डिसेंबरची अखेर आणि जानेवारीची सुरुवात हा काळ टुरिंगसाठी खरं तर नेहमीच पर्वणी ठरत असतो. मीही यावेळी कुठे जायचं याबद्दल काही दिवस आधीपासूनच शोधमोहीम सुरु केली होती. काहींशी बोलल्यानंतर, खास करुन ऑफिसमधला सहकारी अमोलने राजस्थान ट्रीप करुन आल्यावर त्याचं भरभरून वर्णन केल्यानंतर राजस्थानवर मोहोर उमटवली आणि आमची फॅमिली टूर निघाली राजस्थानच्या स्वारीवर. दोन दिवस जयपूर, एक दिवस जोधपूर आणि दोन उदयपूर. असं नियोजन झालं. टुरिंग कंपनीने तसं प्लॅनही करुन दिलं.


जयपूरला सकाळी साडेसातच्या सुमारास विमान लँड होता होताच, थंडीचा ट्रेलर अनुभवला. मुंबईत राहत असल्याने थंडीबद्दल अनुभवण्यापेक्षा ऐकायचा आणि वाचण्याचाच योग जास्त येतो. राजस्थानात गेल्यानंतर प्रत्यक्ष थंडीचा अनुभव घेता आला. एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या झोंबरं वारं जागा मिळेल तिकडून अंगात घुसू पाहत होतं. आम्हीही पूर्ण तयारीने गेलो होतो. त्यामुळे स्वेटर, कानटोपी, हातमोजे या सुरक्षारक्षकांनी वाऱ्याला संचारबंदी करत रोखलं होतं. खास करुन मुलगी लहान असल्याने तिला तर स्वेटर, कानटोपी, थर्मल वेअरची झेड सिक्युरिटी दिली होती. त्यामुळे थंडी असली तरी त्रासदायक नाही भासली. जयपूर एअरपोर्टपासून पुढचे पाच दिवस राजस्थानी थाट अनुभवत होतो.


लँड झाल्यानंतर हॉटेलला पोहोचतानाच चहाची तल्लफ आली आणि ड्रायव्हरने आमची ही फर्माईश पूर्ण केली. खास तंदूरी चहा. मातीच्या ग्लासमधून. एक चहा आणि एक गरम दूधची ऑर्डर दिली. ड्रायव्हरने सांगितलं, इथे दूध हे प्रमुख उत्पादनांपैकी एक. तिथल्या चहावाल्याकडे त्याची चुणूकही पाहायला मिळाली. फेसाळलेलं अन् वाफाळलेलं दाट दूध तोंडावाटे पोटात गेलं आणि थंडीशी सामना करायला आणखी एक साथीदार मिळाला. त्याचसोबत मातीच्या ग्लासमधून चहाची चवही निराळी भासली. याचा आस्वाद घेतल्यावर हॉटेलमध्ये पोहोचलो, फ्रेश झालो आणि भटकंतीसाठी बाहेर पडलो.



जयपूरमध्ये वाफाळलेला चहा आणि गरमागरम दूध

जयपूरचं बिर्ला मंदिर, बापू बाजार, हवा महल, जलमहल, सिटी पॅलेस म्युझियम ही ठिकाणं पाहत फिरत होतो. बिर्ला मंदिराची वास्तू, तिथल्या पांढऱ्या रंगातलं आल्हाददायक, मन शांत करणारं सौंदर्य भावलं, तसाच बापू बाजारचा गजबजाटही. ख्रिसमसची धूम असल्याने बापू बाजारला रोषणाईची झालर होती. 'हवा महल'चा गुलाबी रंग पाहून 'पिंक सिटी' अशी याची ओळख का निर्माण झाली, याचं पुरेपूर उत्तर मिळतं. पुढे जलमहलही पाहिला. तो मानसागराच्या विशाल पसरलेल्या जलसंचयात छान विसावलेला. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की, इथे प्रत्यक्ष जाता येत नाही, तुम्हाला काठावरुनच याचं दर्शन घ्यावं लागतं, तसंच आम्हीही घेतलं. या जलमहलच्या काठाशी पुन्हा एकदा झोंबऱ्या थंडीशी गाठ पडली. एका टोपलीत ताटाएवढ्या आकाराचे तांदळाचे तळलेले पापड एक जण विकत होता. त्यावर त्याने मसाला शिंपडला आणि आम्हाला दिला. त्या थंडगार हवेत मसालेदार पापडाची चव छान वाटली.



जलमहलच्या साक्षीने तांदळाच्या पापडाचा आस्वाद

या जयपूरमध्ये एका ढाब्यावर जेवणाचा आनंद घेतला. जिथे काजू-करी, लच्छा पराठा हे तिकडचे टिपिकल पदार्थ होतेच, शिवाय लस्सीचाही आस्वाद घेतला. मातीचा भलामोठा ग्लास, त्यात पांढऱ्य़ाशुभ्र लस्सीवर काजू, बदामाची पेरणी झालेली. ग्लास बघूनच ढेकर यायला लागली. त्या लस्सीची चव अजूनही रेंगाळतेय. राजस्थान दौऱ्यातील सर्वात आवडत्या ठिकाणापैकी एक मला वाटलं ते अल्बर्ट म्युझियम. मुघल आणि ब्रिटिशकालीन चित्रांपासून अनेक वस्तुंचा विपुल संग्रह इथे आहे. ढालीसारख्या मोठ्या धातूच्या तबकडीवर काढलेली रामायण, महाभारताची सचित्र झलक इथल्या प्रमुख आकर्षणापैकी एक. जुन्या काळातील तलवारी, बंदुका, बांगडीच्या आकाराच्या इअर रिंग्ज, कोरीव हस्तीदंती फण्या डोळे विस्फारुन गेले हे विपुल वैभव पाहून. रात्रीच्या जेवणाची वेळ जवळ आली होती तरी चहाचा घोट चालेल असं मनात आलं आणि ड्रायव्हरने माहिती दिली. इथल्या फूड कोर्टमध्ये एक तंदूर चहावाला आहे. त्याचा चहा घ्या. त्या पार्कमध्ये पोहोचलो तर चौफेर खाण्यापिण्याचे स्टॉल्स होते, त्यात गुलाबजी चायवालेचा स्टॉल गाठला आणि मातीच्या ग्लासमध्ये पुन्हा एकदा मसाला तंदूर आणि साधा तंदूर असे दोन चहा रिचवले आणि हॉटेल गाठलं. जयपूरच्या हॉटेलमध्ये राजस्थानी कलाकारांचं नृत्य, कठपुतली यांचंही दर्शन आम्हाला घडलं.


जयपूरला बायबाय करत जोधपूरला गेलो, या राजस्थान दौऱ्यातलं दुसरं आवडतं ठिकाण मेहरानगड. डोळ्यामध्ये न साठवता येणारी अशी ही वास्तु. 1460 च्या आसपास बांधला गेलेला हा अवाढव्य वाटणारा तरीही राकट सौंदर्याची साक्ष देणारा हा गड. या भव्यदिव्य गडातही आणखी एक वस्तुसंग्रहालय. निरनिराळ्या पालख्या, पेंटिंग्ज, शस्त्रं... बरंच काही. हा गड पाहायला जाणाऱ्याच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. पुढे 'जसवंत थाडा' हे स्मारक पाहून जोधपूरचा निरोप घेतला आणि आम्ही उदयपूरकडे कूच केली. हॉटेलला पोहोचायला रात्रीचे साधारण नऊ वाजून गेले होते. गाडीचं दार उघडता क्षणी धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाणी ज्या फोर्सने बाहेर पडतं, तशा फोर्सने वारा आत घुसत होता. तापमान चेक केलं तर आकडा होता सात. बोलताना तोंडातून वाफा येत होत्या. उदयपूरला सिटी पॅलेस म्युझियम, जगदीश मंदिर आणि 'सहेलियों की बाडी' पाहिली. 1710 ते 1734 काळात राजघराण्यातील स्त्रियांसाठी रंजन, विहार करण्यासाठी या 'सहेलियों की बाडी'ची अर्थात उद्यानाची निर्मिती महाराणा संग्राम सिंग (द्वितीय) यांनी केली. उद्यानाच्या एन्ट्रीलाच फुलांपासून साकारलेलं फुलपाखरु मन मोहून घेतं. आतमध्ये फुलं, झाडं यांची मुक्त उधळण तर आहेच शिवाय असंख्य कारंजांचं दर्शनही होतं.



सहेलियो की बाडीच्या प्रवेशद्वारावरचं फुलपाखरु

उदयपूरला शिल्पग्राम प्रदर्शन आणि विक्रीलाही भेट दिली. हे इकडचं वार्षिक प्रदर्शन असल्याची माहिती मिळाली. निरनिराळ्या राज्याचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांसकट. तिथे 'राब' नावाचं पेय पाहायला मिळालं. शेगडीवर मातीच्या मडक्यात ठेवलेलं फोडणीचं ताक, असंही आपण त्याला म्हणू शकतो.


या राजस्थानी राजेशाही थाटाचा अनुभव पाच दिवस घेताना दोन पाट्यांनी पुणेरी पाट्यांची आठवण करुन दिली, यातली एक 'कृपा करके यहाँ फालतू मे न बैठे..' अर्थातच आपल्या आणि दुसऱ्याच्या वेळेचंही मोल अधोरेखित करणारी. तर दुसरी पाटी तद्दन व्यावसायिकता जपणारी, 'कस्टमर इज किंग अँड किंग नेव्हर बार्गेन'. राजस्थानला बाहेरच्या राज्यातील मंडळी मनसोक्त खरेदी करतात, त्या सर्वांनाच मोठेपणा देताना त्यांचा खिसा हलका आणि आपला जड होईल, यासाठी डोकेबाज शैलीत तयार केलेली ही पाटी किंवा सूचना. या पाच-सहा दिवसांमध्ये एका वेगळ्या संस्कृतीशी जोडले गेलो. पुन्हा भेट देण्याचा मनोमन निर्धार करुनच राजस्थानचा निरोप घेतला. विमानाने मुंबईच्या दिशेने टेकऑफ घेतला, पण मन राजस्थानी संस्कृतीभोवतीच फेर धरुन होतं.



पुणेरी पाट्यांची आठवण करुन देणाऱ्या पाट्या