येणारा प्रत्येक दिवस एक नवीन आशा, नवीन उमेद घेऊन येतो, असं म्हणतात. सध्या मात्र प्रसारमाध्यमांमध्ये डोकावलं तर येणारा प्रत्येक दिवस महिला अत्याचाराची बातमीच घेऊन येताना दिसतोय. काल एक बातमी आली. बिहारमध्ये एका मुलीचे चक्क कपडे उतरवत, तिला छेडण्याचा प्रयत्न झाला. मस्तकात तिडीक घालवणारी बातमी. हिम्मत कशी होते, या निर्लज्जांची, मुलीच्या अंगाला किंवा तिच्या थेट वस्त्राला हात घालण्याची. यानिमित्ताने पुन्हा आठवण झाली ती काहीच दिवसांपूर्वी घडलेल्या दोन घटनांची, म्हणजे कठुआ आणि उन्नावमधील घटनांची.

महिला अत्याचारासंदर्भातील चर्चेने आता आणखी जोर धरलाय. मुलीचे कपडे उतरवणं काय किंवा तिच्या अब्रूवर हात टाकणं काय, दोन्ही मन सुन्न करणाऱ्या, त्याच वेळी मनाला घर करणाऱ्याही. एकीकडे आठ वर्षांची कोवळी पोर. नराधमांच्या वासनेची शिकार होते. या प्रकरणात शासकीय अधिकारी तसंच पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक झालीय. तर दुसरीकडे उन्नावमध्ये लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या आमदारावरच अत्याचाराचे आरोप. आणखी एक वाचनात आलेली बातमी म्हणजे सहा महिन्यांच्या नवजात बालिकेवर अत्याचार. मन सुन्न करुन टाकणाऱ्या आणि त्याचवेळी माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटेल अशा या बातम्या. अशातच अलिकडेच केंद्र सरकारने १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा घेतलेला निर्णय आला. सर्व स्तरातून त्याचं स्वागतही झालं.

एखाद्या हिंस्र श्वापदांसारखे हे लिंगपिसाट एखाद्या अल्पवयीन मुलीला सावजासारखं हेरतात आणि तिच्या शरीरावर तुटून पडतात....सारंच चीड आणणारं..... त्यामुळे अशा हैवानांना फासावर लटकवणं हे रास्तच आहे. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत व्हायलाच हवं. तरीही राहून राहून हा प्रश्न मनात येतो की, खरंच फाशीने या सैतानांना जरब बसेल का?

म्हणजे बघा ना, आईवडील मोठ्या कष्टाने, हिमतीने ज्या अंकुराला जन्म देतात. आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच काही वासनांध उमलण्याआधीच कुस्करुन टाकतात. त्यांच्या आयुष्य बहरण्याआधीच त्याची माती करुन टाकतात. सगळंच समाज म्हणून चिंता करायला लावणारं.

अशा घटनांमधील पीडितांबद्दल तर वाईट वाटतंच. पण, त्यांच्या आई-वडिलांसाठीही जीव गलबलून येतो. ज्या अंगाखांद्यावर आपण लाडक्या लेकीला खेळवतो, जिच्या चेहऱ्याची एक झलक बघून दिवसाचा शीण कुठल्या कुठे पळून जातो. जिच्या लहानपणीचा प्रत्येक क्षण फक्त मोबाईलच्या नव्हे तर मनाच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला होतो. ज्याची कुठलीही कॉपी नसते, मनावर उमटलेले नव्हे कोरलेले ते क्षण. एकवेळ जेवायला नसलं तरी चालेल पण तिने मारलेली एक हाक किंवा दिलेलं एक स्माईल...पंचपक्वानांच्या ताटापेक्षाही तृप्त करुन टाकणारं.

कट टू तिच्या शरीराचे लचके तोडल्याची ती बातमी. काय होत असेल त्या आई-वडिलांचं. अशा वेळी मग वाटतं की, ज्या नराधमांनी हे दुष्कृत्य केलंय, त्यांना फासावर लटकवणं ही सजा तर आहेच. पण, त्याहीपेक्षा असं काही होऊ शकतं का? की ज्याचा धाक या वासनांधांच्या मनात जास्त बसेल आणि पुढे कोणी यासाठी धजावणार नाही. माझ्या मते जी वेदना ती पीडित मुलगी हा अत्याचार झाल्याने सोसते किंवा, त्या मुलीच्या आईवडिलांच्या मनावर जो घाव बसतो. तसा हिसका या माणसांच्या शरीरातील पशूंना द्यायला हवा. यासाठी त्यांचे हात किंवा पाय यासारखे अवयव छाटून त्यांना जिवंत ठेवणं, हा एक पर्याय ठरु शकतो. (मानवाधिकारवाल्यांनी इथे पीडित मुलींचा आणि त्यांच्या आप्तांचा आक्रोश लक्षात ठेवावा म्हणजे त्यांना या शिक्षेवर आक्षेप घ्यावासा वाटणार नाही)

मला आणखी एक सूचना करावीशी वाटते की, एक तर बलात्कार या गुन्ह्यात मुळात वय हा मुद्दा असूच नये. १२ वर्षांखालील वगैरे. बलात्कार मग तो कोणत्याही वयोगटाच्या मुलीवर, महिलेवर, बालिकेवर झालेला असो त्याला सरसकट एकच शिक्षा व्हायला हवी. ती म्हणजे फाशी.

