नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हर्षेंच्या ‘आपला मानूस’चे प्रोमो यायला लागल्यापासून चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. प्रोमोजचं एडिट, काही काही शॉट्सचं टेकिंग पाहूनच काही तरी वेगळं पाहायला मिळणार आणि सोबतच कसलेले कलाकार असल्यानं अभिनयाची पर्वणी असणार हे नक्की होतं. त्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे. त्यांचा ती सध्या.... मला मनापासून आवडला होता, त्यामुळे याही चित्रपटाकडून अपेक्षा होत्या.
‘आपला मानूस’ चित्रपट पाहिला.... आणि एकटं बसून आपल्याशी संवाद करावासा वाटला. खूप आतमध्ये घुसणारा चित्रपट वाटला मला. म्हणजे तुम्हाला तुमच्या आत डोकवायला लावणारा, आरसा म्हटलं तरी चालेल. उत्तम करिअर आणि अँबिशन असलेले मुलगा आणि सून, त्यांच्या सोबतीला मुलाचे वडील. त्यांच्या भोवती फिरणारं कथानक. चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असल्याने तो जाऊन पाहण्यातच गंमत आहे. मला मात्र त्यातली आबांची घुसमट, अगतिकता, प्रेम हे खूप आतमध्ये टच करुन गेलं. म्हणजे करिअरिस्ट दाम्पत्य घराबाहेर गेल्यावर घरात एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मनोवस्था अगदी नेमकेपणाने चित्रपटाने टिपलीय. आलिशान फ्लॅट, सर्व सोयीसुविधा पायाशी लोळण घेतायत, तरीही बोच असते मनामध्ये. आपली माणसं फक्त बरोबर राहतात, ती सोबत नाहीयेत आपल्या. ही भावना नख लावते.
आजच्या काळात अशी अनेक घरं असतील खरं तर जिथे मुलं नोकरीनिमित्ताने तासन् तास बाहेर असतात, फक्त झोपायला घरी येतात. कधी आईवडील तर कधी फक्त आई किंवा फक्त वडील हे एकेकटे राहत असतात. आईवडील म्हणजे नातवंडांचे आजीआजोबा एकत्र असतील तर किमान ते एकमेकांच्या सोबत तरी असतात. पण, एकटी आई किंवा एकटे बाबा राहतात मला असं वाटतं की, त्यांची घुसमट जास्त असते. ते फक्त एकटे नसतात, बऱ्याच अंशी एकाकी असतात.
नातवंडंही या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे काही वेळा बोर्डिंग स्कूल किंवा मग उच्च शिक्षणसाठी बाहेर किंवा शहरातच असली तरी दिवसातलचा बराचसा वेळ घराबाहेर. त्यात वडील जेव्हा आजोबांच्या भूमिकेत जातात, तेव्हा मन आणखी हळवं झालेलं असतं. म्हणजे ही सगळी मंडळी जरी घराबाहेर असली तरी त्यांच्या मनाच्या आत घट्टपणे घर करुन असतात. त्यामुळे कधी त्यांच्या काळजीने, कधी प्रेमाने तरी कधी त्यांच्यासोबत शेअरिंग नसण्याच्या भावनेने त्यांचं मन आतून पोखरुन निघत असतं.
चित्रपटात काही संवाद तर तुम्हाला आतून बाहेरून हलवून टाकतात. एकत्र राहता, तुम्ही पण, वर्षानुवर्ष एकमेकांना स्पर्शही करत नाही. अशा आशयाचा एक संवाद वडील-मुलगा नात्याच्या रेफरन्ससाठी आहे. जो तुमच्या आरपार जातो. खरंच काही वेळा असं वाटत मुलांचा संसार सुरु झाल्यावर मुलं आपल्या आईवडिलांना फारच गृहीत धरतात. खास करुन वडिलांना. आई तिची नाराजी रडून, ओरडून कदाचित व्यक्तही करेल, बाबांचं काय. त्यांना लागलेली आपल्या माणसांची तहान कळत नाही, कारण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत नाही ना.... ते आतल्यात आतच राहतं.
मला वाटत हा चित्रपट त्या बाबांची कहाणी सांगणारा आहे. आज आपल्याकडे सर्व सोयीसुविधा, आलिशान घरं, गाड्या असतीलही. पण, जो वेळ आपण आपल्या माणसांना दिला पाहिजे, तो मात्र कमी होत चाललाय. किंबहुना नाहीच आहे. म्हणजे कुठल्याही दोन नात्यात ती पोकळी वाढत चाललीय असं वाटतं. म्हणजे पती-पत्नी, आईवडील-मुलं, आईवडील झालेली मोठी मुलं आपल्या मुलांसोबत किंवा आईवडिलांना देत असलेला वेळ. या सगळ्याचंच गणित कुठेतरी चुकतंय.
