वंदनीय गणपती बाप्पांना सादर प्रणाम,

आज अनंतचतुर्दशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला पत्र लिहितोय. मनात भावनांचा कल्लोळ आहे. आता तुम्ही वर्षभरासाठी पुन्हा दूर जाणार असल्याने आतापासूनच सुनंसुनं वाटायला लागलंय. गेले १० दिवस तुमच्या उपस्थितीने मंडपच नव्हे आमचं घर, अगदी मनंही आनंदाने भरुन गेलं होतं. आता त्याला रितेपण येतंय. कारण, १० दिवसांचा तो जल्लोष, तो उत्साह, ते चैतन्य देणारे तुम्ही आम्हाला सोडून आपल्या गावाला जाताय.

खास करुन गिरगावात तुमच्या उत्सवाची गोडी आम्ही लहानपणापासून अनुभवतोय. हे दिवस आमच्यासाठी अक्षरश: मंतरलेले असतात आणि मंत्रवून टाकणारेही. स्पर्धा, स्नेहसंमेलन, महापूजा, महाआरतीचे सूर.. रात्ररात्र जागरणं, तरीही सकाळी फ्रेश वाटतं, या १० दिवसात. पण अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सारं अवसानच गळून जातं जणू. तो रिकामा मंडप, चौरंग पाहून गलबलून येतं. जो मंडप एका दिवसापूर्वी उत्साहाचा झरा वाटत होता, तो एखाद्या ओसाड परिसरासारखा भासायला लागतो. जिथे आरतीचे सूर निनादत असतात, तिथली शांतता खायला उठते. ज्या मंडप आणि परिसरातील भिंती, स्टेज, खुर्च्या जणू आपल्याशी या उत्सव काळात संवाद साधत असतात. त्याच भिंती, स्टेज, खुर्च्या मुक्या होऊन जातात जणू अनंतचतुर्दशीनंतर. म्हणजे उत्सवकाळात आम्ही जे जिने वायूवेगाने उतरत मंडपात दाखल होतो, तोच एकेक जिना नंतर एकेक पर्वतासारखा भासतो. असं वाटतं मंडपात उतरुच नये, थेट रस्त्यावर जाण्याची सोय असावी.


त्यात गिरगाव म्हटल्यावर चाळीतल्या गणेशोत्सवाची गोडी आम्ही अनुभवतोय. या चाळींपैकी अनेक चाळींना आता पुनर्विकासाची चाहूल लागलीय, त्यामुळे चाळींची जागा येत्या काही वर्षात टॉवर घेणार याही भावनेने मनात कोलाहल सुरु आहे. ज्या गॅलरीत, चौकात आम्ही लहानाचे मोठे झालो. जिथल्या भिंतींना, चौकांना, जिन्यांना आम्ही मनातलं गुज सांगितलं. अगदी लपंडावापासून ते खांबखांब सारखे खेळ खेळलो (आमच्या लहानपणीचे म्हणजे ८०-९० च्या दशकातले हे खेळ), ती वास्तू आज ना उद्या जमीनदोस्त होऊन तिथे नवं घर होणार. नव्या घराची आस असली तरी जुन्या चाळीतल्या मायेचा सहवास तिथे लाभेल ना? या विचाराने मनात काहूर माजतं. त्यातच आमच्या पिढीने चाळीतील एक किंवा दोन खोल्यामध्ये दिवस काढले, आता आमच्या मुला-नातवंडांना थोडं मोठं घर मिळो, असं म्हणणारी आमच्या आधीच्या पिढीतली काही मंडळी आहेतच. असं असलं तरी आमच्यापेक्षा त्यांचा या वास्तुशी असलेला सहवास जास्त वर्षांचा, साहजिकच ती वीण आमच्यापेक्षाही आणखी घट्ट. त्यांच्याही मनात असंख्य भावना दाटून आल्या असणार हे निश्चित. म्हणून उत्सवाचा प्रत्येक दिवस ही मंडळी एकेक उत्सव असल्यासारखं जगून घेतात. मंडपातली आपल्या एखाद्या नातेवाईकाची, मित्राची १० मिनिटांची भेटही शब्दांपलिकडचा आनंद, समाधान देऊन जाते अन् पुढच्या वर्षभरासाठी जणू ऊर्जाही.


शाळेत असल्यापासून आता चॅनल जॉईन करेपर्यंत मीही अशाच उत्सवाचा मीही एक भाग आहे, हे उत्सवाचे दिवस, त्यातला प्रत्येक क्षण मी अक्षरश: जगलोय. म्हणजे बाप्पा तुम्ही मंडपात असलात की, शाळा-कॉलेज इतकंच काय ऑफिसलाही येताना अंत:करण जडावतं. तो मंडप सोडवतच नाही. बाप्पा ही सारी तुमची किमया. तुमच्या प्रसन्न उपस्थितीने तुम्ही आमच्या प्रत्येक क्षणाचा सण करता. मंडपात एकटं बसलो तरीही तुमची उपस्थिती असल्याने एकटेपण कधीच जाणवत नाही, याउलट तुमच्या विसर्जनानंतर तोच मंडप अगदी २० जण बसून बोलत असलो तरी रितेपणाची जाणीव करुन देतो.


तुमचा हा उत्सव आम्हाला टाईम मॅनेजमेंट, मॅन मॅनेजमेंट, टीम स्पिरीट सारं काही शिकवून जातो. म्हणजे त्या अर्थाने तुम्ही आमचे मॅनेजमेंट गुरुच आहात.


आज अनंतचतुदर्शीच्या आदल्या दिवशी हा सारा आठवणींचा पट भराभर उलगडतोय. मन हुंदकावतंय. की-बोर्डवर टाईप करताना हातही ओलावलाय अन् की-बोर्डही. समोरची अक्षरं ब्लर झाल्यासारखी वाटतायत, कारण डोळ्यात अश्रू दाटलेत.


तेच गीत पुन्हा पुन्हा ओठी येतंय. उद्या संध्याकाळचं. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला..


निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी.


बाप्पा, जाता जाता एकचं विनंती करतो, यावर्षी एकीकडे अतिपाऊस आणि एकीकडे पावसाची आस अशी स्थिती आताही आहे. त्या वरुणराजाला सांगा, जिथे गरज आहे तिथे बरस बाबा. म्हणजे त्या मंडळींच्या नभातून पाणी आलं, तर त्यांच्या डोळ्यात नाही येणार. तुमची कृपावृष्टी कायम राहू द्या सर्वांवर. अशीच सेवा वर्षानुवर्षे करुन घ्या, आमच्याकडून. आमच्या पुढच्या पिढ्यांकडूनही. हे सण-उत्सव असेच वृद्धिंगत होत राहिले पाहिजेत. जगण्याला अर्थ देणारा हा तुमचा उत्सव आमचा श्वासच. तो अखंड सुरु राहावा.


तुम्हाला पुन्हा एकदा सविनय वंदन.


तुमचा भक्त