वातावरण बदल हे सध्या सजीवांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. दुष्काळ, महापूर, जंगलातील वणवा, वादळ, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरचा वितळणारा बर्फ अशा अनेक संकटांना जगाला तोंड द्यावं लागतंय. वातावरण बदलाच्या प्रश्नावर जगातले अनेक देश अजूनही गंभीर नसल्याचं दिसतंय. विकासाच्या नावाखाली पृथ्वीला ओरबडायचं काम सुरु आहे. मग त्याचा फटका समुद्रकिनारी वसलेल्या अनेक शहरांना बसतोय. वातावरण बदलामुळे बर्फ वितळत आहे, त्यामुळे समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसतेय. जगातल्या अनेक शहरात जमिनीतील पाण्याच्या उपशाची पातळी ओलांडली गेलीय. त्यामुळे भौगोलिक रचनेमध्ये बदल होताना दिसतोय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे जकार्ता, कोलकाता, मेक्सिको सिटी, मियामी, शांघाय, बँकॉक अशी महत्त्वाची शहरं आकसत चालली आहेत, बुडत चालली आहेत.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या शहरांपैकी एक शहर. जकार्ताची लोकसंख्या जवळपास तीन कोटींच्या घरात आहे. मुळात हे शहर दलदलीच्या प्रदेशावर वसलेलं आहे. या शहरातून तब्बल 13 नद्या वाहतात. समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे हे शहर सध्या बुडत चाललं आहे. शहराच्या उत्तर भागात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे जकर्ताची मोठी जमीन पाण्याखाली गेलीय. आता अशी परिस्थिती निर्माण झालीय की इंडोनेशियाला नवीन राजधानी शोधावी लागत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, जकार्ता हे जगातले सर्वात वेगाने बुडणारे शहर आहे.
जकार्ता शहराच्या नद्या प्लॅस्टिक आणि कचर्याने प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे या शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच विकासाच्या नावावर काँक्रीटचे जंगल उभारल्याने नद्यांचा मूळचा प्रवाह बदललाय. जकार्ताची 40 टक्के लोकसंख्या ही पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाच्या उपशावर अवलंबून आहे. या शहरात विहिरी आणि बोअर मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातून भूजल उपसाही प्रचंड प्रमाणात केला जातो.
भौगोलिक रचनेनुसार जमिनीमध्ये खडकांच्या स्तरानंतर पाण्याचा एक थर असतो. त्याला आपण भूजल किंवा ॲक्विफर असं म्हणतो. त्या भूजल पातळीतील पाण्याचे प्रमाणापेक्षा जास्त उपसा झाले तर भौगोलिक रचना बदलते. पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा कमी झाल्याने वरुन जमिनीचा दाब पडतो आणि त्या ठिकाणची जमीन दबली जाते. बहुतांश वेळा पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने या भूजल पातळीचे पुनर्जिविकरण होत असतं.
पण जकार्ता शहराची गोष्टच वेगळी आहे. या शहरात प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा उपसा होतो. काँक्रीटच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरायला अडचण होते. त्यामुळे भूजलाचे पुनर्जिवीकरण न झाल्याने इथली जमीन मोठ्या प्रमाणावर दबली गेली. वातावरण बदलामुळे दोन्ही ध्रुवावरचा बर्फ वितळत आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आता या दोन्ही गोष्टींचा फटका जकार्ताला बसताना दिसतोय.
जकार्ता शहरातील नद्या प्लॅस्टिक आणि कचऱ्यामुळे अत्यंत प्रदूषित झाल्या आहेत त्यामुळे या शहराला महापुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. 2013 साली जकार्तामध्ये मोठा महापूर आला होता. त्यावेळी टायफॉईड आणि डेंग्यूमुळे कित्येक लोकांचा जीव गेला होता. महापुरापासून आणि समुद्राच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या शहराभोवती 2002 साली एक भिंत बांधण्यात आली. पण हा तात्पुरता उपाय झाला. तसेच काही कृत्रिम बेटाची निर्मिती करण्यात आली. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. पण हा तात्पुरता उपाय झाला. मूळचा प्रश्न त्यामुळे सुटणार नाही.
भारतातल्या कोलकाता शहराचंही तसंच आहे. या शहरातील चौथ्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाचा वापर करावा लागतो. अनियंत्रित पाण्याच्या उपाशामुळे या शहरातील जमीन आता समुद्राच्या पाण्याखाली जात आहे. मेट्रोच्या कामावेळी या शहरातील अनेक भागातील जमीनी खचल्या होत्या. एका अहवालानुसार, गेल्या शंभर वर्षात बँकॉक एक मीटर, पूर्व टोकियो चार मीटर, शांघाय दोन मीटरने पाण्याखाली गेलं आहे.
एकीकडे भूजल पातळी कमी होऊन जमीन खचत आहे तर दुसरीकडे तापमानात वाढ होऊन बर्फ वितळतोय. तापमान वाढीवर विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पण जकार्ता, कोलकाता सारख्या शहरांना बुडण्यापासून वाचवायचं असेल तर सर्वप्रथम भूजल उपशावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. तसेच पावसाचे पाणीही जमिनीत जिरवणं महत्त्वाचं आहे. टोकियो आणि शांघाय या शहरांनी यापासून धडा घेतला आणि जमिनीतून किती प्रमाणात पाण्याचा उपसा करायचे याबाबत नियम तयार केले. यासोबत शहरातील सुकलेल्या जलस्त्रोतांचे पुनर्जिविकरण तेवढंच महत्त्वाचं आहे.
वातावरण बदल आणि भूजलाचा अनियंत्रित उपसा यामुळे जकार्ता, कोलकाता सारखी शहरे बुडत आहेत. यापासून सगळ्या जगाने काही धडा घेण्याची निश्चितच गरज निर्माण झाली