तब्बल २० ग्रँडस्लॅम, २४ वर्षांची डौलदार कारकीर्द. ही कमाई टेनिससम्राट रॉजर फेडररची. पण, कारकीर्दीच्या अखेरच्या सामन्यात त्याने जे कमवलंय कदाचित ते फार कमी जणांना अनुभवायला मिळतं. लंडनच्या लेव्हर कपमध्ये नदालच्या साथीने तो मैदानात उतरला. पण, पराभूत झाला. मग जे घडलं तो इतिहास होता. कुठल्या पेनने नव्हे तर अश्रूंनी लिहिलेला. जे फेडररचं सर्वस्व होतं, विश्व होतं, त्या टेनिस विश्वातली अखेरची मॅच खेळून तो थांबला होता. ग्रँड स्लॅमध्ये त्याची रॅकेट आता म्यान झाली होती. तरीही त्याच्या रॅकेटची तलवारीसारखी धारदार कामगिरी, त्यातही कलात्मक मखमली जादूचे फटके तुमच्या आमच्यासह सर्वांनीच अनुभवलेत. जसा सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह गोळीसारखा जायचा. तसाच फेडररचा फोरहँड किंवा क्रॉसकोर्ट फटका. सिंगल हँडेड बॅकहँड खेळणारे टेनिसपटू प्रचंड देखणे वाटतात पाहायला. फेडरर त्यातला एक होता. टेनिस कोर्ट हा श्वास असल्यासारखा फेडरर २४ वर्ष ते जगला, अगदी भरभरून. अशा किंग फेडररच्या निवृत्तीच्या क्षणी फेडरर स्वत: भावूक होऊन रडणं अगदी स्वाभाविक होतं. त्याच वेळी नदालच्या डोळ्यातले अश्रूही त्याच्या टेनिस कोर्टवरील रॅलीइतकेच वेगाने वाहिलेले जगाने पाहिले. एकीकडे फेडररला दाटून आलं होतं. इतकं सगळं कमवून रितं झाल्याची भावना त्याच्या मनी असतानाच सर्वात कडवा प्रतिस्पर्धी असलेला नदालच्या डोळ्यातूनही अश्रूंचा झरा वाहत होता. २० ग्रँड स्लॅम जिंकणं, १०३ एटीपी टायटल्स, १२५१ एटीपी मॅचेस जिंकणं, २०० हून अधिक आठवडे नंबर वन राहणं एकीकडे आणि त्याच वेळी आपण खेळणं थांबवतोय म्हणून प्रतिस्पर्धी चॅम्पियन खेळाडूच्या डोळ्यातून आपल्यासाठी अश्रू येणं हे एकीकडे. इथे अश्रूंचंच पारडं काकणभर सरसच ठरलं असावं.


एरवी चिवटपणे हार न मानणारे दोघंही घामाच्या धारांनी चिंब व्हायचे. आज त्याची जागा अश्रूंच्या धारांनी घेतली होती. त्या घामाला कष्टाचा, मेहनतीचा गंध होता. तर, या अश्रूंना एकमेकांबद्दल असलेल्या आदराचा, आपलेपणाचा दरवळ होता.


इतकी वर्षे एकमेकांविरोधात खेळून या दोघांनाही परस्परांच्या खेळाविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी प्रचंड आदर होता. प्रेम होतं. तेच अश्रूरुपाने डोळ्यातून बाहेर येत होतं. अश्रूंचा पाऊस दोघांना जसा भिजवून गेला, तसाच त्यांच्या चाहत्यांनाही.


त्या अश्रूंमध्ये दोघांच्यात झालेल्या ४० एटीपी फायनल्समधील फटक्यांच्या आठवणी ओघळत होत्या, तशाच १४ ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांमधील सामन्यांच्याही. आसवांचा एकेक थेंब एखाद्या रत्नाइतका मूल्यवान होता. विराट कोहलीने दोघंही बाजूला बसून रडतानाचा फोटो ट्विट केला आणि ‘बेस्ट स्पोर्टस पिक्चर एव्हर’, अशी समर्पक कॅप्शन दिली.


मला सचिनच्या वानखेडेवरील अखेरच्या सामन्याची आठवण झाली. तेव्हाही पॅव्हेलियनमध्ये परतताना सचिनचे डोळे पाणावलेले अन् त्याच्या चाहत्यांचेही.


खेळ, हार-जीत या पलिकडे जेव्हा एखादा खेळाडू पोहोचतो, तेव्हा तो मनाला अधिक भिडतो, भावतो. फेडररबाबत आपलं असंच झालंय. खेळातली सहजता, बर्फालाही लाजवेल असं टेम्परामेंट, मॅच पॉईंटवरुनही समोरच्या खेळाडूच्या जबड्यातून मॅच खेचून काढण्याचं कसब, कमालीचा अत्युच्च फिटनेस. या साऱ्याचा संगम म्हणजे फेडरर. फेडररला अलविदा करताना टेनिसची एक संस्मरणीय मैफलीची भैरवी पाहिल्याचा अनुभव साऱ्यांनीच घेतला. डोळे आणि मन तृप्त झालं. नदाल अजूनही खेळतोय, जोकोविचही आहे. त्याच वेळी किंग फेडरर मात्र पुढच्या मॅचेस कोर्टबाहेरून एन्जॉय कऱणार आहे. टेनिसरसिकांना भरभरून आनंद देणारा फेडरर आता निवृत्तीनंतरचं आयुष्य आपल्या कुटुंबासमवेत भरभरून आनंदात जगेल. त्याच वेळी त्याच्या चाहत्यांना त्याचं कोर्टवर नसणं रुखरुख लावून जाईल. डोळ्याच्या कडाही नकळत पाणावतील.


अश्विन बापट यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग 


BLOG : योद्धा ‘किंग’ कोहली


BLOG | कपिल देव दा जवाब नही..