ऑफिसला येता येता सकाळी ट्रेनमध्ये व्हॉट्स अॅप चेक करत होतो आणि अचानक ब्रेक लागल्यावर गाडी थांबते तशी एक बातमी वाचून जणू मेंदू स्तब्ध झाल्यासारखं झालं.

प्रत्येक ग्रुपवर एकच बातमी होती गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाची.

आपल्या स्वरांच्या वर्षावात रसिकांना न्हाऊ घालत तृप्त करणाऱ्या किशोरीताई. केवळ आनंदच नव्हे तर आत्मानंद देणाऱ्या किशोरीताई. होय, त्यांचं गाणं, त्यांचा आवाज हा थेट श्रोत्यांच्या आत्म्याशी संवाद असायचा. ‘बोलावा विठ्ठल’ यासह याच अल्बममधल्या अन्य भक्तिरचना या कानातच नव्हे तर मनातही साठून राहिल्यात. त्यांच्या सुरातली आर्तता आतमध्ये स्पर्श करून जाते.

‘मनाचा ठाव घेणं’ हा वाक्प्रचार ‘वाक्यात उपयोग करा’मध्ये परीक्षेच्या पेपरात लिहिलाय. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे किशोरीताईंचं गाणं. त्यांनी नुसता आलाप जरी घेतला तरी वेगळ्या स्वरविश्वाचं दर्शन आपल्याला घडतं. किंबहुना त्यांचं गाणं ऐकल्यावर आपलं वेगळं असं अस्तित्व राहातच नाही, तुम्ही त्यांच्या आवाजात, त्यांच्या स्वरात तदरुप होऊन जाता, त्यांच्या स्वरांशी बिलगुन जाता.

समाधी लागणं म्हणजे काय,याचा अनुभव घ्यायचा असेल तर किशोरीताईंचं बोलावा विठ्ठल, या पंढरीचे सुख किंवा अवघा रंग...यातली कोणतीही रचना हेडफोन लावून डोळे बंद करून ऐका, तुम्हाला वेगळी चेतना, ऊर्जा शरीरात प्रसवत असल्याचं भासेल, ही जादू, ही ताकद, त्यांच्या स्वरांची आहे.

त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा कधी योग आला नाही, पण एक कार्यक्रम मी अटेंड केला होता, बहुतेक त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याचा साधारण ८-९ वर्षांपूर्वी. ज्या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहतादेखील होत्या. तेव्हा या दोन दिग्गजांमध्ये जो संवाद झाला होता, तो आठवला. त्यातलं सगळंच आता आठवत नाहीये, पण दोन किस्से मनावर कोरले गेलेत.

तेव्हा किशोरीताई एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या होत्या, मला एखादा राग दिसल्याशिवाय मी गायलाच बसत नाही. राग दिसणं म्हणजे काय हे कळण्याच्या उंचीचं ज्ञान माझ्याकडे तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. पण, त्यांना ‘राग दिसणं’ म्हणजे काय म्हणायचं असेल याचा साक्षात्कार त्यांच्या गायनातून आपल्याला होतो.

म्हणजे त्या रचनेचे शब्द, संगीत आणि किशोरीताईंचा स्वर हे जणू एकमेकांसाठीच जन्माला आलेत, असा सुखसोहळा त्यांच्या गायकीतून आपल्याला अनुभवता येतो.

या संवादामध्ये विजयाबाई एकदा म्हणाल्या, आज किशोरीने अनुभव आणि अनुभूती यातला फरक समजावून सांगितला. अद्भूत स्वरनक्षीने तुमचं आमचं आयुष्य सुंदर, सुबक आणि सुखद करणाऱ्या या गानतपस्विनीला सविनय दंडवत अन् विनम्र आदरांजली.