2019 लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एनडीएला (NDA) 44.87 टक्के मतं पडली होती. त्यात भाजपला (BJP) 37.36 टक्के मतं पडली होती. त्यातही 49 टक्के हिंदूंनी भाजपला मत दिलं होतं. यावेळी भाजपचं मतदान 37 टक्क्यांवरुन 50 टकक्यांवर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी (PM Modi) भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. आणि त्यासाठी हिंदू मतदान 70 ते 80 टक्क्यांपर्यंत नेण्यावर त्यांचा सगळा फोकस असणार आहे. तसं झालं तर भाजपची टॅली 400 च्या वर जाऊ शकते, असं जाणकार सांगतात. 90 च्या दशकातही रामजन्मभूमी आंदोलनाचा मुद्दा भाजपला पावला होता. आणि आतासुद्धा राम मंदिराचा फायदा होईल, असा अंदाज सगळे जण मानत आहेत. याची जाणीव असल्यामुळेच मोदी विरोधी पक्ष आणि नेते राम मंदिर मुद्द्यावरुन रोज टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. त्यामुळे किमान मुस्लिम मतं तरी आपल्या पारड्यात पडतील, असं त्यांचे आडाखे आहेत. 


कर्नाटकात ते मतपेटीतून व्यक्त झाले, तसेच या लोकसभेला होतील, अशा आशेवर इंडिया आघाडीतील नेते बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुस्लिम समाजाने... सामान्य मुस्लिम मतदाराने अत्यंत समजुतदारपणा दाखवला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल. राम मंदिरामुळे एकगठ्ठा होणाऱ्या हिंदू मतांची इंडिया आघाडीला काळजी वाटतेय, तर अत्यंत शांतपणे मतपेटीतून व्यक्त होणाऱ्या मुस्लिम समाजाची धास्ती भाजपला वाटत असेल. त्यामुळेच सोशल इंजिनिअरिंगची सगळी समीकरणं पडताळून पाहिली जात आहेत. विजय निश्चित समजून कोणीही गाफील राहणार नाही याची दक्षता भाजपची निवडणूक यंत्रणा घेत असेल. तर एकास एक उमेदवार देऊन मतविभाजन टाळून, निर्णायक मुस्लिम मतं घ्यायची गणितं इंडिया आघाडी करत असेल. 


राम मंदिरामुळे देशातील वातावरण प्रो-मोदी झालं आहे, ही गोष्ट भाजप विरोधकही खाजगीत मान्य करत आहेत. राम मंदिराला विरोध नाही, पण भाजप त्यावरुन राजकारण करतंय त्याला विरोध आहे, असा आक्षेप भाजपविरोधी पक्ष करताना दिसतात. प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त जाहीर केल्यावर हे कन्फ्यूजन वाढल्याचं दिसून येत आहे. त्यातूनच सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंसारखे नेते 22 तारखेच्या सोहळ्याला जाणार नसल्याची घोषणा करतात. अधिवेशनाआधी सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालणं वेगळं. सरकारच्या शपथविधीला गैरहजर राहाणं वेगळं आणि कोट्यवधी जनतेच्या आस्थेचा, श्रद्धेचा, विश्वासाचा, भक्तीचा, अस्मितेचा विषय असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला गैरहजर राहणं वेगळं. यातला फरक जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना कळत नसेल का? हा कार्यक्रम भाजपचा असेलही पण हा सोहळा राम भक्तांचा आहे, राम भक्तीचा आहे, हे या जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना कळत नसेल का? भाजपला आणि मोदींना विरोध करणं वेगळं पण त्या नादात आपण कोट्यवधी जनतेच्या श्रद्धास्थानालाच विरोध करतोय, असं चित्र निर्माण होतंय हे जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना कळत नसेल का? फक्त आपल्या देशाच्याच... नाही तर किमान हजार बाराशे वर्षांच्या मानवी इतिहासात जी गोष्ट घडली नव्हती ती आता प्रत्यक्षात येतेय. अशा वेळी आपण भाजपच्या किंवा मोदींच्या विरोधात आहोत पण रामाच्या, रामजन्मभूमीच्या, राम मंदिराच्या विरोधात नाही हे मतदारांच्या मनावर ठसवण्याची संधी विरोधकांनी दवडली आहे का? 


धर्मसत्ता आणि राजसत्तेचं महत्व माहिती असलेले, रामराज्याचे पुरस्कर्ते महात्मा गांधी काय म्हणाले होते माहिती आहे का? ते म्हणाले होते, "धर्माचं राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही, असं जे म्हणतात, त्यांना धर्म काय आहे हेच कळलेलं नाही..." महात्मा गांधींचं किमान एवढं वाक्य किमान काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा पुन्हा वाचलं आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी 22 जानेवारीला ते प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत दिसू शकतील. अर्थात ते होणे कठीण आहे, पण जो भव्य दिव्य, न भूतो सोहळा अयोध्येत होईल त्याच्याशी जगभरातील प्रत्येक रामभक्त.. रामावर.. देवावर श्रद्धा, आस्था असणारा प्रत्येक माणूस कणभर तरी जोडला गेला असेल हे नक्की.