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा तुमच्या माणसांचे दोन प्रेमाचे किंवा आपुलकीचे शब्द, त्यांची एखादी मिठी किंवा अगदी खांद्यावर हात ठेवणंही या मंडळींसाठी त्यांच्या औषधांपेक्षा मोठा इलाज करुन जातात. किंबहुना हे जर नियमित घडलं तर या ज्येष्ठ नागरिकांपैकी बऱ्याचशा मंडळींनी कदाचित कोणतंच औषध घ्यावं लागणार नाही. पण, दुर्दैवाने तेच उमगत नाही आणि उमगतं तेव्हा बऱ्याच घटनांमध्ये वेळ निघून गेलेली असते. वेळ न दिल्याने निघून गेलेली ती वेळ, नंतर मात्र मनाला आणखी भोसकून जाते. पण, तेव्हा गोष्टी आपल्या हातात बऱ्याच वेळा उरत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की, या चित्रपटाने ज्येष्ठ नागरिकांची खास करुन वयोवृद्ध बाबा आणि नातवंडांच्या लाडक्या आबांची मनातली घालमेल अगदी अचूक टिपलीय. काही संवादातून तर ती थेट बाणासारखी तुमच्या काळजाला चिरुन जाते.
उदाहरणार्थ सकाळी बायकोबरोबर भांडण झाल्यावर ती रात्री कुशीत शिरते तेव्हा सारं काही तुम्ही विसरुन जाता, पण बापाबरोबर भांडल्यावर तो दिवस दिवस काय करत असेल....या आशयाचा एक संवाद फारच मेंदूला विसकटून जातो. या सधन कुटुंबातल्या मुलाकडे सगळं काही आहे, तरीही या प्रश्नाने तो या कॅरेक्टरला जे सुमीतने साकारलंय, त्याला आणि चित्रपट पाहताना आपल्याला रितेपणाची जाणीव करुन देतो. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हटलं जातं. त्याच वेळी आपल्या बाळांना, लहान मुलांना आपण किती वेळ देतो, किती अटेन्शन देतो, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं किती कौतुक करत असतो, कौतुकाने त्यांचा नटखटपणा सगळ्यांना सांगत असतो. मग त्याच्या १० टक्के वेळ तरी आपण आपल्या वृद्ध आईबाबांना देतो का? उत्तर बहुतेक वेळा नाहीच असतं.
नुसतं त्यांना सर्व सुविधा देणं, त्यांना मोठं घर देणं, घरात नोकरचाकर दिमतीला ठेवणं, पॉश गाडी देणं. आधुनिक वैद्यकीय सुविधा देणं हे झालं की बऱ्याचदा मुलांना वाटतं, आईवडिलांना आपण सारं काही दिलं. असं नसतं पण, या सगळ्याच्या पलिकडचा प्रेमाचा, आपलेपणाचा ओलावा नसेल तर या साऱ्या गोष्टी त्याला आणखी कोरड्या करतात, सुकवून टाकतात. या मंडळींना आपण प्रेमाच्या दोन शब्दांचं, आपुलकीच्या मिठीचं खत घालायला हवं, मग आयुष्याच्या सायंकाळीही त्यांचं आयुष्य टवटवीत होईल, प्रफुल्लित होईल. त्यांना श्वास घेता येतच असतो, आपण त्यांना आपल्याकडच्या क्वालिटी टाईमचा ऑक्सिजन द्यायची गरज आहे, हा थॉट या चित्रपटाने दिलाय. किंबहुना रहस्यपट किंवा सस्पेन्स थ्रिलरच्या पलिकडे जाऊन आपण या चित्रपटाकडे याही अँगलने पाहायलाच हवं.
बाकी अँक्टिंगबद्दल मी काय लिहिणार... नाना-सुमीतचे काही सीन्स केवळ अफलातून. काही सीन तर सुमीतने कम्प्लिट घुसवलेत आतमध्ये. मुलगा आणि नवरा या काठावरून करायचा प्रवास सुमीतने नेमका दाखवलाय. इरावती हर्षेंचं कॅरेक्टरही असंच आपल्या आजूबाजूला सापडणारं. नानांबद्दल काय म्हणावं.... इन्स्पेक्टरचा पोलिसी रुबाब, एकाकी आबांची होरपळ दोन टोकाची ही कॅरेक्टर्स. पण, दोन्हीत संवादफेकीबरोबरच फेशियल एक्प्रेशन्सनी नाना बिटविन द लाईन्स बरंच काही सांगत तुम्हाला गलबलून टाकतात. हा ‘आपला मानूस’ पाहून तुम्ही आम्ही घरच्या ‘आपल्या मानसांना’ थोडासा तरी क्वालिटी टाईम द्यायलाच पाहिजे हा विचार खोलवर रुततो. थँक्स सतीश राजवाडे अँड टीम. आम्हाला आरसा दाखवल्याबद्दल.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरसा दाखवणारा ‘आपला मानूस’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2018 12:46 PM (IST)
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा तुमच्या माणसांचे दोन प्रेमाचे किंवा आपुलकीचे शब्द, त्यांची एखादी मिठी किंवा अगदी खांद्यावर हात ठेवणंही या मंडळींसाठी त्यांच्या औषधांपेक्षा मोठा इलाज करुन जातात. किंबहुना हे जर नियमित घडलं तर या ज्येष्ठ नागरिकांपैकी बऱ्याचशा मंडळींनी कदाचित कोणतंच औषध घ्यावं लागणार नाही. पण, दुर्दैवाने तेच उमगत नाही आणि उमगतं तेव्हा बऱ्याच घटनांमध्ये वेळ निघून गेलेली असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -