Blaga’s Lessons (2023) : जामतारा (2020) नावाची दोन सीझनमधली बेवसीरीज भारतात गाजलीय. नेटफ्लिक्सवरची जामतारा बेस्टड ऑन ट्रू इव्हेन्ट आहे. प्रत्यक्षात कमी अधिक प्रमाणात असंच घडलंय, असं ठासून सांगण्यात आलंय. अश्याच घटना घडल्याही होत्या. स्मार्ट फोनच्या जगात चोर ही स्मार्ट झालेत. त्यांचं माफिया सिंडिकेट त्यापेक्षाही स्मार्ट झालं. हे फक्त भारतात घडतंय असं नाही. जगभरात अश्याप्रकारे लुट करणाऱ्यांची संख्या वाढलेय. त्यांचे विकटीम अर्थात फसवले गेलेले बिच्चारे आयुष्यभराची कमाई गमवून बसतात. ब्लागास लेसन (2023)  (Blaga’s Lessons) या सिनेमात अशीच एक घटना घडते. ब्लागा या रिटायर टिचरला ज्या-गोष्टींचा सामना करावा लागतो त्यावर ही फिल्म आहे. 


ही फक्त ब्लागाची गोष्ट नक्कीच नाही. जगभरात फोन कॉल फ्रॉडला बळी पडलेले लाखो लोक आहेत. त्यांच्याशी कमी अधिक प्रमाणात असंच घडत असावं. आपण फसवले गेलोत याचं फ्रस्ट्रेशन येतं, आपण किती मुर्ख आहोत हे सतत टोचत राहतं, मग जग काय म्हणेल याची शरम वाटते. यातून घडलेल्या प्रकारातून बाहेर पडण्याची धडपड सुरू होते. या सिनेमाची हिरॉईन ब्लागा रिटायर शिक्षिका आहे. एक टीचर या फ्रॉडला बळी पडली ही गोष्ट तिला सतावतेय. आजूबाजूचे आपली मस्करी करतील या विचारानं ती फ्रस्ट्रेट झालेय. मग यातून एक मोरल कॉन्फ्लिक्ट, नैतिक संघर्ष तयार होतो. या संघर्षाचा सामना ब्लागा कशी करते यावर पुढची फिल्म आहे. 


क्षेत्रफळाचा विचार केल्यास बल्गेरिया युरोपातला 15 व्या क्रमांकाचा देश आहे. ग्रीस पाठोपाठ बल्गेरियाचा नंबर लागतो. जीवनावश्यक वस्तूंच्या एक्सपोर्टसाठी बल्गेरिया प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की, बल्गेरिया हा आशावादी लोकांचा देश आहे. पण आशावादी लोकांचेच अनेक प्रॉब्लेम असतात. या व्याधी मानसिक, सामाजिक, आर्थिक आहेत. देशातलं म्हाताऱ्यांचं प्रमाण वाढलंय, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. तरुणांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्याचं जगच बदललंय.  न्यूक्लियर फॅमिलीच्या नादात पारंपारिक कुटुंब व्यवस्था बिघडलेय. आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. भ्रष्टाचार बोकाळलाय. आता राहिली गुन्हेगारी. संघटीत माफिया जास्त एक्टिव्ह आहे. इथं जगणं तर कठीण आहेच. पण मरण पण सोप नाही. 


नुकत्याच वारलेल्या नवऱ्याचं थडगं बाधण्यासाठी ब्लागा जमीन शोधतेय. नवऱ्यावर तिचं खूप प्रेम होतं. त्याच्या बाजूलाच आपलंही थडगं असावं असं तिला वाटतंय. या प्रसंगातून सिनेमाची सुरुवात होते. थडगं हे मेटाफोर आहे. थडग्यात आत्मा नसलेलं थंड शरीर असतं. भाव-भावनांचा काहीही संबंध उरत नाही. फेक फोन फ्रॉडमध्ये ब्लागा आयुष्यभराची कमाई गमावते. फ्रस्ट्रेशन, राग, अगतिकता, इनसिक्योरीटी असा प्रवास करुन ब्लागाच्या भावना हळूहळू मरतात. तिची थडग्याकडे जाण्याची प्रक्रिया वेगात होते. ती एक शिक्षका आहे. या पेशाची काही नितीमुल्य असतात. आता या एका प्रसंगातून ती कशी बदलतात. आणि भावनांच्या पलिकडे जाऊन माणूस किती क्रूर आणि आत्मकेंद्री होतो हे दिग्दर्शक स्टिफन कोमांदरेव्हने दाखवून दिलंय.


वर-वर सर्वकाही ठिकठाक आहे असं वाटणारा बल्गेरियातला समाज कसा अस्वस्थ आहे. यासंदर्भात स्टिफन कोमांदरेव्हनं तीन सिनेमे बनवलेत. बाल्गास लेसन (2023) हा या मालिकेतला तिसरा सिनेमा आहे. यापूर्वीच्या डायरेक्शन (2017) आणि राऊंड्स (2019) या दोन्ही सिनेमांमध्ये देशातली बिघडलेली सामाजिक परिस्थितीच केंद्रस्थानी आहे. बल्गेरिया आणि जर्मनी या देशांनी मिळून या ट्रिलॉजीची निर्मिती केलीय. 


डायरेक्शन (2017) सिनेमाचे हिरो कॅब ड्रायव्हर्स आहेत. इथं ड्रायव्हिंग हे मेटाफोर आहे. यासंदर्भात व्हेरायटी या मॅगझीनमध्ये उत्तम परिक्षण आहे. या परिक्षणात प्रसिध्द तत्ववेत्ता एलन के बॉटनच्या सिध्दांताचा उल्लेख आहे. आशावादी माणसांमुळंच रोड रेज जास्त होतात. निराशावादी माणूस हा ट्राफिक मिळणार, आपल्या पुढच्या ड्रायव्हरला अक्कल नाही, त्याला गाडी चालवता येत नाही असाच विचार करत असतो. आहे त्या परिस्थितीला मुकाट सामोरं जातो. ट्राफिकमध्ये आशावादी माणसाचा दम घुटतो. तो फ्रस्ट्रेट होतो. यातून मग राग आणि त्यातून रस्त्यावर उतरून भांडणं हे एका सेट मानसिकतेतून तयार होते. डायरेक्शन सिनेमात बल्गेरियाची राजधानी सोफिया शहरातल्या वेगवेगळ्या ड्रायव्हर्संच्या गोष्टी आहेत. त्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना बांधणारा एक समान दुवा आहे. त्यांचं बल्गेरियन असणं. या देशातल्या फ्रस्ट्रेशन आणि आशावादाचा भाग असणं. 


स्टिफन कोमांदरेव्हच्या राऊंड (2019) सिनेमातले हिरो तीन पोलीस आहेत. ही एका रात्रीतली गोष्ट आहे. हे तिघेही राऊंडअपला निघालेत.  स्टिफन म्हणतो, बल्गेरियन समाज हा किती अस्वस्थ आहे, त्रस्त आहे याच्यासाठी राऊंडअप हे मोटाफोर वापरलं गेलंय. इथं पोलीसिंग कुणालाच नकोय. या पोलिसांचा पगार कमीय, मग यातून जे सर्वत्र होतं तेच सोफियातल्या पोलीसांचं ही आहे. चिरीमिरी घेणं आलं. भ्रष्टाचार आला. बर्लिनची भिंती पडल्यानंतर बल्गेरियात याचे पडसाद उमडले. याचा संदर्भ सिनेमात आहे. त्यातून घडणारं कथानक जबराट आहे.


आधी ड्रायव्हर्स, मग पोलीस आणि आता बाल्गा ही शिक्षिका असा बल्गेरियन समाजातल्या मध्यमवर्गाचा पर्दाफाश स्टिफन कोमांदरेव्हच्या करतो. अभी तो सुधर जाओ असं ठणकावून सांगतो. चित्रपट भाषेचा सर्वोत्तम वापर करत बल्गेरियाच्या आत नक्की काय काय घडतंय हा दाखवण्याचा स्टिफन कोमांदरेव्हचा प्रयत्न एकदम भारी आहे.