‘माइम’ म्हणजे संवादाचा किंवा भाषेचा वापर न करता केवळ हावभाव आणि शारीरिक हालचालींच्या माध्यमातून केलेला अभिनय, त्याचा खाण्यापिण्याशी काही संबंध मला तरी ठाऊक नव्हता. म्हणूनच मुंबईतल्या एका रेस्टॉरन्टचं नाव मिर्ची अँड माइम आहे असं कळल्यावर इथे नक्की काय वेगळं असेल अशी उत्सुकता होती मनात. पण पवई भागातलं हे रेस्टॉरन्टही चांगलंच लोकप्रिय असल्यानं ‘आलं मनात आणि गेलो थेट’ असं मिर्ची अँड माइमच्या बाबतीतही शक्य नाही, तेव्हा रितसर बूकिंग करुन थेट दाखल झालो मिर्ची आणि माइम या रेस्टॉरन्टमध्ये.

रेस्टॉरन्टच्या बाहेरच बुकिंगनुसार आत जाण्यास मदत करणारी महिला आतमधल्या सहकाऱ्यांना फोनवरुन किंवा आवाज देऊन माहिती देण्याऐवजी हातवारे करत होती, तेव्हा वाटलं की ही अशा पद्धतीने सूचना का देतेय..आम्ही आत शिरलो आणि आतील सजावटीने चांगलेच खूष झालो...सगळीकडे जुन्या पद्धतीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचं डेकोरेशन केलेलं फार सुंदर दिसतं. बसण्याची सोयही चांगली ऐसपैस.. हे सगळं न्याहाळत असताना रेस्टॉरन्टचा मॅनेजर येतो आणि विचारतो “इथे पहिल्यांदाच आलात की यापूर्वीही येऊन गेलात?”, पहिल्यांदाच आलोय असं सांगितल्यावर तो सांगतो की मिर्ची आणि माइम अशा नावाचा अर्थ काय आहे.



मिर्ची म्हणजे भारतीय मसाले,केवळ भारतीय चवीचे पदार्थ हीच त्यांची खासियत असल्यानं नावात मिर्ची आणि माइम का?, तर तिथे पदार्थ सर्व्ह करणारे १०० टक्के कर्मचारी हे मूकबधीर आहेत. हे ऐकल्याबरोबर बाहेरच्या मुलीच्या हातवाऱ्यांचा अर्थ कळला, पण सरप्राईज इथेच थांबत नव्हतं..त्या मॅनेजरने आम्हाला आमच्या सर्व्हरशी संवाद साधण्यासाठी आवश्यक हातवाऱ्यांची भाषा शिकवली, म्हणजे एक्स्क्युज मी, धन्यवाद यासाठी काय करायचं... मग आम्हाला आमचा त्या संध्याकाळसाठीचा वेटर किंवा सर्व्हर कोण असणार त्याची ओळख करुन दिली.. अगदी हसतमुखाने तो आमच्यासमोर आला.. खुणेनंच पाणी विचारलं..पुढे जाऊन आम्हाला हे देखील सांगितलं गेलं की तिथल्या प्रत्येकाच्या युनिफॉर्मवर त्या त्या व्यक्तीचं नाव असलं तरी त्यांना प्रत्येकांला खुणांच्या भाषेतही एक वेगळं नाव  आहे आणि कामादरम्यान या खुणेच्या भाषेतल्या नावानेच ते एकमेकांशी संवाद साधतात.

या वेगळ्या प्रकाराने भारावून आम्ही तिथल्या सगळ्या हालचालींचं निरीक्षण करत असतानाच आमच्या समोर मेन्यू कार्ड आलं. आम्ही पाहिलेल्या जगातलं सगळ्यात युनिक मेन्यूकार्ड होतं ते... त्या मेन्यूकार्डावर सुप्स, सॅलड्स, स्टार्टर्स, असे वेगवेगळे कॉलम केलेले आणि त्या कॉलममधले पदार्थ मागवण्यासाठी हातांची कशी मुद्रा करायची त्याचं चित्र, तसंच खाली प्रत्येक पदार्थ आणि ते पदार्थ मागवताना वेटरला त्याचा सिरीयल नंबर कास सांगायचा याचंही चित्र.

म्हणजे मेन्यू कार्डमधल्या सूप्सच्या सेक्शनमधील तिसऱ्या क्रमांकाचा पदार्थ मागवायचा असेल तर आधी सुपसाठीची हाताची मुद्रा करायची, त्यानंतर तीन हा आकडा बोटांनी दाखवायचा, आपल्याला काय मागवायचंय ते त्या वेटरला बरोब्बर कळतं. तरीही खात्री करुन घ्यायला तो पुन्हा त्या पदार्थावर बोट ठेऊन हाच पदार्थ हवाय ना हे विचारुनही घेतो.



आपण मागवलेली ऑर्डर घेऊन जेव्हा हे वेटर येतात तेव्हा साधारणपणे रेस्टॉरन्टमध्ये वेटर आपल्याला विचारुन खात्री करुन घेतात की तुम्ही हाच पदार्थ मागवलेला होता ना, किंवा टेबलवर तो पदार्थ ठेवताना त्याचं नाव सांगतात.. आता मिर्ची आणि माइममध्ये हे शक्य नसल्याने पदार्थ घेऊन येताना त्या सोबत एक नेमप्लेटसारखी छोटीशी पदार्थाच्या नावाची पाटी सोबत आणली जाते.

आधी ती पाटी टेबलवर ठेऊन त्या समोर तो पदार्थ ठेवला जातो. म्हणजे कन्फ्युजनला जागा उरत नाही...गंमत म्हणजे हातांच्या आणि हावभावांच्या भाषेतच संवाद सुरु असला तर कुठेही गोंधळ उडालेला दिसत नाही, बरं आरडाओरडा तर नाहीच नाही...तरीही मिर्ची आणि माइममधले सगळे सहकारी हसत खेळत , एकमेकांशी हास्यविनोद करत मजेत त्यांचं काम करत असतात.  कुठेही न्यूनगंडाची भावना नसते किंवा बोलता येणाऱ्यांमध्येही आपण काही मदत करतोय अशी भावना नसते. सगळं काही अगदी सामान्यपणे चाललेलं असतं, अधूनमधून हे सगळे कर्मचारी पदार्थ आवडतात आहेत की नाही हे ही खुणेनंच प्रत्येक टेबलवर विचारुन जातात...पाणी संपलं असेल तर हवंय का हे ही विचारतात, त्यामुळे भाषेचा अडसर असा कुठे जाणवतच नाही. म्हणूनच या स्पेशल कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मवर एक संदेश ठळकपणे कोरलेला असतो. I know sign language, what is your special power.



इतका वेगळा प्रयोग रेस्टॉरन्टच्य़ा मॅनेजमेंटने केलाय म्हणून चवी आणि त्यातलं वैविध्य याकडे मात्र थोडंही दुर्लक्ष होत नाही, उलट इथल्या चवींमुळेच विविध भारतीय पदार्थ आणि खासकरुन ग्रील पदार्थ खाण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात...इतर ठिकाणी मेन्यू कार्डमध्ये जसे शेकडो पदार्थ असतात त्याच्या तुलनेत अगदी मोजकेच पदार्थ आहेत मिर्ची आणि माइमच्या मेन्यूकार्डमध्ये.

वेटर्सच्या सोयीसाठीही कदाचित त्यांनी मेन्यूकार्ड सोपं आणि सुटसुटीत ठेवलं असावं. पण जे आहेत ते पदार्थ मात्र अगदी य़ुनिक. मिर्ची आणि माइममधली सूप प्रेझेंट करण्याची पद्धत तर एकदम जबरदस्त आहे...ग्रीन पी सूप टेबलवर आलं ते..सुपच्या बाऊलमध्ये नाही तर एका चौकोनी आकारच्या खोलगट प्लेटमध्ये...पण गंमत म्हणजे ती प्लेट टेबलवर ठेवली तेव्हा त्यात सूप नव्हतंच, होतं काय तर हिरव्या वाटाण्याची पेस्ट, तळलेले ओले वाटाणे आणि क्रुटॉन्स म्हणजे तळलेला ब्रेड, त्यावर एका किटलीत आणलेलं गरमागरम सूप ओतलं जातं आणि मग त्या सगळ्याची एकत्र चव घ्यायची, काश्मिरी चिकन सूपही अशाच निराळ्या पद्धतीने खवय्यांसमोर येतं..



छोट्या छोट्या चहाच्या किटल्या आणि त्यावर दम बिर्याणीला असतं तसं कणकेचं आवरण असलेलं काश्मिरी सूप टेबलवर येतं..मग चमच्याने ते कणकेचं आवरण काढून वाफाळत्या सूपचा आस्वाद घ्यायचा.. स्टार्टर्स आणि त्यातही ग्रील केलेले पदार्थ अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने तुमच्या पुढ्यात येतात...



म्हणजे पनीर सिख कबाब किंवा अन्य कुठल्याही कबाबची सुरळी तुकडे न करता थेट ग्रील स्टीकवरुन काढून तशीच्या तशी प्लेटमध्ये येते. बाकी डिशेशही सादर करण्याची पद्धत एकतर एकदम आंतरराष्ट्रीय किंवा अगदी पारंपरिक...म्हणजे बिर्याणी मागवली तर थेट कणिक थापलेलं दम बिर्याणीचं भांडं तुमच्या पुढ्यात येणार.



साधारणपणे अशा रेस्टॉरेंन्टमध्ये न दिसणारी मराठी कोथिंबिर वडी, नॉनव्हेज पदार्थांमध्ये कोलंबी मसाले भात आणि साईड डिश म्हणून पिठलंही मेन्यूकार्डमध्ये आहे...गोड पदार्थही अगदी देसी..म्हणजे दिसताना समोर येतो चिजकेक पण चव अगदी ओळखीची किंवा लोकांचा आवडता शुगर फ्री सिताफळ पॅनाकोटा हा पदार्थही अगदीच हटके... सिताफळाची चव पण इटालीयन पॅनाकोटा स्टाईलच्या डेझर्टमध्ये..

आजकाल बाहेर आपण केवळ नविन पदार्थ खाण्याची मजा एवढ्यासाठीच जात नाही तर रोजच्या आपल्या प्रचंड धकाधकीच्या आणि टेन्शन्सनी भरलेल्या रुटिनमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणूनही जातो..त्यामुळेच तर वेगवेगळ्या थिम्स, पदार्थांमधले प्रयोग अशा शोधात आजचा खवय्या असतो..मिर्ची आणि माइममध्ये मात्र चवदार खाण्याबरोबरच तिथल्या शांत वातावरणामुळे आपण आपोआप रिलॅक्स होतो.

इथे उडप्याचा हॉटेलातल्यासारखा वेटरचा ओरडण्याचा आवाज नसतो..किंवा चमचे, प्लेट्स यांचा खडखडाट नसतो, तिथल्या वातावरणाचा परिणाम म्हणून की काय पण आईबाबांबरोबर आलेली चिल्लीपिल्ली, किटी पार्टीसाठी आलेली महिला गॅंगही अगदी शांततेत पदार्थांचा आस्वाद घेत असतात.  अर्थात इथे शांतता आहे मात्र निराशा नाही, उलट प्रचंड उत्साह आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुठलाच ताण दिसत नाही तर आनंद दिसतो. ते सगळं बघून खरोखर बरं वाटतं.

एखाद्या शारीरिक कमतरतेमुळे एरव्ही मुख्य प्रवाहातून तुटलेल्यांना अशा पद्धतीने कामाची संधी देणं आणि त्यासाठी ठराविक पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामात इतके नाविन्यपूर्ण बदल कऱणाऱ्या मॅनेजमेंटचंही कौतुक करावं तेवढं थोडंय, बरं ऐकू आणि बोलू न शकणाऱ्यांना कामाची संधी देऊन व्यावसायिक यशाला त्यांना कुठेही मुरड घालावी लागल्याचं दिसत नाही, त्याउलट या रेस्टॉरन्टच्या यशामुळे आता मुंबईच्या विविध भागात अशी स्पेशल रेस्टॉरन्ट्स काढण्याचा मॅनेजमेंटचा मानस असल्याचं कळतंय.

समाजातल्या दुर्बल घटकांसाठी काहीतरी थोडंस करुन त्याचा गाजावाजा कऱण्यापेक्षा एका घटकाला अशा पद्धतीनं मुख्य प्रवाहात आणून उच्चभ्रू लोकांनाही तो बदल स्वीकारायला लावणारी ही मॅनेजमेंट खरंच वेगळी म्हणायला हवी.. जगातल्या कुठल्याच सीटी स्कॅन किंवा एक्सरे किंवा तत्सम मशिनमध्ये शोधूनही न सापडणारा मन नावाचा अवयव जिथं आनंदी होतो, तिथं जावंसं वाटणं स्वाभाविकच आहे... जिथं मनाच्या भाषेने संवाद होतो तिथं बोलीभाषेला महत्त्व उरत नाही अजिबात...अनुभव नाही, तर निव्वळ अनुभूतीच... तिथं भाषेच्या भिंती आडव्या आल्या नाहीत...म्हणूनच जिभेचे चोचले पुरवत असताना मनाचा ठाव घेणारा हा पाहुणचार विलक्षण वाटला...या वेगळ्या प्रयोगाला दाद देण्यासाठी तरी मिर्ची अँड माइम ला एकदा भेट द्यायलाच हवी...

संबंधित ब्लॉग


मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट