BLOG: भारताला स्वातंत्र्य मिळणार हे आता पक्क झालं होतं. त्यावेळी नव्याने निवडलेल्या घटना समितीचे काही सदस्य गांधींजींकडे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गांधीजी त्यांना म्हणाले की, "मी आज तुम्हाला एक मंत्र देतो. राज्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ज्यावेळी तुमच्या मनात शंका असेल किंवा संभ्रम असेल, त्यावेळी तुम्ही पाहिलेल्या सर्वात दुबळ्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि स्वत: ला विचारा. आपण जे धोरण आखतोय त्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडेल का? त्यावेळी तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील."


गांधीजींनी सांगितलेला हा मंत्र किती सोपा आणि साधा आहे. हा मंत्र सत्ताधाऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून धोरणं आखल्यास आज देशासमोर आणि जगासमोर असणाऱ्या अनेक समस्या या गायब होतील. हीच आहे गांधी विचारांची समर्पकता.


सुमारे 73 वर्षापूर्वी तीन गोळ्या मारल्या गेल्या आणि एका अशा व्यक्तीला आपल्यापासून हिरावण्यात आलं ज्यांनी केवळ देशाला स्वातंत्र्यच मिळवून दिलं नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित अत्यंत सामान्य विचार मांडले. या सामान्य विचारांना आपल्या आयुष्यात अंमलात आणल्यास कोणीही असामान्य बनू शकतो. महात्मा गांधी हे असेच एक सामान्यातून असामान्य बनलेलं व्यक्तिमत्व आहे.


गांधींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी अनेक तत्वं आजच्या जगात समर्पक आहेत. गांधीवादाने जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यवादी सत्तेला उखडून फेकलं. त्यापासून अनेक दुर्बल देशांनी प्रेरणा घेतली आणि स्वातंत्र्याचा श्वास घेतला. गांधींच्या विचारांना आजही जगात ऐकलं जातं, त्यावर चर्चा केली जाते. सत्तर वर्षापूर्वी त्यांचा जीव घेण्यात आला पण त्यांच्या तत्वांना, ज्याला आपण गांधीवाद म्हणतो, त्याला कोणीच मारु शकलं नाही. म्हणूनच म्हणतात की 'गांधी कभी मरते नही....'


एक कुशल राजकारणी, अध्यात्मिक संत, पत्रकार, लेखक, विचारवंत अशी अनेक रुपं गांधींच्यात वसली होती. गांधींच्या आगमनापूर्वी भारताचा स्वातंत्र्य लढा काहीसा विस्तळीत होता. गांधींच्या नेतृत्वानंतर त्याची दिशा आणि दशाही बदलली. या लढ्याचे आजही जगात कौतुक केलं जातं.


चंपारण्य लढ्याचं नेतृत्व


1917 साली बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात लढ्याचं गांधीनी नेतृत्व केलं. चंपारण्याचा लढा हा गांधीजींचा भारतातील सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता. तो त्यांनी यशस्वी केला. शंभर वर्षापूर्वीची ही घटना आज भारतातील परिस्थितीशी तंतोतंत जुळताना दिसंतेय. आज भारतात शेतकरी आंदोलन सुरु आहे. सुमारे दोन महिन्यांपासून सुरु असलेलं हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर निघालंय असं दिसतं. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा करताना गांधीजींनी सांगितलेल्या 'दुर्बल व्यक्तीच्या मंत्रा'चा वापर केला असता तर ही वेळ आली नसती हे नक्की. गांधीजींच्या तत्वांचा खऱ्या अर्थाने आचरणात आणलं असतं तर शेतकरी आंदोलनात जी हिंसा झाली ती झाली नसती. चंपारण्यमध्ये साम्राज्यवादी, अन्यायी सत्तेविरोधात लढा होता. तो बापूंनी यशस्वी केला. पण आताचा लढा हा शेतकरी आपल्याच लोकांविरोधात लढतात, तरीही हिंसाचार होतोय. याचा कोणीतरी विचार केला पाहिजे.


