मुंबईसारख्या शहरात एखादं मोठं रेस्टॉरन्ट काढायचं तर मोठं भांडवल, मोठी जागा सगळ्याचीच गरज पडते..पण होतकरु आणि प्रयोगशील शेफ्सची एक नवी पिढी आता तयार होतेय, यांना कुठेतरी पंचतारांकित किंवा तत्सम हॉटेलात नोकरी करुन त्या हॉटेलचा ठराविक मेन्यू शिजवण्यापेक्षा स्वत:चे प्रयोग करुन खवय्यांना नवनवीन चवींचं सुख द्यायची त्यांची इच्छा असते. मग हे नवे शेफ छोटे केक शॉप प्लस रेस्टॉरन्ट किंवा कॅफे विथ फुड अशा प्रकारच्या रेस्टॉरन्टच्या माध्यमातून आपली पाककला लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.


आजकाल तर अशा कॅफे किंवा चिमुकल्या रेस्टॉरन्टसची प्रचंड क्रेझ निर्माण झालीय... एखाद्या दुकानाच्या गाळ्यातच ही छोटी रेस्टॉरन्टस उघडली जातात, पण जागा कमी असली तरी त्या तुटपुंज्या जागेचा कलात्मक वापर ही या मॉडर्न छोट्या रेस्टॉरन्टसची एक खासियत... पूर्वीच्या काळी उपहारगृह असायची त्यांचाच हा मॉडर्न अवतार म्हणू शकतो आपण, कारण, जर मेन्यू बघितला तर पोटभर जेवणापेक्षा स्नॅक्स या सदरात मोडणारेच पदार्थ यांच्याकडे जास्त संख्येनं असतात.

तसंच कॅफे असो किंवा केक आणि रेस्टॉरन्टचं कॉम्बिनेशन, चहा, कॉफी, मिल्कशेक्स आणि ज्यूस यांचे भन्नाट प्रकार यांच्याकडे मिळणार म्हणजे मिळणारच कारण यंग खवय्यांना आजकाल थिक मिल्कशेक प्रचंड आवडतात..



स्नॅक्स या सदरात मोडणारे पदार्थही अगदी मॉडर्न म्हणजे तुम्ही समोसा वडापावची अपेक्षा करणार असाल तर तसलं काहीही अशा मॉडर्न छोटुकल्या रेस्टॉरन्टसमध्ये मिळणार नाही..याउलट नॅचोज, बर्गर, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राईज अशा मॉडर्न डिशेस इथे मिळतात..अशा या मॉडर्न छोट्या रेस्टॉरन्टसपैकी मुलुंड पश्चिमेला देविदयाल रोडवर अगदी एक गाळ्यात असलेलं एक केक शॉप आणि रेस्टॉरन्ट हे सध्या मुलुंडमधलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण ठरतंय... केक्स एन केमिस्ट्री नावाचं हे चिमुकलं.. केक शॉप म्हणजे मुलुंडमधल्या तरुणाईचं फेवरेट डेस्टीनेशन ठरतंय..

एका दुकानाचा छोटासा गाळा, त्याचेच दोन भाग केलेले, खाली केक शॉप आणि वरती रेस्टॉरन्ट…छोट्या जिन्याने वर गेल्यावर केवळ पाच सहाच टेबल दिसतात, पण ते सगळे अगदी कोझी किंवा प्रचंड आरामदायक, एक तर दिवाणच आहे बसायला ठेवलेला मस्त गादी, उशांसकट आणि त्या दिवाणावर छोटासा टेबल आपण मागवलेल्या डिशेससाठी..पोटमाळा वाटावं अशा वरच्या सिटींग एरियात गेल्यावर सर्वाधिक लक्ष वेधून घेते ती एवढ्याशा जागेची अतिशय कलात्मक आणि मॉडर्न पद्धतीने केलेली सजावट..



सजावट बघून चटकन लक्षात येतं की या केक शॉप कम रेस्टॉरन्टला अपेक्षित खवय्ये आहेत ते कॉलेजवयीन तरुण तरुणी किंवा यंग प्रोफेशनल्स...त्यांना एकदम हॅपनिंग जागा वाटावी अशा पद्धतीनं सगळी सजावट..अगदी गुबगुबीत आरामशीर खुर्च्यांच्याही आधी दिसते बास्केट बॉलची अडकवलेली छोटीशी बास्केट, त्याच्या खाली विराटचा क्रिकेटचा टी शर्ट...नेम धरुन मारण्यासाठी डार्टचा गोल, एक लहानसं गिटार..सुंदरसं पेन्टींग..



विविध आकाराचे दिवे, रंगिबेरंगी बाटल्या अशी सगळी सजावट अगदी छोटयाशा जागेत.. त्याही पेक्षा आश्चर्यात टाकणाऱ्या बैठ्या खेळांचे आणि गेम्सचे डबे वेगवेगळ्या शेल्फसवर ठेवलेले दिसतात.. उनो, सापशिडी, बिल्डींग ब्लॉक्स असे डोक्याला खाद्य पुरवणारे ते खेळ सजावटीचा भाग तर नाही ना असं वाटून जातं.. पण मग लक्षात येतं की गप्पा मारता मारता हातांना चाळा म्हणून किंवा मागवलेली डिश येईपर्यंत टाईमपास म्हणून खेळण्यासाठी हे अनेक प्रकारच्या खेळांचे डबे ठेवलेले आहेत.. हवा तो खेळ शेल्फवरुन उचलायचा आणि थेट खेळायला सुरुवात करायची, म्हणजे मित्रमैत्रिणींच्या गराड्यात निवांत वेळ घालवण्यासाठी पूर्ण वातावरण निर्मिती तयार...त्यापुढे जाऊन महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या डेकोरेशन आणि युथफुल थिमला साजेसा जबरदस्त मेन्यू..



