या इजिप्तवर ब्रिटिशांचं नियंत्रण प्रस्थापित झालं आणि पाशा त्यांच्या हातातला एक बाहुला बनला. इजिप्तच्या पाशाने सुएज कालव्याच्या आपल्या हक्काचे सर्व शेअर्स ब्रिटिशांना विकले आणि ब्रिटिशांनी कायदेशीररीत्या सुएज कालव्यावर कब्जा मिळवला.


पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जर्मनीपासून या कालव्याचं संरक्षण केलं. 1936 साली ब्रिटिशांनी इजिप्तला स्वातंत्र्य दिलं पण सुएज कालव्यावरचं नियंत्रण सोडलं नाही. ब्रिटिशांनी पुढच्या 20 वर्षासाठी सुएज कालव्यावर ब्रिटिशांचं  नियंत्रण राहिल असा एक करार केला. त्यानुसार, ब्रिटिशांनी आता सुएज कालव्याच्या आजू्बाजूला आपलं लष्कर तैनात केलं. सुएज कालव्याचं महत्व ब्रिटिश चांगलंच ओळखत होते. कारण या कालव्यावर नियंत्रण असल्याने ब्रिटिशांना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही यश मिळालं होतं. 


नासेर यांनी इजिप्तची सत्ता हातात घेतली
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक सत्तेची समीकरणं बदलली होती. 1952 साली इजिप्तच्या लष्कराने सत्ता हातात घेतली. या क्रांतीचे प्रमुख आणि आता नव्या इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते गमाल अब्देल नासेर. होय, हे तेच नासेर आहेत ज्यांनी नेहरुंच्या सोबत मिळून अलिप्ततावादी गटाची स्थापना केली. नासेर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आता इजिप्तचे आणि ब्रिटिशांचे संबंध बिघडले. 


हा तोच काळ होता ज्यावेळी इस्त्राईल आपल्या अस्तित्वासाठी अरब राष्ट्रांशी लढत होतं. अब्दुल नासेर तर सुरुवातीपासूनच इस्त्राईलच्या विरोधात होते. या दोन देशांत सातत्याने लहान-सहान युद्धे व्हायची. शीत युद्धाच्या या काळात इस्त्राईल अमेरिकेच्या बाजूने होता. नासेर यांना अमेरिकेकडून अत्याधुनिक हत्यारे हवी होती आणि ती अमेरिकेने देण्यात नकार दिला. अमेरिकेला चांगलेच माहित होतं की या हत्यारांचा वापर इस्त्राईलच्या विरोधात होणार होता.


आस्वान धरण बांधायचा निर्णय आणि सुएज कालव्याचं राष्ट्रीयीकरण
पण नासेर अमेरिकेवर नाराज होणाचं प्रमुख कारण वेगळंच होतं. इजिप्तला त्याच्या नाईल नदीवर आस्वान धरण बांधायचं होतं. त्यासाठी अमेरिकेने फंडिग करायचं कबुल केलं होतं. पण नंतर अचानक अमेरिकेने त्यातून माघार घेतली. त्यामुळे नासेर यांचा तिळपापड झाला. केवळ इस्त्राईलच्या सांगण्यावरून अमेरिकेने आपल्याला फंडिंग नाकारल्याचा राग नासेर यांना होता. आता त्यांना काहीही करून आस्वान धरण बांधायचंच होतं. त्यासाठी त्यानी एक मोठी योजना आखली, ती म्हणजे सुएज कालव्याचे राष्ट्रीयीकरण. 


आस्वान धरणाच्या निर्मितीसाठीचा पैसा उभा करण्यासाठी नासेर यांनी 20 जुलै 1956 साली सुएज कालव्याचं राष्ट्रीयीकरण केलं. यानंतरच सगळं महाभारत सुरू झालं. इजिप्तच्या लष्कराने आता सुएज कालव्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं. लगेच सोव्हिएत रशियाने आस्वान धरणाच्या निर्मितीसाठी इजिप्तला मदत करण्याची तयारी दाखवली. सोव्हिएतने 1955 पासूनच इजिप्तला शस्त्रास्त्रांची निर्यात सुरू केली होती. आपल्या वर्चस्वाखाली असलेल्या या कालव्याला इजिप्तने हिरावून घेतल्याने ब्रिटन खूपच नाराज होतं. फ्रान्सही या इजिप्तच्या या कृत्यावर नाराज होतं. 


नासेर अरब राष्ट्रात हिरो झाले
सुएज कालव्याच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयानंतर नासेर आता अरब देशात हिरो झाले होते. कोणीतरी अरब व्यक्ती आहे ज्याने पश्चिमी देशांना जशास तसं उत्तर दिलं अशी सर्वसामान्य अरब लोकांची भावना झाली. नासेर यांनी या कालव्यातून वाहतूक करणाऱ्या इस्त्राईलच्या सर्व जहाजांवर बंदी घातली. त्यामुळे इस्त्राईल, ब्रिटन आणि फ्रान्सला आता सुएज कालवा इजिप्तच्या हातात असणं धोकादायक वाटू लागलं. अमेरिकेची मात्र या प्रश्नात पडायची इच्छा नव्हती. नासेर यांनी आता या कालव्यातील वाहतूकीवर टोल लावायला सुरुवात केली. 


तीन देशांची इजिप्तवर हल्ल्याची गुप्त योजना
इजिप्तच्या विरोधात आता आपल्यालाच काही तरी केलं पाहिजे असं ब्रिटन, फ्रान्स आणि इस्त्राईलला वाटू लागलं. त्यामुळे 22 आणि 24 ऑक्टोबर 1956 च्या दरम्यान या तीन देशांची एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत असं ठरलं की, इस्त्राईलने इजिप्तवर पहिला हल्ला करायचा. त्यानंतर हे युद्ध समाप्त करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावं असं आवाहन ब्रिटन आणि फ्रान्स करणार आणि नंतर हे दोन्ही देश इस्त्राईलच्या वतीने या युद्धात भाग घेणार. त्यानंतर या तिन्ही देशांनी सुएज कालव्यावर नियंत्रण मिळवायचं अशी गुप्त योजना करण्यात आली. काहीही करून नासेर यांना सत्तेतून काढायचं आणि सुएज कालव्यावर नियंत्रण ठेवायचं हा या युद्धामागचा मुख्य उद्देश होता.


इस्त्राईलचा इजिप्तवर हल्ला आणि सुएज कालव्यावर नियंत्रण
ठरलेल्या नियोजनानुसार, 29 ऑक्टोबर 1956 ला इस्त्राईलने इजिप्तवर हल्ला केला आणि केवळ दोनच दिवसात संपूर्ण सिनाई पेनिन्सुलावर कब्जा केला. लगेच 30 ऑक्टोबरला ब्रिटन आणि फ्रान्सने या दोन्ही देशांना युद्ध संपवायचं आवाहन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच, 31 ऑक्टोबरला ब्रिटन आणि फान्सने इजिप्तवर वायूदलाच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव सुरू केला आणि सुएज कालव्याच्या युरोपकडील बाजूच्या पोर्ट सैद आणि पोर्ट फौदवर कब्जा केला. 6 नोव्हेंबरला ब्रिटिश आणि फ्रेन्च लष्कर इजिप्तला पोहोचलं आणि त्यांनी सुएज कालव्यावर कब्जा केला. या तीनही देशानी आपल्या नियोजनानुसार आता सुएज कालवा हातात घेतला होता.


अमेरिकेची नाराजी आणि रशियाची अणवस्त्र हल्ल्याची धमकी
पण ब्रिटन आणि फ्रान्सच्या या कृत्याचा जगभरातून निषेध केला गेला, खासकरून अमेरिकेने. या तिनही देशांनी अमेरिकेला अंधारात ठेवून ही कारवाई केली होती. त्यामुळे अमेरिका प्रचंड नाराज झाली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन हॉवर यांनी तर इस्त्राईल, ब्रिटन आणि फ्रान्सने आपले सैन्य मागे घ्यावे यासाठी त्यांना थेट धमकीच दिली. सोव्हिएत रशियाने तर ब्रिटन आणि फ्रान्सला अणवस्त्र हल्ल्याची धमकीदेखील दिली. त्यामुळे सुएज कालव्याच्या या प्रश्नाला आता वेगळंच वळण लागलं होतं. 


ब्रिटनच्या इजिप्तवरील हल्ल्यामुळे ब्रिटनची करन्सी असलेल्या पाऊंडची मार्केट व्हॅल्यू एकदम घसरली. त्याचा मोठा आर्थिक फटका ब्रिटनला बसला. दुसऱ्या महायुद्धात भरडलेल्या ब्रिटनच्या जनतेनेच त्या देशाविरोधात आंदोलन सुरू केलं. कारण दुसऱ्या महायुद्धातून आता कुठे बाहेर पडत असताना पुन्हा एकदा युद्ध आणि त्यातून घसरलेली अर्थव्यवस्था, यामुळे नागरिकांत असंतोष होता. 


जागतिक दबाव आणि सैन्य माघार
हे प्रकरण इतकं मोठं वळण घेईल असं ब्रिटन आणि फ्रान्सला वाटत नव्हतं. पण आता या प्रश्नावरून अमेरिकेसह जागतिक दबाव आल्याने ब्रिटनने 6 नोव्हेंबरला तर फ्रान्सने त्याच्या दुसऱ्या दिवशी आपले सैन्य माघारी घेतले. इस्त्राईलने सुरुवातीला सैन्य माघार घेण्यास नकार दिला पण डिसेंबर येईपर्यंत त्यांनीही आपले सैन्य माघार घेतले तसेच मार्च 1957 पर्यंत सगळा पेनिन्सुला प्रदेश पुन्हा इजिप्तला परत केला. संयुक्त राष्ट्राची शांती सेना अर्थात पीस कीपिंग फोर्सचा वापर सर्वप्रथम सुएज कालव्याच्या प्रश्नावेळी करण्यात आला होता. सिनाई पेनिन्सुलातून सैन्य माघार घेताना या पीस कीपिंग फोर्सने महत्वाची भूमिका बजावली होती. 


सुएज क्रायसिसचे परिणाम
सुएज क्रायसिसचा एक परिणाम म्हणजे इजिप्त आता या प्रदेशातील एक शक्तीशाली देश म्हणून समोर आला. नासेर यांची प्रतिमा आता एका हिरोच्या रुपात निर्माण झाली. सुएज कालव्याच्या प्रश्नामुळे अरब राष्ट्रवादाला चालना मिळाली. पण नंतर सिक्स डेज् वॉरच्या दरम्यान इस्त्राईलने याचा बदला घेतला आणि नासेर यांना जमिनीवर आणले.


दुसरं महत्वाचं म्हणजे या प्रश्नानंतर अमेरिकेने पश्चिम आशियात पूर्ण लक्ष घातलं. अमेरिका आता या अरब प्रदेशात बिग ब्रदरच्या भूमिकेत वावरू लागली. 


ब्रिटन आणि फ्रान्स जमिनीवर आले
सुएज कालव्याच्या या प्रश्नाचा सर्वाधिक तोटा हा ब्रिटन आणि फ्रान्सला झाला. या दोन्ही देशांचे प्रचंड आर्थिक आणि राजकीय नुकसान झालं. या  दोन्ही देशांनी अरबी प्रदेशातील आपले राजकीय वर्चस्व गमावलं तसेच त्यांची अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. सुएजच्या प्रश्नामुळे या दोन्ही देशांनी आपलं उरलं-सुरलं महासत्ता पदही गमावलं. त्याचा परिणाम असा झाला की आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देश ब्रिटन आणि फ्रान्सच्या गुलामीतून मुक्त झाले.


सुएज कालव्याचा प्रश्न हा केवळ दोन महासत्तांना आमने-सामने आणणारा नव्हता तर यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सची उरली-सुरली रयादेखील गेली.