धर्म कधीही बंदिस्त नसावा


आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात धार्मिक कट्टरता वाढताना दिसतेय. फक्त माझाच धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा कनिष्ठ ही मानसिकता मानवजातीला मारक ठरताना दिसतेय. गांधीजी नेहमी म्हणायचे की जगातले सर्वच धर्म हे शांततेचा संदेश देणारे आहेत. कोणीही एका धर्माचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तो सर्वच धर्माचे पालन करतो अशी गांधींची धारणा होती. गांधीजी स्वत:ला सनातनी असल्याचे मानत. त्यांचा सनातनी धर्म हा सत्य आणि अहिंसेचा विचार करणारा होता. धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेला त्यांचा नेहमीच विरोध होता.


गांधीजी म्हणायचे की धर्म हा कधी बंदिस्त नसावा, धर्माने नेहमी आपली दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कारण त्यामुळे दुसऱ्या धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारता येतात आणि धर्म हे सुसंवादाचे माध्यम बनते. आज धार्मिक कट्टरता, भाषा, पंथ प्रांताच्या नावाने भेदभावाच्या भिंती उभारल्या जात आहेत. अशावेळी गांधीवाद केवळ समर्पकच नव्हे तर त्यावरचा उपाय आहे.


गांधीजींपासून आजच्या राज्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी अशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची रामराज्याची संकल्पना. गांधींचे रामराज्य हे रामाच्या नावावर कोणत्याही हिंसेचं समर्थन करणारे नव्हते. गांधींच्या रामराज्यात कोणतीही भिती नसेल हा विचार त्यामागे होता. त्यांचे रामराज्य हे समानता आणि सर्वांच्या हिताचे रक्षण करणारे होते. आज गांधींचे नाव घेऊन सत्तेवर राहता येते पण त्यांच्या विचारांचे पालन करता येत नाही अशी अवस्था राज्यकर्त्यांची आहे.


आजचे राजकारण हे कट्टरता आणि विरोधी धर्मांचा तिरस्कार करणारे आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कधी-कधी मनुष्याचा जीवही घेतला जातो. सत्ता प्राप्त करण्यासाठी कोणत्याची चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो.


अत्योदयाची कल्पना 


गांधींच्या अंत्योदयाची कल्पना प्रत्येक सरकारच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असते. लोकशाहीचा अर्थ सांगताना सर्वात निम्न व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत व्यक्तीला विकासाची सामान संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था असे गांधीजी म्हणायचे. स्वराज्याबाबत बोलताना ते म्हणायचे की स्वराज्य हे स्व-नियंत्रणाचे, स्वशासनाचे माध्यम आहे. त्या आधारे सत्तेचे विकेंद्रीकरणाचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी ग्रामराज्याची संकल्पना मांडत स्वयंपूर्ण गावाची कल्पना मांडली. ते करत असताना राज्याच्या अत्यंत माफक हस्तक्षेपाचे समर्थन त्यांनी केलं. पण आताच्या घडीला सत्तेच्या केंद्रिकरणाचा प्रकार वाढतोय. त्यामुळे अनेक समस्या उभरताना दिसत आहेत.


गांधींनी लहान-सहान गोष्टींना दीर्घकालीन उद्देशाला जोडण्याचा प्रयत्न केला. मिठाचा सत्याग्रह त्याचाच भाग. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा गांधीजी खुबीने वापर करायचे आणि त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या लढ्यात सामील व्हायचा.


गांधी हे रसायन काय होतं?


अनेकजण त्यांना राजकारणातील संत आणि संतातला राजकारणी म्हणायचे. त्यांनी राजकारणाला अध्यात्माच्या मदतीने पवित्र करण्याचा प्रयत्न केला, अध्यात्माला राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. ते असंख्य लोकांचे लक्षपूर्वक ऐकायचे, आणि त्यांच्या एका हाकेला असंख्य लोक प्रतिसाद द्यायचे. सामान्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, गांधीजी सामान्य पद्धतीचा वापर करुन सोडवतात. ते सत्याचा आग्रह धरतात आणि त्या सत्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. सामान्यांना ते प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लावतात. गांधींच्या प्रत्येक गोष्टी आजच्या काळात जसंच्या तसं लागू होतीलच असं नाही. पण त्याचा आधार घेऊन नव्या गोष्टी शोधाव्या लागतील.


गांधींवाद कालबाह्य झालाय असं सांगत त्याची टिंगलटवाळी केली जातेय. पण टीका करणारेच त्यांच्या रोजच्या आयुष्यात गांधींवाद आचरणात आणताना दिसतात. गांधी आणि गांधींवादाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीला टीका करणारे लोक नंतर गांधींवर प्रेम करु लागतात. गांधी वाचता वाचता तो मनात आणि डोक्यात कधी गेला हे लक्षात येत नाही. अंतर्मनाच्या शुद्धतेवर भर देण्याऱ्या या गांधींवादाच्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या रुपात समोर येतात.


मजबुती का नाम गांधी


अनेकवेळा असं म्हटलं जातं की 'मजबूरी का नाम गांधी' आहे... पण गांधी ज्याला समजला त्यालाच समजते की 'मजबूती का नाम गांधी' असं आहे. त्यांची अहिंसा ही दुर्बलाची अहिंसा नव्हती तर शूरांची अहिंसा होती. गांधीजी नेहमी म्हणायचे की माझ्या दोन वक्तव्यात विरोधाभास असेल तर माझे नंतरचे वक्त्यव्य योग्य माना. कारण मनुष्याचे वक्त्यव्य बदलू शकते, मत बदलू शकते. यातून गांधीवाद हा लवचिक असल्याचंही दिसतं.


समाज काही असाच बदलत नाही. प्रत्येकाला वाटत की समाजाने बदलावं. पण गांधी म्हणतात की, "जगामध्ये जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे, तो बदल सर्वप्रथम तुम्ही स्वतः मध्ये घडवा, मग जग आपोआप बदलेल." त्यांनी सांगितलेली सात पाप ही मानवतेला नवी दिशा देणारी आहेत. त्यामध्ये तत्वाविना राजकारण आणि चरित्र्याविना ज्ञान या गोष्टी राजकारणाला आजही तंतोतंत लागू होतात.


आज विचाराने भरकटलेल्या या जगात कट्टरतावाद वाढत आहे. सामान्यांना त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा लागतोय. आपल्या देशातही वेगळी अशी काही परिस्थिती नाही. आज शेतकऱ्यांना आपल्या मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. अशावेळी राज्यकर्त्यांनी नुसता गांधींचे नाव न घेता किंवा परकीय पाहुण्यांच्या नुसता भेटीपुरता गांधींचा वापर न करता, त्यांच्या विचारातील काही गोष्टींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक समस्यांची सोडवणं सहज शक्य होईल.


गांधी हा एक व्यक्ती नाही तर तो विचार आहे आणि त्या विचाराला मारणे तर दूरच....उलट निराशा, कट्टरता, हिंसा, भेदभाव, विषमता, हुकुमशाही या गोष्टी जसजश्या वाढत जातील तसससे या देशाला आणि जगाला गांधीवादाची गरज भासेल, गांधीवाद समर्पक होत जाईल. आईनस्टाईनच्या मते या भूतलावर हाडामासाचा असा एक माणूस होऊन गेला यावर भविष्यातील पिढी विश्वास ठेवणार नाही. पण सध्याची जगाची वाटचाल लक्षात घेता, जगात शांतता नांदायची असेल तर भविष्यातील पिढी गांधीवादाचं अनुकरण करण्याची जास्त शक्यता आहे.