बुलेटिन करता करता कधी कोणत्या बातमीची गाठ पडेल, कोणती बातमी तुम्हाला आतमध्ये भिडेल सांगता येत नाही. तसंच आज झालं, वसईतल्या तिल्हेर गावातली ती बातमी पाहून गलबलून आलं, चीड आली आणि आपलीच लाजही वाटली.

शाळा गाठण्यासाठी साधा रस्ताही नसलेली १०-१२ वर्षांची कोवळी मुलं पाण्यात चिंब भिजण्याची कसरत करत शाळेत पोहोचतात. कपड्यांचा दुसरा सेट दप्तरात असतो, तोही भिजतो, ती मुलं सांगत होती. त्यांचे बाईट्स ऐकून त्यांच्या जिद्दीला सलाम करतानाच, आपल्या देशात त्यातही देशाच्या आर्थिक राजधानीपासून काही किलोमीटरवर असलेल्या गावात बेसिक सोयी-सुविधाही आपण पुरवू शकत नाही, याबद्दल खंत वाटली. नव्हे शरमेने मान खाली गेली.

इथे आम्ही दिवाळी साजरी करत असताना ती मुलं मात्र पाण्यातून गारठून, ओलेचिंब होत शाळेत जातात, शाळेत जाण्यासाठी जीवघेण्या प्रवासाची परीक्षाच जणू.

एकीकडे मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन अशा वाटेवरचे आपण तर दुसरीकडे आयुष्याची वाट घडवण्यासाठी शाळेत निघालेल्या कच्च्याबच्च्यांना साधी धड वाटही आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, उलट वाटच लावतोय.

स्वत:चीच चीड आली. २१ व्या शतकात महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणारे, तरुणांचा देश म्हणून मिरवणारे आपणच आणि त्याच ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना सोयी-सुविधाही न पुरवणारे आपणच. हे किती परस्पर विरोधी चित्र आहे. त्याच वेळी या जिद्दी मुलांचं आणि त्यांना तितक्याच जिद्दीने शिकवणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचं खूप कौतुक वाटलं. अभिमान वाटला. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ते शिकतायत, एक दिवस नव्हे तर रोज अशा खडतर वाटेतून प्रवास करून शाळेत जाऊन नवी वाट निर्माण करण्याची आशा बाळगतायत. कुठे लाकडी ओंडक्याचा पुल तर कुठे पाण्यातून दोर हाती धरत काढलेली वाट...तरीही मुलांच्या चेहऱ्यावर संतापाची, रागाची भावना कुठेही नाही. खरंच मुलं तुम्हाला खूप काही शिकवून जातात ते हेच. ही मुलं ग्रेट मोटिव्हेटर आहेत, सगळ्यांसाठीच. खास करून आयुष्याला कंटाळून व्यसनाच्या किंवा कधीकधी मृत्यूलाही कवटाळणाऱ्यांसाठी तर जास्तच.

इतक्या कठीण परिस्थितीतही शिकण्याची आस कायम ठेवत या मुलांनी जो मेसेज दिलाय त्याला तोड नाही. तुमच्या आमच्या आयुष्यातल्या वाटेतही असे अनेक स्पीड ब्रेकर्स येतात, अडचणी येतात. तेव्हा आपण कधी कधी निराश होतो, सारं काही संपलंय असं वाटतं. त्यांनी या मुलांचा आदर्श जरुर घ्यायला हवा. त्यांच्या जिद्दीचा दोर किती मजबूत आहे ते पाहावं, पाण्यातून वाट काढत पुढची वाट गाठणारी ही मुलं आणि त्यांचे आई-वडील या दोघांनाही सलाम. त्याच वेळी संबंधित प्रशासनाला इतकंच सांगावंस वाटतं उघडा डोळे बघा नीट.