आपल्या आयुष्यातलं आणखी एक वर्ष सरलं. 2018 जाऊन आपण पाऊल ठेवतोय, 2019 मध्ये. भारताचा विचार केल्यास निवडणुकांच्या वर्षात. पण, आताच्या या संवादात मी त्याबद्दल अधिक काहीच सांगत नाहीये, किंबहुना तो माझा हेतूच नाहीये. आता मला फक्त मागच्या वर्षात काय झालं, किंवा काय करायचं राहिलं. याचा जमाखर्च मांडून पुढच्या वर्षात काय करायचंय याची आखणी करायचीय.


म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या मनात याच विचारांची मालिका सुरु असेल. पर्सनली असं वाटतं, की झालेल्या गोष्टींवर आपण कमी विचार करावा, किंवा बोलावं. त्याने फायदा असा होईल नव्या संकल्पनांवर आपण अधिक भर देऊ शकू. तरीही आपल्या आयुष्यातले बहुमोल क्षण मागे सरलेत, त्यावर मंथन व्हायलाच हवं.

ज्यांनी गेल्या वर्षात आपल्याला साथ दिली, मग ते नातेवाईक, मित्रपरिवार किंवा ऑफिसमधले सहकारी असोत. म्हणून त्यांचे आताच्या घडीला आपण धन्यवाद मानूया. त्यांच्या विना हा प्रवास कठीण झाला असता. तसंच संकटकाळी जे छातीचा कोट करुन पाठीशी उभे राहिले, त्यांनाही दंडवत करुया. ज्यांनी नि:स्वार्थपणे आपल्यावर प्रेम केलं, मनस्वीपणे आपल्या भल्याचाच विचार केला, ज्यांनी फक्त आपल्याला देण्याचाच प्रयत्न केला, तोदेखील आपल्याकडून अपेक्षा, मनीषा ठेवता... तसेच जे पुढेही सोबत असणार आहेत, अशा सर्वांनाच मनापासून नमन करुया.

यामध्ये अगदी लहान मूलही असू शकतं. म्हणजे ते आपलं नात्यातलं किंवा ओळखीतलंच पाहिजे असं नाही. तर, ज्याच्या एखाद्या कृतीने, अल्लडपणाने, अतरंगी वृत्तीने आपल्या चेहऱ्यावर हसू फुललं तर तोही आपल्याकरता आनंदपीठ ठरु शकतो. त्या क्षणापुरता...

याच वेळी ज्यांनी मावळत्या वर्षात आपल्याला वेदना दिल्या, कदाचित काही वेळा अपमानास्पद बोलूनही गेले असतील काही. त्यांनाही थँक्यू म्हणू, कारण या मंडळींमुळेच वर उल्लेख केलेल्या लोकांचं मोल आपल्याला कळलं. म्हणजे उन्हाचे चटके सोसल्यानंतर सावलीचा आल्हाद मिळतो तसं.

दुसरीकडे आपल्याबाबतीतही आपण हा विचार करुया. की, आपण कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि कुणाच्या मनाला नख लावलं. पहिल्या कॅटेगरीत आपण असू, तर चांगलंच. मात्र कळत नकळतपणे वागून दुसऱ्या कॅटेगरीत गेलो असू, तर ज्यांना आपण दुखावलंय, त्यांना खुल्या दिलाने आणि मनाने सॉरी किंवा माझं चुकलंच, असं म्हणायलाच हवं. किंबहुना येत्या वर्षात दुसऱ्या वर्गात न जाण्याचाच जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायलाच हवा.

हे झालं सरत्या काळाबद्दल. आता उगवत्या वर्षाबद्दल बोलू थोडंसं. म्हणजे संकल्प वगैरे असं काही वैचारिक काही सांगणार नाही. तरीही येणाऱ्या वर्षात काही गोष्टी करण्याचं ध्येय मनी बाळगूया.

यातली प्राधान्यक्रमाने करण्याची गोष्ट म्हणजे तब्येतीवर लक्ष अर्थात फिटनेस. म्हणजे आपल्या घरातील आजूबाजूच्या ज्येष्ठ मंडळींची काळजी तर घ्यायलाच हवी. पण, जी पिढी आता वर्किंग प्रोफेशनमध्ये आहे, शाळा-कॉलेजमध्ये शिकतेय, त्यांच्याही फिटनेसवर भर द्यायला हवा. सर्दी-खोकल्यासारखे फोफावलेले किडनीचे विकार, हृदयविकार, मनोविकार हे टाळायचे असतील तर आपलं खाण्यापिण्याचं वेळापत्रक फार काटेकोरपणे पाळू. हेल्दी फूड खाऊया. म्हणजे इथेही झाडाचं उदाहरण घेऊया. झाडाची मूळं घट्ट हवीतच, त्यासोबतच फांद्याही डवरलेल्या, बहरलेल्या असाव्या. मूळं म्हणजे अर्थात आपल्याला उभं करणारे आपले आईवडील, आजीआजोबा, घरातली वडिलधारी मंडळी. तर, त्यांच्या फांद्या म्हणजे आपण. दोन्ही छान असावे, मग त्या झाडाचं सौंदर्य आणखी बहरेल. सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणंही तितकंच महत्त्वाचं नाही का. सुंदर दिसणं हे आपल्या हातात नसतं, ते गिफ्टेड असतं. पण, सुंदर असणं हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. तेव्हा आधी तब्येतीने, मग कर्तृत्वाने सुंदर होऊया.

शरीराची निगा राखता राखता आपल्या परिसराचीही निगा राखू. तो स्वच्छ ठेवू. अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करु. म्हणजे बसमधून किंवा ट्रेनमधून उतरल्यावर तिकीट केराच्या टोपलीत जाईल याची दक्षता घेऊ. इथपासूनच सुरु केलं, तर देश स्वच्छ राहायला वेळ लागणार नाही. मोठ्यांची जबाबदारी इथे जास्त अशासाठी की, तुमच्यातून या सवयी लहानांमध्ये झिरपतील, सो टेक केअर.

जाता जाता आणखी तीन गोष्टी अगदी सहज मनात आल्या म्हणून सांगतो. आपण म्हणजे जी नोकरी किंवा उद्योगव्यवसायात असलेल्या लोकांसाठी खास करुन मला कळकळीने सांगावंसं वाटतं. यातली पहिली

म्हणजे प्रत्येक अर्निंग मेंबरने, म्हणजे ज्याला ज्याला शक्य आहे त्याने एका नातेवाईक किंवा मित्र नसलेल्या गरजूला थोडक्यात अनोळखी तरीही गरजू असलेल्याला मदत करायची. मग ती पैशाची, कपड्यांची, शिक्षण साहित्य अगदी कसलीही. त्याचं आपल्याशी थेट नातं नसलं तरी माणुसकीचं नातं आणखी घट्ट व्हावं, म्हणून मी अनोळखी म्हटलं.

साथी हाथ बढाना, किंवा ज्योत से ज्योत.... ही गीतं आपण अक्षरश: जगू शकतो, त्यासाठी थोडं मन मोठं करुया.

दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा किंवा लावलेलं झाड जगवण्याचा प्रयत्न करुया. जेणेकरुन पर्यावरण रक्षणासाठी आपलाही खारीचा वाटा त्यात असेल. तिसरी गोष्ट म्हणजे येत्या वर्षात एक तरी चांगलं पुस्तक वाचूया.

जे मेंदूला, बुद्धीला काहीतरी खुराक देईल असं. गरजूंना मदत केल्याने त्यांचं आयुष्य टवटवीत, प्रफुल्लित होईल, झाडं जगवल्याने वातावरण आणि पुस्तक वाचल्याने मन.....

विविधतेने नटलेल्या एकसंध अशा या भारताच्या या प्रगतीत आपण इतका वाटा नक्की उचलू शकतो. भूतकाळाच्या पटलावरुन भविष्याकडे पाहताना वर्तमानात हे भान पाळलं तर अशक्य असं काहीच नाही, खरं ना ? जाता जाता सर्वांना नववर्षासाठी सुखसमृद्धीच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.