यात आणखी एक मुद्दा मला खटकतो तो, गुन्हा करणारा अल्पवयीन असेल तर त्याला मिळणारी वेगळी शिक्षा. म्हणजे सज्ञान वयातील आरोपीने हाच गुन्हा केल्यास त्याला शिक्षा वेगळी आणि अल्पवयीन आरोपीला वेगळी शिक्षा. या गुन्ह्यासाठी हा क्रायटेरिया असता कामा नये. जो गुन्हा करायला तुम्ही धजावता, ज्या घटनेत त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, ती आयुष्यातून उठते, तिच्या आईवडिलांची जगण्याची उमेद तुम्ही हिरावून घेत असता, त्या गुन्ह्याकरता अल्पवयीन आरोपी वगैरे टॅग लावून त्याची शिक्षा सौम्य का? त्याच्यासाठी फक्त आणि फक्त हा बलात्काराचा गुन्हेगार असा एकमेव निकष ठेवून त्याला शिक्षा सुनावण्यात यावी. त्यातच आज झालेली मुलीचे कपडेच उतरवल्याची घटना. धक्कादायक, त्याच वेळी समाज म्हणून मान खाली जाणारी. मुलीच्या कपड्याला हात घालण्याची बेशरमी करण्याची ताकद यांच्यात येते कुठून ? आणि त्यांच्याही बाबतीत कडक शिक्षेचा म्हणजे हात छाटण्याचा विचार करावा का? (पुन्हा मानवाधिकारवाल्या मंडळींना यावर आक्षेप असेल कदाचित. पण, जे हात तुमच्या आमच्या आयाबायांची वस्त्र उतरवायला धजावतात त्या हातांना छाटणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ज्याने गुन्हा केलाय त्याच्या मानवाधिकाराबद्दल आपण हळवं व्हायचं, मग ज्याच्यावर अत्याचार झालाय, त्याच्या मानवाधिकाराचं काय?

याचनिमित्ताने मला बलात्कारासारख्या गुन्ह्यांच्या मुळाशी जाताना आणखी काही मुद्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञान, माध्यमं जशी वाढलीयेत, त्याचे जसे पॉझिटिव्ह इफेक्ट्स दिसायला लागलेत, तशाच काही गैर बाजूही समोर येतायत. म्हणजे अश्लील व्हिडीओ काढून किंवा फोटो काढून तो वायरल करणे, किंवा चेहरे मॉर्फ करुन व्हिडीओ, फोटो वायरल करणे. यासाठीही आणखी कडक शिक्षा झाल्या पाहिजेत.

आपल्याकडे झालंय काय की, तंत्रज्ञान, माध्यमांचा विकास, प्रसार जितक्या वेगाने झाला, तितक्या वेगाने आपण समाज म्हणून मॅच्युअर झालो नाही. म्हणजे ना धड आपण पारंपरिक ना धड आधुनिक. कुठेतरी मधल्यामध्ये आपण अडकलोय. तिकडे सगळी गोम आहे.

आणखी एका मुद्याकडे आपण जाणीवपूर्वक आणि सविस्तर लक्ष द्यायला हवं, ते सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षणाच्या. अगदी प्राथमिक शाळेपासून हे शिक्षण दिलं जाऊ लागलं तर हे रिलेशन नेमकं काय असतं? ही भावना काय असते? याचं बेसिक शिक्षण जर याच वयात मिळालं तर या घटना काही प्रमाणात रोखता येतील असं वाटतं. अजूनही सेक्स या विषयावर आपल्याकडे बुजरेपणा आहे. म्हणजे मर्यादा सोडाव्या असं माझं म्हणणं नाही. पण, ती गोष्ट आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक असली तरी ती योग्य पद्धतीने पुढच्या पिढीकडे पोहोचावी, यासाठी जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध प्रयत्न व्हावेत. तर आपण या घटनांना काही प्रमाणात आळा घालू शकू. पुन्हा एकदा फाशीची शिक्षा लागू केल्याबद्दल सरकारच्या निर्णयाचं स्वागत.