पोटभर जेवायला किंवा सब्जी रोटी वगैरेसारखे पदार्थ खायला मात्र इथे यायचं नाही...यांचा खाद्यपदार्थांचा मेन्यू सुरुच होतो तो सॅलड बाऊल्सपासून.. विविध प्रकारचे सॅलड्सचे पर्याय आणि त्याबरोबर त्या सॅलडवर हवं ते ड्रेसिंग असा हा पहिला पर्याय..हेल्थचा विचार कऱणाऱ्यांसाठी जसे सॅलड्स आहेत तसंच खास टिनेजर्सच्या आवडीचे फ्रेन्च फ्राईज, पोटॅटो वेजेस आणि नॅचोज असे तरुणाईचे हॉट फेवरेट असलेले पदार्थ कितीतरी प्रकारात मिळतात..म्हणजे फ्रेंच फ्राईज विथ चिज, मसाला फ्राईज किंवा पेरी पेरी सॉसमधले फ्राईज असे निवांत गप्पा मारत खाण्याचे स्टार्टर्सचे पर्याय केक्स एन केमिस्ट्री मध्ये मिळतात..हे चमचमीत चवींचे पदार्थ सर्व्ह करण्याची पद्धतही अगदी अपारंपारिक, एखादी प्लेट किंवा बाऊल अशा कटलरीचा वापर न करता खेळण्यातली ट्रॉली किंवा गाडीच येते फ्रेंच फ्राईज भरुन..



मेन्यूकार्डात एरव्ही रेस्टॉरन्टसमध्ये न दिसणारे पॉपकॉर्नचेही पर्याय दिसतात, हे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्नसुद्धा सिनेमाहॉलमध्ये मिळतात त्याप्रमाणे कागदाच्या कोनमध्ये नाही तर अतिशय कल्पक अशा फ्लॉवरपॉटसारख्या प्लॅटसमध्ये सर्व्ह केले जातात..पॉपकॉर्नने भरलेली डिश म्हणजे पिस ऑफ आर्ट वाटतो..पॉपकॉर्नप्रमाणेच मॅगीचेही अनेक पर्याय इथल्या युथफुल खवय्यांना जबरदस्त आवडतात..



पण इथे सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो गार्लिक ब्रेड पुल अपार्ट नावाचा पदार्थ आणि त्याचे वेगवेगळे प्रकार.. आपण एरव्ही जे गार्लिक ब्रेड खातो ते एका रांगेत ठेऊन त्यांच्यावर आवडीचा सॉस ओतून तयार होणारा हा गार्लिक ब्रेड पुल अपार्ट नावाचा पदार्थ..टॅन्गी इटालियन सॉस, चिज सॉस आणि चिली कॉरियान्डर सॉस असे तीन रंगाचे सॉस एकत्र टाकलेले पुल अपार्ट गार्लिक ब्रेड हा पदार्थ दिसतोही खूप आकर्षक. पुल अपार्ट तर केक्स एन केमिस्ट्रीतला मस्ट इट पदार्थ झालाय... त्याशिवाय विविध प्रकारचे मिनी बर्गर्सपण तितकेच हिट आहेत.. बर्गर शॉट्स मागवले की छोटे छोटे तीन बर्गर समोर येतात..रेस्टॉरन्टच्या नावाप्रमाणे मित्रांची केमिस्ट्री मजबूत करण्यात हे बर्गरही उपयोगी पडतात..



असाच एक गमतीदार पदार्थ म्हणजे बन भाजी, आपल्या नेहमीच्या पावभाजीच्या जागी हा बन भाजी नावाचा पदार्थ.. पावाच्या जागी मोठे बन दिले जातात म्हणून बन भाजीचा हा वेगळा पर्याय पोटभर खाण्यासाठी बरेच जण स्वीकारतात..अर्थात इतके वेगवेगळे स्नॅक्स खाल्ल्यांनतही भूक आणि वेळ दोन्हीही असेल तर वेगवेगळ्या करी आणि राईचे पर्याय आहेतच आणि ते सर्व्हही अगदी मजेदार पद्धतीने होतात..भाताची विहीर करुन त्यात करी असा हा पदार्थ..



या सगळ्याबरोबर मात्र एकदम हॉ फेवरेट ठरतात ते इथले शेक्स..किटकॅट शेक, ओरियो शेक असे अनेक मिल्कशेक्स डेझर्ट म्हणून हमखास निवडले जातात.. काचेच्या बाटलीत ते इतके भरलेले असतात की कठोकाठ हा शब्दही कमी पडावा..चॉकलेट आणि गोड आवडणाऱ्यांना तर यापेक्षा परफेक्ट ट्रिट असूच शकत नाही..



बरं हे वर्णन झालं रेस्टॉरन्टचं त्याशिवाय खालच्या मजल्यावरच्या केक शॉपमध्येही विविध रंगाच्या पेस्ट्रीज, कप केक्स, आणि मोठे केक यांची रेलचेल असल्याने मेन्यूकार्डातल्या डेझर्टशिवाय केक्सही मागवता येतात, त्यामुळे टिनेजर्स आणि यंग क्राऊडला आवडतील अशा सगळ्या गोष्टींची एकत्र केमिस्ट्री जुळून आल्याने अल्पावधीतच ही केमिस्ट्री तरुणाईची फेवरेट हॅंगींग प्लेस ठरतेय..

संबंधित ब्लॉग :

जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना

जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट

जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच

जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट

जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर


जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट