अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीचा लेखा-जोखा इतिहासकार कसा मांडतात, हे आत्ताच कदाचित सांगता येणार नाही. पण ओबामांचे टीकाकारही एक गोष्ट मान्य करतील. ओबामा हे अतिशय उत्कृष्ट वक्ता आहेत. त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात, तर त्यात काही ना काही विचार मांडलेला असतो आणि ऐकणाऱ्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने ओबामांनी केलेली काही महत्त्वपूर्ण भाषणं एकदा पुन्हा ऐकण्याची ही योग्य वेळ ठरावी.

1. 'ए न्यू बिगिनिंग' - 4 जून 2009, कैरो



ओबामा सत्तेत आल्यापासून, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि बदलाची नवी आशा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विशेषत: त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात. त्याच सुमारास कैरो विद्यापीठातील आपल्या भाषणाद्वारे ओबामांनी मुस्लीम जगताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मुस्लीमविरोधी प्रतिमा असलेल्या अमेरिकेचा बदलता दृष्टीकोन म्हणजे काही काळ जागतिक शांततेची नवी आशा ठरला होता. दुर्दैवाने ती आशा फार काळ टिकू शकली नाही.

  1. नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण, 10 डिसेंबर 2009


 



कैरो विद्यापीठातील भाषणाद्वारे ओबामांनी मांडलेल्या विचारांमुळेच त्यांची 2009 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावरून वादही निर्माण झाला. पण ओबामांना हा पुरस्कार त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून नाही, तर त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांसाठी देण्यात आला होता. आपल्या भाषणात ओबामांनी त्या जबाबदारीची जाणीव ठेवली. युद्ध आणि शांततेविषयीचे विचारही ओबामांनी त्या भाषणाद्वारे मांडले होते. प्रत्यक्षात मात्र ओबामांना युद्धांतून लवकर माघार घेता आली नाही, किंबहुना अमेरिका वेगळ्या तऱ्हेने नव्या युद्धांमध्ये ओढली गेली.

  1. ओसामाच्या मृत्यूची घोषणा. 1 मे 2011, वॉशिंग्टन डीसी


 



अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकी नेव्ही सील्सच्या टीमने मारल्याची घोषणा ओबामांनी या भाषणाद्वारे केली होती. टीव्हीद्वारा राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण जेमतेम 9-10 मिनिटांचं होतं. तेवढ्या कमी वेळेत, नेमक्या शब्दांत ओबामांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. ना विजयाचा जल्लोष, ना घोषणाबाजी, ना मी हे केलं असा आव.

  1. समलिंगी संबंधांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया. 26 जून 2015


 



ओबामांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला समलिंगी व्यक्तींच्या हक्कांविषयी बोलणं टाळलं होतं. पण पुढे त्यांचे विचार बदलत गेले. ओबामांच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या सर्व राज्यांत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यावर ओबामांनी केलेलं भाषण त्यांच्या मनातल्या आदर्श समाजाचं प्रतिबिंब दाखवतं.

  1. सेल्मा, 7 मार्च 2015


 



अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यादरम्यान सेल्मा इथे झालेल्या रक्तपाताच्या घटनेला गेल्या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी ओबामांनी केलेलं भाषण अमेरिकेत आजही वर्णद्वेश अस्तित्वात आहे या वास्तवाची जाणीव करून देणारं ठरलं.

  1. अमेझिंग ग्रेस - 26 जून 2015, चार्ल्सटन


 



चार्लस्टनमध्ये दंगल भडकवण्याच्या उद्देशाने वर्णद्वेषी हल्लेखोराने चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात स्टेट सीनेटर क्लेमेंटा पिंकनी यांच्यासह 9 कृष्णवर्णीयांचा बळी गेला होता. त्यांना आदरांजली वाहताना ओबामांनी अमेझिंग ग्रेस गाण्यास सुरुवात केली.

  1. सँडी हूक, 5 जून 2016


 



सँडी हूकमधील गोळीबाराच्या घटनेनंतर बोलताना ओबामांना अश्रू आवरले नव्हते. अमेरिकेत गन लायसन्सविषयी नियम कडक करण्याची गरज ओबामांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. अमेरिकेतली गन लॉबी आणि तिचा राजकारण्यांना असलेला पाठिंबा यांमुळे ओबामांना आपल्या कार्यकाळात बंदुकांच्या वापरावर निर्बंध आणता आले नाहीत. या एका गोष्टीचं शल्य त्यांना पुढेही जाणवत राहील.

  1. राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचं भाषण - 10 जानेवारी 2017, शिकागो


 



शिकागोमध्ये, जिथून ओबामांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली, त्याच शहरात ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलं अखेरचं भाषण केलं. ट्रम्प यांच्या निवडीनंतरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात हे भाषण सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरलं.